YouTube व्हिडिओ

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखक: अंबरीश मिश्र | सुंदर ती दुसरी दुनिया

सुंदर ती दुसरी दुनिया सिनेमा खोटा असतो, परंतु आयुष्य किती किती त-हेनं खरं असतं ते दाखवण्याची कुवत कॅमे-यात असते. हे लक्षात ठेवून सिनेमे निघत होते, तो हिंदी चित्रसृष्टीचा सुवर्णकाळ. सिनेमा हा लोकांचा असतो. लोकांनी, लोकांसाठी केलेला. परंतु मनोरंजनाची सबब पुढे करून सिनेमा झुंडीच्या हाती जाता नये. सिनेमावाल्यांनी कला आणि करमणूक यातला समतोल छान साधला. 1930 ते 1960 या तीन दशकांत हे घडलं. म्हणून हा हिंदी सिनेमाचा वैभवकाळ. ‘पाहता पाहता’ सिनेमा मोठा झाला. त्याची ही गोष्ट. सिनेमाला बरकत यावी म्हणून अनेक थोर कलावंत, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार आणि तंत्रज्ञ झिजले. ‘निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा’ होऊन जगले. त्यांची ही गोष्ट. प्रत्येकाच्या मनात सिनेमाची एक सुंदर दुनिया वसत असतेच. मनाला हुरहूर लावणारं ते जग या पुस्तकात वस्तीला आलंय. 'सुंदर ती दुसरी दुनिया' ऐकुया या पुस्तकाबद्दल लेखक अंबरीश मिश्र यांच्याकडून.

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखक: दिलीप कुलकर्णी | गांधी उद्यासाठी

आज २ ऑक्टोबर, मोहनदास करमचंद गांधी यांची जयंती.. दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेला एक सामान्य माणूस आपल्या अफाट कर्तृत्वाने महात्मा बनला. आश्चर्य असे की, जाऊन सात दशके लोटली, तरी गांधी संपलेले नाहीत! त्यांचे विचार अद्यापि जिवंत आहेत. नुसतेच ‘जिवंत आहेत’ असे नाही; तर जगभर प्रसार पावताहेत. त्यांचा सर्वत्र अभ्यास होत आहे, अनेकांना ते अद्यापि प्रेरणा देत आहेत. ह्याचे कारण एकच : त्या विचारांचा मूलगामीपणा आणि व्यापकता. ह्यातूनच ते बनलेत वैश्विक आणि सार्वकालिक. मग आज ज्या समस्या भारताला, जगाला भेडसावत आहेत; त्यांवर ह्या विचारांतून कोणता आणि कसा मार्ग दिसतो? ह्या दृष्टीने गांधी-विचारांकडे पाहण्याचा, त्यांच्या भविष्यकालीन उपयोगितेवर सारे लक्ष केंद्रित करून त्यांतून ‘उद्या’साठी योग्य मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न. गांधी उद्यासाठी.. ऐकुया लेखक दिलीप कुलकर्णी यांच्याकड़ून।

राजहंस प्रकाशन | गोष्ट राजहंसी पुस्तकाची | सांजवात | लेखिका:प्राजक्ता पाडगावकर | अरविंद गोखले

वृद्धत्व म्हणजे नेमकं काय? वृद्धाश्रम चांगले की वाईट? वृद्ध पालकांची काळजी नेमकी कोणी घ्यायची? वृद्धांची काळजी न घेणं हा दंडनीय अपराध आहे, पण ते खरोखर योग्य आहे का? अशा आणि अनेक इतर महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर निश्चित ही मुलाखत पहा आणि त्यातील अधिक बारकावे जाणून घ्यायचे असतील, योग्य उत्तरे जाणून घ्यायची असतील तर "सांजवात" हे पुस्तक अवश्य खरेदी करा! व्हिडीओ बघा:

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखिका: वीणा गवाणकर | रॉबी डिसिल्वा

अग्रगण्य युरोपियन डिझायनर्सच्या बरोबरीनं काम केलेला, मिलान (इटली)च्या स्टुडिओ बोजेरीनं आणि लंडनच्या जे. वॉल्टर थॉम्पसन जाहिरात कंपनीनं सन्मानानं बोलावून घेतलेला पहिला आणि एकमेव भारतीय डिझायनर. इंग्लंडच्या राजघराण्याकडून F.C.S.D. पदवीनं सन्मानित झालेला एकमेव आशियाई. यानं भारतात पॅकेजिंग डिझाइन प्रथम आणलं. इंडस्ट्रिअल डिझाइनची सुरुवात केली. ग्राफिक डिझाइनला भारतीय चेहरा देण्याचा ध्यास घेतला. कला-विद्यापीठ उभं करण्याचं स्वप्न पाहिलं… १९६० चं दशक सरताना रॉबी डिसिल्वा भारतात परतले, तेव्हा ते इथल्या डिझाइन क्षेत्राच्या वीस-पंचवीस वर्षं पुढेच होते. ऐकुया अशा एका मनस्वी कलाकाराचा प्रवास.. लेखिका वीणा गवाणकर यांच्याकडून..

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | लेखिका: डॉ. मृदुला बेळे | कोरोनाच्या कृष्णछायेत

कोरोनाचा विषाणू बघता बघता एका देशाच्या सीमा ओलांडून बाहेर पडला. सगळ्या जगावर हे सावट पसरलं. कोरोनामुळे बळी पडलेल्या मृतांची संख्या भीतीदायक होती. बुद्धिमान मानवजातीसमोर या विषाणूनं हे भयंकर आव्हान उभं केलं. हा विषाणू कुठून आला, कसा पसरला, जगभरात अनेक देश त्याचा सामना कसा करत आहेत, भारत त्याच्याशी कसा लढा देत आहे – अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेणारं आणि त्याबरोबरच – कोरोनानंतरची बदलणारी भू-राजकीय समीकरणं, औषध-संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रातली व्यापक होणारी आव्हानं याचाही लेखाजोखा मांडणारं पुस्तक! औषधनिर्मितीच्या क्षेत्रात जवळपास दोन दशकं कार्यरत असणाऱ्या अभ्यासक डॉ. मृदुला बेळे यांनी सांगितलेली धोकादायक विषाणू आणि चिवट मनुष्यजातीच्या संघर्षाची कहाणी "कोरोनाच्या कृष्णछायेत…" ऐकुया लेखिका डॉ. मृदुला बेळे यांच्याकडून..