Shahar : Ek kabar! | शहर : एक कबर!
'श्री.हिमांशु कुलकर्णी यांचा ‘शहर एक कबर’ हा एक महत्त्वाचा कवितासंग्रह आहे. पापणी जागी ठेवून आधुनिक माणसाचा शोध घेणारी खोल जाणीव या कवितांना व्यापून राहिली आहे. यंत्रयुगाने माणसाच्या डोक्यावरचे कष्टांचे ओझे खाली उतरवले. माणसाला यंत्राने दिलेली ही मुक्ती वरदान ठरली काय ? की माणसाचे यंत्र झाले आणि यातून माणूसकीच्या अवमूल्यानाची प्रक्रिया सुरू झाली ? “स्वत:चं मढं स्वत:च्या पाठी” अशी माणसे “दहा बाय दहाच्या खुराडयात शेवट नक्कीच होईल गोड” हे ‘गोड’ स्वप्न पहात राहिली ? शहर ही एक संस्कृती की माणूसकीची कबर ? मोरांचा झडून गेलेला पिसारा आणि इथल्या सगळ्या स्वप्नांचा गळून गेलेला फुलोरा श्री.हिमांशु कुलकर्णी करूणेच्या डोळयांनी पहातात. निवडुंगातून फूल यावे तसे त्यांच्या काटेरी अनुभवाला आलेले करूणेचे हे फूल या कवितांतून हाक घालते. श्री.हिमांशु कुलकर्णी यांची भाषा ही करूणेचा स्वर लाभलेली सत्याची भाषा आहे. ही कविता सूचक प्रतिमांनी बोलते. या प्रतिमा ही कविता आरशांसारख्या पुढे ठेवते. आपले जे खरे रूप पहायचे माणसे सतत टाळीत असतात ते या प्रतिमांच्या आरशात कविता वाचताना त्यांना दिसू लागते. स्वत:ला समजून घेण्यासाठी स्वत:ला पहावेच लागते. श्री.हिमांशु कुलकर्णी यांची कविता कुठेही हिडिस-विकृत न होता बुध्दाच्या करूणेने हे दर्शन घडवते. श्री.हिमांशु कुलकर्णी यांच्या कवितांमधून प्रीतीचा कोमल झरा हळूवारपणे वहातो आहे. तो त्यांच्या प्रेमकवितांतून तर जावतोच; पण त्यांच्या उपरोधालाही तो हिंसेचे हत्यार बनू देत नाही. ‘शहर एक कबर’ हा संग्रह मी वाचला तेव्हा एक उत्कृष्ट कवितासंग्रह वाचल्याचे समाधान मला मिळाले. मंगेश पाडगावकर '
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०००
सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०१६
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'