 
            Maharashtratil Dhabdhabe | महाराष्ट्रातील धबधबे
माणसाचं निसर्गाशी एक अतूट, अलौकिक, अगम्य आणि
अनादी नातं आहे. तरीही मनुष्य हा निसर्गप्रेमी प्राणी आहे,
हे विधान मात्र आज `अ-वास्तव' ठरलं आहे.
संगणकीय संवादाच्या या युगात माणसाला निसर्गाशी संवाद साधायला
वेळ नाही. आपल्या आलिशान अन् प्रशस्त घराच्या छताला त्याने
चंद्रतारे लटकवले आहेत. आख्खं आभाळ आपल्या खिडकीच्या चौकटीत
बंदिस्त केलंय अन् वृक्षांचं बोनसाय करून पर्वतावरील `दूरची रम्यता'
जवळ केलीय. कलावंताचं हृदय असणारा अत्यंत सामान्य माणूस मात्र
एखाद्या टेकडीच्या टोकावर थिजलेलं, आकाशातून पडलेलं रक्तबीज
बुब्बुळात साठवतो. सोनेरी कणांच्या गालिच्यावर अलगद पावलं टाकत
निरव शांततेत क्षितिजासह स्वत:ला डुबवतो. तर कोणी दऱ्याखोऱ्यात,
रानावनात भणंग भटकंती करतो मनमुराद! कोणी त्याला छंद म्हणतो,
कोणी वेडेपणा! हाच वेडेपणा सामान्याला असामान्य बनवतो.
त्याला स्वत:ची ओळख मिळते, स्वत:चा शोध लागतो.
तो सामान्यांच्या समाजरंगात रंगूनही वेगळा राहतो. असाच वेडेपणा
श्री. रमेश देसाई यांनी केलाय. जे दिसलं ते टिपलं, असं हे छायाचित्रण नव्हे.
विषय-वस्तूशी तादात्म्य साधून जो विशिष्ट क्षण छायाचित्रकार टिपतो,
त्या क्षणाच्या प्रतीक्षेसाठी त्याला खूप संयम आणि धीर धरावा लागतो.
श्री. देसाई धबधब्याचं रासवट सौंदर्य अन् घनगंभीर स्वर आपल्या डोळ्यात,
कानात, साठवतात; जमिनीकडे झेपावणाऱ्या प्रत्येक धबधब्याची
अदाकारी अनुभवतात. धबधब्यात भिजण्याचा आनंद तेही घेतात.
परंतु ते तिथे जातात ते त्या धबधब्याला भेटण्यासाठी. अनुभवतात ते
कलात्मक झिंग, भव्य सौंदर्य आपल्या फ्रेममध्ये भरून !
महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश
अशा भौगौलिक विविधतेतील काही अज्ञात पावसाळी सौंदर्यस्थळं
श्री. देसाई यांनी टिपली आहेत. हे छायाचित्रण करताना
त्यांचं कवि-कलावंत मन निसर्गाच्या विद्रूपीकरणानं विदीर्ण झालंय,
त्यांनी पावसाळी सहलप्रेमींना अनेक दालनं उघडी केली आहेत;
त्यांचं आवाहनही सहलप्रेमींनी लक्षात ठेवायला हवंय.
सुधीर शालिनी ब्रह्मे
- पहिली आवृत्ती : ऑगस्ट २०२२
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ८" X ८"
- मुखपृष्ठ, आतील चित्रे व मांडणी : अतुल घाग
- सुलेखन : आनंद कांबळे
- राजहंस क्रमांक : H-08-2022
 
                             
      
                                