Home / Authors / Sumati Deosthale | सुमती देवस्थळे
Sumati Deosthale | सुमती देवस्थळे
Sumati Deosthale | सुमती देवस्थळे

सुमती देवस्थळे मूळच्या पुण्याच्या असून माहेरचे आडनाव परांडे होते. त्यांचे शिक्षण हुजूरपागेत झाले. विवाहानंतर त्या मुंबईला गेल्या. बी. ए., एम. ए., बी. एड आणि एम. एड. शिक्षण घेतले. सिडनहॅम कॉलेजमध्ये नोकरी करत असताना असाध्य अशा हृदयरोगाने त्यांना ग्रासले. नंतर त्यांचे मन लिखाणाकडे वळले आणि त्यांनी चरित्र-लेखनाला सुरुवात केली. परकीय जगताचा अफाट व्यासंग करून कसदार व्यक्तिमत्त्वांचा सर्वांगसुंदर शोध घेऊन अथक परिश्रम करून प्रचंड माहिती मिळवली आणि मराठी चरित्रग्रंथांत मोलाची भर टाकली. ‘टॉलस्टॉयः एक माणूस’, ‘अल्बर्ट श्‍वाईट्झर’, ‘मॅक्झिम गॉर्की’, ‘कार्ल मार्क्स’ आणि ‘ज्योती आणि छाया’ हे पाच चरित्रग्रंथ लिहिले. ही सगळी चरित्रे लिहिताना सुमतीबाईंची भूमिका विभूतिपूजकाची नसून अभिनिवेशरहित अशा जिज्ञासूची आहे.

* टॉलस्टॉय हा विलक्षण प्रतिभेचा लेखक आणि प्रचंड आणि प्रगाढ असा तत्त्वज्ञ असला, तरी प्रथम तो एक माणूस होता. त्याच्या सार्‍या अंतर्विरोधासह त्याच्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा बाईंचा प्रयत्न यशस्वी झाला. वैवाहिक जीवनात सतत येणारी निराशा, तत्त्वज्ञ वाटणार्‍या या महापुरुषाची कामुक आसक्ती आणि सोन्याची असूया, संशय, द्वेष, मत्सर आणि स्वामित्व गाजवण्याची इच्छा यांमुळे घरातच युद्धकांड सुरू झाले. या युद्धकांडातले जीवघेणे चढउतार निःपक्षपातीपणाने हाताळले. ‘टॉलस्टॉयच्या अतिरेकी आत्म्याची आंतरिक ओढाताण, आत्मशोधनाची आर्त ओढ, प्रयोगशील जीवनाची अवघड घालमेल, जीवनसंग्रामाच्या दाहक ज्वाळा, विश्वाची क्षितीजे न्याहाळणार्‍या नजरेचे विलक्षण विभ्रम, तत्त्वचिंतनाची तरल धडपड, धर्मपरिवर्तनाची अस्वस्थ प्रेरणा, संवेदनशीलतेचे अबोध उन्मेष आणि सर्जनशीलतेची विश्रब्ध स्पंदने या सार्‍यांचा आलेख काढण्याची विलक्षण ताकद सुमतीबाईंच्या लेखणीत आहे’. प्रभाकर पाध्ये यांचे हे निरीक्षण आहे.

* वर्ण्य विषयाच्या अंतरंगात शिरण्याची जबरदस्त ताकद असल्याने सुमतीबाईंच्या लेखनाला दुर्मिळ सचोटी प्राप्त झाली आहे. ‘अल्बर्ट श्‍वाइंट्झर’सारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे प्रत्ययकारी चित्रण त्यांनी केले. धर्मशास्त्राचा व्याख्याता असूनही दीन-दुबळ्यांची सेवा करण्यासाठी मेडिकलच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला. डॉक्टर झाल्यावर आफ्रिकेच्या लॅम्बरीन गावात, प्रतिकूल हवामान, हिंस्र प्राणी, सर्वांत पसरलेली अंधश्रद्धा, टोकाच्या भ्रामक समजुती आणि जादूटोणा अशा दुर्धर संकटांशी झगडून इस्पितळ काढले. आदिवासींची सेवा केली. आदिवासींचीही त्याच्यावर अगाध श्रद्धा बसली. तो गाजलेला संगीतज्ञ आणि पियानो दुरुस्त करणारा होता. आफ्रिकेच्या जंगलात आपल्या संगीत साधनेने तो आपल्या कार्याप्रतीची श्रद्धा बळकट करी. उत्तुंग ध्येय आणि उदात्त कल्पना त्याला जागवीत आणि जगवीत असत. सबंध विश्वामध्ये असलेले चैतन्य म्हणजे आपल्यातल्या चिन्मय अंशाचा आविष्कार अशी त्याची श्रद्धा होती. मानवी जीवनाला सत्प्रवृत्तीची प्रेरणा देणारा अभिजात सुसंस्कृत तत्त्वज्ञ अशी त्याची प्रतिमा होती. सुमतीबाईंनी ओघवती, सुबोध, सूचक, काव्यात्म आणि रसाळ भाषेत अल्बर्टचा परिचय मराठी वाचकाला करून दिला. वाचक अल्बर्टच्या जगाशी तद्रूप होऊन अफाट जगात विहार करू लागतो, हे यश लेखिकेचे होय.

* ‘कार्ल मार्क्स’चे चरित्र लिहिताना सुमतीबाईंनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे धारदार विश्लेषण केले आहे. रशियन राज्यक्रांतीचा सखोल अभ्यास करून तो पूर्ण इतिहास आपल्या डोळ्यांसमोर जिवंत केला आहे. मार्क्सचे विचार म्हणजे टाइम बॉम्ब होता. कम्युनिस्ट पार्टीची स्थापना विश्वविशाल अशा करुणेच्या जाणिवेतून झाली होती. मजुरांना प्रचंड सहानुभूतीची गरज आहे आणि त्यांच्या दुःखाचे रूपांतर सुखात आपणच केले पाहिजे, अशी त्याची धारणा होती. मजुरांची संघटना बांधून, श्रमशक्तीची जाणीव करून देऊन, त्याने सशस्त्र क्रांतीची दीक्षा दिली. अशा या थोर तत्त्वज्ञाचे कौटुंबिक आयुष्य मात्र दैन्यावस्थेत गेले. जगातल्या बादशहांना चळाचळा कापायला लावणार्‍या मार्क्सच्या घरी मुलांना प्यायला दूध मिळत नसे. संपूर्ण जगाच्या राजकारणाला एक नवी दिशा दाखवणारा ‘दास कॅपिटल’ हा ग्रंथ त्याने लिहिला. पण ग्रंथ लिहिताना त्याने जितक्या सिगरेटी ओढल्या त्याची किंमतही या ग्रंथाच्या मानधनातून वसूल झाली नाही. मार्क्ससारख्या प्रखर विचारवंताला आणि त्याच्यावर जिवापाड प्रेम करणार्‍या जेनीला सुमतीबाईंनी समजून घेतले आहे आणि त्याच्यासारखा एकाच वेळी हरणारा आणि जिंकणारा माणूस आपल्यासमोर उभा केला आहे.

* सुमतीबाईंनी अतिशय जिव्हाळ्याने मॅक्झिम गॉर्कीच्या आयुष्याचा शोध घेतला आहे. त्याच्या आयुष्यातील चढउतार, त्याची आंतरिक अस्वस्थता, जिवावर उदार होऊन त्याने केलेले प्रयत्न, उघड्या डोळ्यांनी पाहावी लागणारी त्या प्रयत्नांची निष्फलता, तरीही माणुसकीच्या आचेने त्याने जिवाच्या अंतापर्यंत केलेली धडपड, याचा आलेख सुमतीबाईंनी मोठ्या ताकदीने काढला आहे. आई, कन्फेशन आणि त्याचे आत्मचरित्र यांमागची प्रेरणा, जाणीव आणि उद्देश शोधून त्याच्या अंतरंगार्पंत पोचण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. लेनिनची मैत्री आणि लेनिनच्या राज्ययंत्रणेने त्याचा करून घेतलेला उपयोग, नंतर त्याची केलेली शिकार ही दारुण शोकांतिकाही रंगवली आहे. या महामानवांची चरित्रे लिहून मराठी वाचकाला अस्वस्थ आणि अंतर्मुख करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

* ‘छाया आणि ज्योती’ या पुस्तकात कसदार अशा स्त्री-व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देण्यात आली आहे. परकीय जगाचा अफाट व्यासंग आणि त्याची लालित्यपूर्ण मांडणी, हे सुमतीबाईंचे विशेष आहे. यातल्या काही स्त्रिया महापुरुषांच्या छाया होत्या तर काही स्त्रिया स्वतःच तळपणार्‍या ज्योती होत्या. मेरी टॉड लिंकन आणि सोन्या टॉलस्टॉय ह्यांनी आपल्या पतीच्या जीवनात जे उत्पात घडवले, तेही दाखवले आणि साधना आमटे आणि जेनी मार्क्स ह्यांनी अत्यंत कठीण प्रसंगीही पतीला दिलेली साथ याचे वर्णनही केले आहे. एमिली पँखहर्स्ट, एमिली ब्राँटे, हॅरियट ब्रोचर स्टो आणि जेन अ‍ॅडम्सच्या स्वकर्तृत्वाचा सुमतीबाईंनी वेध घेतला आहे. आवेगपूर्ण, आवेशपूर्ण आणि सहानुभूतीने ओतप्रोत भरलेल्या भाषेतून जिद्दी आणि लढाऊ स्त्रियांच्या जीवनात निरनिराळे रंग भरले आहेत तर ख्रिस्तिना झरीना या सम्राज्ञीची दारुण शोकांतिकाही रंगविली आहे.

Sumati Deosthale | सुमती देवस्थळे ह्यांची पुस्तके