Home / Authors / Prof. Milind Joshi | प्रा. मिलिंद जोशी
Prof. Milind Joshi | प्रा. मिलिंद जोशी
Prof. Milind Joshi | प्रा. मिलिंद जोशी

प्रा. मिलिंद जोशी

प्रचंड जनसंपर्क, अफाट व्यासंग, शैलीदार लेखन, अमोघ वक्तृत्त्व, कुशल प्रशासन आणि सकारात्मक साहित्यकारण यामुळे प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांचे नाव महाराष्ट्राला सुपरिचित आहे.

* सिव्हील इंजिनिअरिंगचे प्राध्यापक असणारे जोशी हे शब्दांचे बांधकाम करण्यातही वाकबगार आहेत. त्यांनी ललितलेखन, कथा, व्यक्तिचित्रे, तत्त्विंचतनपर लेखन, चरित्रे, आत्मपर लेखन अशा विविध वाङ्मयप्रकारात कसदार साहित्यनिर्मिती केली असून त्यांची १७ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी दैनिक सकाळ, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, सामना, नवाकाळ, पुण्यनगरी आदी नामवंत वृत्तपत्रांत स्तंभलेखन केले आहे.

* लोकमान्य टिळक आणि साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी स्थापन केलेली महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेच्या ११५ वर्षांच्या इतिहासातील प्रा. मिलिंद जोशी हे सर्वात तरुण आणि सिव्हील इंजिनिअर असणारे कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक उपक्रमांद्वारे महाराष्ट्र साहित्य परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख केले.

* अंतर्नाद’ या मराठीतील दर्जेदार मासिकात सलग साडेचार वर्षे त्यांनी पुस्तक समीक्षणाचे सदर लिहिले. आकाशवाणीवरील "चिंतन’ या सदरासाठी तसेच दूरचित्रवाहिन्यांसाठी त्यांनी लेखन केले असून अनेक मान्यवरांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत.

* त्यांना गदिमा चैत्रबन पुरस्कार, आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार, पुणे फेस्टिव्हल अ‍ॅवॉर्ड, अनंत काणेकर पुरस्कार अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातल्या औदुंबर, आचार्य अत्रे, यांसह दहांहून अधिक प्रतिष्ठित साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

* प्रा. मिलिंद जोशी हे महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे चरित्रकार आहेत. प्रा. मिलिंद जोशींनी लिहिलेले ‘प्राचार्य’ हे चरित्र खूपच गाजले. प्रा. जोशी हे महाराष्ट्रातील अभ्यासू आणि ख्यातनाम वक्ते म्हणून सर्वपरिचित असून त्यांची पुण्याच्या नामवंत वसंत व्याख्यानमालेसह महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच बृहन्महाराष्ट्रात आणि परदेशातही विविध विषयांवर शेकडो व्याख्याने झाली आहेत.

Prof. Milind Joshi | प्रा. मिलिंद जोशी ह्यांची पुस्तके