Home / Authors / Kiran Purandare
Kiran Purandare

किरण पुरंदरे हे एक मराठी पक्षितज्ज्ञ, निसर्ग अभ्यासक व लेखक आहेत.

किरण पुरंदरे यांचे बीकॉमपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनीेे वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड(WWF) यांच्या तर्फेे स्कॉटलंड येथे जॉर्डनहिल कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये पर्यावरण शिक्षण या विषयाचा अभ्यासक्रम केला. 'मुलांबरोबरचे संवादकौशल्य' या विषयात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले आहे.

* पुरंदरे यांना लहानपणापासूनच भटकंतीची खूप आवड. शाळेतून वेळ मिळेल तेव्हा मित्र एकत्र येऊन सतत भटकायचे. ट्रेकिंग करणे आणि रानमेव्यावर ताव मारणे हा त्यांचा छंद होता. एकदा वर्तमानपत्रात पक्षिनिरीक्षणाच्या सहलीचे एक निवेदन वाचून ते सहलीला गेले.

* डॉ. रमेश बिडवे यांनी त्यात मार्गदर्शन केले आणि पुरंदरे यांच्या करिअरला कलाटणी मिळाली. पक्षिजीवनाविषयीच्या कुतूहलामुळे त्यांनी बिडवे यांच्याबरोबर नियमित पक्षिनिरीक्षणाचा आरंभ केला. पुढे स्वतंत्र भटकंती करत पक्ष्यांचा अधिवास, त्यांचे खाद्य, निसर्ग साखळीतील त्यांची भूमिका, पक्ष्यांची वैशिष्ट्ये यांवर त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली.

देशभरातील जंगले पालथी घालून किरण पुरंदरे हे पक्षिजीवनावर संशोधन करीत आले आहेत. वर्षभरात ऋतूनुसार जंगलातील वन्यजीवनात आणि वनसंपदेमध्ये कसे बदल होत जातात, हे जाणण्यासाठी त्यांनी नागझिरा या जंगलात सलग ३६५ दिवस राहून गूढ जंगलातील वास्तव अभ्यासकांसमोर आणले. त्यांचा नागझिरा जंगलामध्येही आदिवासींच्या सहभागातून वनसंवर्धनाचा अनोखा उपक्रम १२ वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. तेथील गोंड आदिवासींमध्ये जागृती करून त्यांना रोजगाराची साधनेही त्यांनी मिळवून दिली आहेत. त्या अनुभवांवर आधारित त्यांचे एक पुस्तकही आहे.

शहरातील शाळांबरोबरच दुर्गम भागातील मुलांपर्यंत पोहोचून त्यांना निसर्ग संरक्षणाचे धडे देण्यासाठी वर्षभर त्यांची भटकंती सुरू असते. निसर्गाचे निरीक्षण लिहून ठेवण्याची आवड त्यांना आहे व अनेक पुस्तकांमधून त्यांनी निसर्गाचे विविध पैलूही उलगडून दाखविले आहेत. पक्षिसंवर्धनाची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने त्यांनी २०१२साली पुण्यात ' किकाज बर्ड क्लब ' सुरू केला.

पुरंदरे यांना बहुतांश पक्षांचे आवाज हुबेहुब काढता येतात आणि त्यांनी आवाज काढल्यावर पक्षीही प्रतिसाद देतात. याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही त्यांनी केले आहे.

वन्यप्राण्यांसाठी त्यांनी ' निसर्गस्नेही तळी ' ही संकल्पना पुढे आणली. उन्हाळ्यात जंगलांत पाण्याची टंचाई भासू नये यासाठी ही तळी उत्तम असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे वनविभागाच्या सहभागातून तीनशेहून अधिक तळी या जंगलांत तयार करण्यात आली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुणे वन विभागाने त्यांना मानद वन्यजीव रक्षकाची जबाबदारी दिली.

किरण पुरंदरे यांनी वृत्तपत्रांतून पक्षिजीवनावर यशस्वीरीत्या सदरलेखन केले आहे.

किरण पुरंदरे हे अनिल अवचट यांचे मामेभाऊ आहेत.

किरण पुरंदरे यांची पुस्तके
आभाळवाटांचे प्रवासी
चला पक्षी पहायला
पक्षी - आपले सख्खे शेजारी
पक्षी पाणथळीतले
मुठेवरचा धोबी
सखा नागझिरा

Kiran Purandare ह्यांची पुस्तके