Home / Authors / Kamala Subramanhyam / Trans - Magesh Padgaonkar | कमला सुब्रमण्यम - मंगेश पाडगावकर
Kamala Subramanhyam / Trans - Magesh Padgaonkar | कमला सुब्रमण्यम - मंगेश पाडगावकर
Kamala Subramanhyam / Trans - Magesh Padgaonkar | कमला सुब्रमण्यम - मंगेश पाडगावकर

कमला सुब्रमण्यम :- जन्म :- ४ ऑक्टोबर १९१६ मृत्यू : २१ फेब्रुवारी १९८३

कन्नड भाषेतील प्रख्यात कवी आणि नाटककार टी पी, कैलासम यांच्या या कन्या. विद्वान प्राध्यापक बी. एम. श्रीकंठय्या हे श्रीमती कमला यांचे गुरू होते.

प्राचीन आणि आधुनिक अशा दोन्ही काळांतील साहित्याचा त्यांचा उत्तम व्यासंग होता. इंग्रजी साहित्याचा, विशेषत: शेक्सपिअरचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. तत्त्वज्ञान या विषयावर, त्याप्रमाणेच बायबल आणि भगवद्गीता यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते.

* मद्रास येथील कान-नाक-घसा यांचे शस्त्रवैद्य डॉ.व्ही. एम. सुब्रह्मण्यम यांच्याशी श्रीमती कमला यांचा १९३७ साली विवाह झाला. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी आपल्या लेखन-वाचनाच्या साधनेत खंड पडू दिला नाही.

* साहित्यावरच्या या उत्कट प्रेमामुळेच त्यांनी भारतातीला प्राचीन महाकाव्ये आणि पुराणे यांच्या अध्ययनाकडे आपले लक्ष वळवले. हे अध्ययन म्हणजे केवळ पुस्तकी पांडित्य नव्हते. त्यांच्या संवेदनशील रसिकतेचा तो श्रेष्ठ अविष्कार होता.

* महाभारताची कथा त्यातल्या काव्यात्मतेला जराही बाधा न आणता सारांश रूपाने सांगावे, असा ध्यास श्रीमती कमला यांनी घेतला होता. श्रीमती कमला यांनी महाभारताची गतिमानता आपल्या उत्कट नाट्यपूर्ण शैलीने साकार केली आहे. श्रीमती कमला यांनी सांगितलेली ही महाभारताची कथा वाचताना उलगडत जाणारे प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष घडताहेत, असे वाटते.

* या महाभारताची पहिली आवृत्ती १९६५ साली प्रसिध्द झाली. इंग्रजीत लिहिलेल्या या महाभारताला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

* २००९ साली या ग्रंथाची पंधरावी आवृत्ती प्रसिध्द झाली. महाभारताप्रमाणेच श्रीमत भगवत आणि वाल्मिकी-रामायण यांचेही असेच सारांशरूप भाषांतर त्यांनी केले.

* या तिन्ही ग्रंथांची एकूण छापील पाने दोन हजारांहून अधिक भरतील इतकी आहेत.

* तरुण आणि .वृध्द अशा दोन्ही वाचकांसाठी श्रीमती कमला सुब्रमण्यम यांनी हा अमोल ठेवा ठेवला आहे.


मंगेश पाडगावकर :

पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.

*** मंगेश पाडगांवकरांचे अनुवादित साहित्यातील योगदान
साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद १९५७ साली प्रकाशित झाला होता आणि २००९-१०मध्ये ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला. कमला सुब्रह्नण्यम या लेखिकेच्या मूळ इंग्रजी महाभारताचा पाडगांवकरांनी 'कथारूप महाभारत' या नावाचा दोन-खंडी अनुवाद केला आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व साहित्यप्रकार आणि विविध विषय यांत आहेत.[ संदर्भ हवा ]

*** त्यांनी केलेल्या एकूण अनुवादांमधे १७ अमेरिकन साहित्यकृतींचे अनुवाद आहेत. याशिवाय जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘Education And The Significance Of Life’ या पुस्तकाचा ‘शिक्षण : जीवनदर्शन’ या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. निवडक समकालीन गुजराती कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘अनुभूती’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. मीरा, कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. आणि ‘ज्युलिअस सीझर’, ‘रोमिओ आणि ज्युलिएट’, ‘दी टेम्पेस्ट’- [वादळ] या शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे ‘मुळाबरहुकूम भाषांतरे’ही त्यांच्या नावावर आहेत. पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि परिशिष्टांत भाषांतराविषयीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. अशाच दीर्घ प्रस्तावना ‘कबीर’ आणि ‘सूरदास’ या पुस्तकांनाही आहेत. अनुवादांचा आस्वाद घेताना या प्रस्तावनांमधील विविध संदर्भांचा उपयोग होतो.

*** पाडगावकरांच्या साहित्यिक कारकिर्दीच्या पटावर ‘मीरा’ या अनुवादित पुस्तकाचा प्रवेश १९६५ साली झाला. हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केले असून त्याला काकासाहेब कालेलकर यांची सविस्तर प्रस्तावना आहे. त्यात मीराबाईच्या चरित्राविषयी, तिचे भावजीवन आणि काव्य या विषयी लिहिलेले आहे. मीराबाईचे काव्य पाडगावकरांनीच प्रथम मराठीत आणले असे त्यात म्हटले आहे.

Kamala Subramanhyam / Trans - Magesh Padgaonkar | कमला सुब्रमण्यम - मंगेश पाडगावकर ह्यांची पुस्तके