Home / Authors / G. M. Kulkarni
G. M. Kulkarni

गो. म. कुलकर्णी पहिला समीक्षाग्रंथ रसग्रहण : कला आणि स्‍वरूप (१९५२) साली प्रसिद्ध झाला.

* त्‍यानंतर खंडणमंडन (१९६८ ),
* साद-पडसाद (१९७५),
* वाटा आणि वळणे (१९७५),
* मराठी साहित्‍यातील स्‍पंदने (१९८५),
* भारतीय साहित्‍याचे निर्माते : वा. म. जोशी (१९८६ ),
* मराठी कविता : काही रूपे, काही रंग (१९९१ ),
* मराठी नाट्यसृष्‍टी (१९९३),
* आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्‍कृतिक पार्श्‍वभूमी (१९९४),
* संत साहित्‍य : काही निरीक्षणे (१९९४),
* मराठी समीक्षेची वाटचाल (१९९८),
* बारा साहित्यिक (१९९८ ),
* मराठी ग्रामीण साहित्‍य : परिसर आणि प्रवाह (१९९९),
* ग्रंथकीर्तन (२०००),
* साहित्‍याचा स्वभाव (२००८ )
हे समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाले.
* त्यांचा प्राची (१९५४ ) हा काव्‍यसंग्रहही प्रकाशित आहे.
* त्यांनी द. गो. कर्वे यांच्‍या रानडे – द प्रॉफेट ऑफ लिबरेटेड इंडिया या ग्रंथाचा स्‍वतंत्र भारताचे द्रष्‍टे न्‍या. रानडे (१९४१ ) हा अनुवाद केला.

* ऑस्‍कर वाईल्‍ड यांच्‍या लेडी विडंरमेअर्स फॅन या नाटकाचा श्री. र. भिडे यांच्‍या सहकार्याने ती तशी नव्‍हती (१९५७ ) आणि साहित्‍य अकादमी प्रकाशित मल्‍याळम साहित्‍याचा इतिहास (१९८४ ) हे अनुवादही त्यांनी केले.

* संपादित ग्रंथात श्री. र. भिडे यांच्‍या सहकार्याने मराठीचे स्‍वरूपदर्शन (१९५४),
* वि. म. कुलकर्णी यांच्‍या सहकार्याने झपूर्झा (१९६२, ),
* कृ. ब. निकुंब यांच्‍या सहाकार्याने पत्रंपुष्‍पम (१९६४,),
* साहित्‍यपराग (१९६९),
* हृदयशारदा, वि. वा. शिरवाडकर यांच्‍या सहकार्याने चांदणवेल, (१९७२),
* पुण्‍याई (१९७४, अ. भा. मराठी साहित्‍य संमेलन, पुणे स्‍मरणिका),
* श्री. शिवछत्रपती : एक स्‍मरण (१९७५, कला वाणिज्‍य महाविद्यालय, कराड ),
* अभिरुची : ग्रामीण आणि नागर (१९७६,अ. भा. मराठी साहित्‍य संमेलन, कराड),
* वि. त्र्यं. शेटे यांच्‍या सहकार्याने महाराष्‍ट्राची सत्त्वधारा : रा. चिं. ढेरे अभिनंदन ग्रंथ (१९८१),
* नवसमीक्षा – काही विचार प्रवाह (१९८२,
* ह. श्री. शेणोलीकर षष्‍ठ्यद्बिपूर्तिनिमित्‍त समीक्षेच्‍या शाखातील विवेचक लेखांचे संपादन ),
* वा. ल. कुलकर्णी यांच्‍या सहकार्यानेवा. म. जोशी-साहित्‍य दर्शन (१९८५),
* दलित साहित्‍य : प्रवाह आणि प्रतिक्रिया (१९८६ ),
* वा. रा. ढवळे लेखसंग्रह, ,
* व. दि. कुलकर्णी यांच्‍या सहकार्याने मराठी वाङ्ममयाचा इतिहास खंड-६, भाग १ व भाग २ (१९८८),
* विद्याधर पुंडलिक यांच्‍या सहकार्याने दलित साहित्‍य : एक सामाजिक सांस्‍कृतिक अभ्‍यास (१९९२),
* दत्तात्रय पुंडे यांच्‍या सहकार्याने वाङ्मयेतिहास : सद्यस्थिती आणि अपेक्षा (१९९५),
* पुन्‍हा वामन मल्‍हार (२०००),
* वाङ्मयेतिहास : एक मुक्‍त संवाद, (२०१५),
* सुषमा करोगल यांच्‍या सहकार्याने सौंदयोत्‍सव (१९९६) या ग्रंथांचा समावेश होतो.

* गो. म. हे जीवनवादी समीक्षक म्‍हणून ओळखले जातात. त्‍यांच्‍या प्राची या काव्‍यसंग्रहात प्रकाश पूजनाच्‍या आशावादी वृत्तीबरोबर यंत्रयुगाचे औपरोधिक चित्रण येते.

* त्‍यांनी मराठीत प्रथमच समाजशास्‍त्रीय समीक्षा पद्धतीचा पद्धतशीर तत्त्वविचार आणि आचार मांडलेला आहे. तसेच वाङ्ममयेतिहासकारांना पडणारे अनेक प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित केलेले असून त्‍यांच्‍या सोडवणूकीची दिशादर्शक सूत्रेही सांगितली आहेत.

* त्यांनी आधुनिक मराठी साहित्‍याची जशी समीक्षा केली आहे तशीच संत साहित्‍याचीही समीक्षा केली आहे. अध्‍यात्‍म व काव्‍य यांच्‍या एकात्‍मतेत संतांचे स्‍वतंत्र साहित्‍यशास्‍त्र शोधता येते व ते शोधण्‍याची अर्थपूर्ण व मौलिक दिशा दाखवून संत साहित्‍याच्‍या स्‍वरूप मीमांसेला पूर्णता देण्‍याचा मार्ग त्‍यांनी दाखविला आहे. त्‍यांच्‍या समीक्षेत काव्‍य समीक्षा अधिक उठून दिसते. मराठी कवितेच्‍या प्रकार – उपप्रकारांची जशी त्‍यांनी तत्त्वचर्चा केली तशी कवितांची नमुनेदार संपादने केली. त्‍याचप्रमाणे नवसाहित्‍य, ग्रामीण साहित्‍य व दलित साहित्‍य या साहित्‍य प्रवाहांची त्‍यांनी सखोल व सहृदयतेने चर्चा केली. नाटक, कादंबरी, कथा, निबंध, चरित्र-आत्‍मचरित्र या वाङ्ममयप्रकारावरील त्‍यांचे लेखन हे जसे त्‍या त्‍या साहित्यिकाची बलस्‍थाने दाखविणारे आहे तसेच त्‍यांच्‍या मर्यादाही दाखविणारे आहे.

* संदर्भ समृद्ध व तौलनिक विवेचन, ऐतिहासिक दृष्‍टी, सारख्‍याच तोलामोलाने खंडण आणि मंडन, नवा विचार ग्रहण करण्‍यास सदैव सिद्ध असलेली प्रसन्नावृत्‍ती त्‍यांच्‍या ठायी आहे.

* १९९३ मध्‍ये गुलबर्गा येथे संपन्‍न झालेल्‍या दुसऱ्या कर्नाटक राज्‍य मराठी साहित्‍य संमेलनाचे ते अध्‍यक्ष होते.

* रा. श्री. जोग पारितोषिक, महाराष्‍ट्र फौंडेशन पुरस्‍कार (१९९५ ),
* रंगत संगत संस्‍थेतर्फे दिला जाणारा माधव मनोहर पुरस्‍कार (१९९६ ) इत्यादी पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत.

* गो. म. हे सामाजिक जाणिवांची प्राची उजळणारे कवी, विस्‍तृत वाङ्ममयपटाचे चिंतनकार, समन्‍वयशील वृत्‍तीचे समीक्षक, ललित आणि वैचारिक ग्रंथांचे सिद्धहस्‍त भाषांतरकार होते.

G. M. Kulkarni ह्यांची पुस्तके