Home / Authors / Dr. Chhaya Mahajan - डॉ. छाया महाजन
Dr. Chhaya Mahajan - डॉ. छाया महाजन
Dr. Chhaya Mahajan - डॉ. छाया महाजन

छाया महाजन या मराठीतील महत्त्वाच्या लेखिका आणि अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहेत. गेल्या चार दशकांपासून विविध वाङ्मयप्रकारांमधून त्यांनी महत्वाची आणि मौलिक स्वरूपाची निर्मिती केली आहे. त्यांनी ‘काव्य’ या वाङ्मय प्रकारापासून लेखनाला सुरुवात केली. कथा, कादंबरी, ललितगद्य अनुवाद, बालसाहित्य, या प्रकारामधून त्यांची ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या कथात्म साहित्याने वेगळी अशी मुद्रा मराठी साहित्यविश्वावर उमटविली आहे.

विविध प्रकारच्या आशयसूत्रांचा निरंतर शोध हे त्यांच्या कथात्म साहित्यचे वेगळेपण आहे. बहुविध प्रकारची आशयसूत्रे, जीवनदृष्टीची नित्यनूतनता आणि अनोख्या रुपबंधाने त्यांचे कथात्म साहित्य विनटलेले आहे. सामाजिक जीवनाचा विस्तृत चित्रफलक त्यांच्या लेखनात आहे. मानवी नातेसंबंधातील सूक्ष्मतर जीवनानुभवाचे चित्रणाबरोबरच अलक्षित अशा अनुभवप्रदेशांचे चित्रणाने त्यांच्या लेखनाचा पासरा अधिक व्यापक झाला आहे. ‘तनअंधारे’ ‘कॉलेज’ आणि ‘होरपळ’ या कादंबरीतून त्यांनी विविध अनुभवसूत्रांचा घेतलेला शोध विलक्षण स्वरूपाचा आहे. मानवी नातेसंबंधातील सूक्ष्म पदर, गुंतागुंतीची उकल त्यांच्या लेखनात आहे. स्त्री पुरुषातील प्रेमानुभवाच्या असंख्य परींचा शोध त्यांच्या कथात्म सृष्टीत आहे. स्त्रीचित्रणातील बहुलदृष्टीने त्यांच्या लेखनाचा पैस अधिक विस्तारला आहे. एकंदर मानवी-भारतीय समाजरचनेतील इतरेजणांच्या उपस्थितील स्त्रीचे बहुमुखी चित्रणाने त्यांच्या लेखनाची इयत्ता वाढली आहे. अगदी लैंगिक अनुभवावर असणाऱ्या संस्कृती परिमाणांचा धाडसी शोध त्यांच्या लेखनात आहे. त्यातली खोली, गुंतागुंत आणि बहुपरिमाणात्मकता त्यांच्या कथात्म साहित्यात आहे. त्यांच्या लेखनातील स्त्रीविषयक चित्रणदृष्टी एकारलेली नाही. तर तिच्यातील अनेकआवाजीपणामुळे तिची परिमाणात्मकता वाढली आहे. एकंदर सामाजिक व्यवस्थेतील ताणतणाव त्या रेखाटतात. समाज संदर्भात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोण हा निर्मम स्वरूपाचा आहे. त्यामुळे काळ्यापांढऱ्या रंगात पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोण नाही, ज्याने त्यांचा चित्रणप्रदेश हा बहुल स्वरूपाचा आहे. ‘कॉलेज’ या त्यांच्या बहुचर्चित कादंबरीतून शैक्षणिक जीवनातल्या मूल्यऱ्हासाचे आणि पडझडीचे चित्रण आहे. नवे प्रदेश, निसर्ग आणि भाषा या दृष्टीने देखील त्याचे कादंबरीलेखन महत्त्वाचे आहे. त्यांची कथादृष्टी अभिनव अशी आहे. तरुण मुलांच्या भावविश्वापासून कुटुंब जीवनाच्या अनेक मिती परिमाणं तसेच स्त्री जीवनाविषयीचे व्यापक भान व वृद्धांच्या भावविश्वाच्या अनोख्या कहाण्यांनी त्यांचा कथाचित्रणप्रदेश सजलेला आहे. मानवी नात्यातील निरंतर ओढ, उत्कटता, वळणे, गुंते तणाव आणि शोकांतभावाचे चित्र त्यांच्या कथेत आहे. मुलखावेगळ्या माणसांची व्यक्तिचित्रे आणि त्यांच्या करूणकथांनी ती आकाराला आली आहे. मानवी देहमनातील काळोख्या जीवनाची रूपचित्रे त्यानी रेखाटली. त्यांच्या कथेत घराचा आणि कुटुंबाचा अवकाश हा महत्वाचा ठरतो. कुटुंब जीवनाचा इतका चमचमणाऱ्या बहुपदरी अवकाशाने त्यांची कथागुंफण झाली आहे.

डॉ. महाजन यांच्या ललितगद्यात लेखनात आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ चिंतनाचा आविष्कार आहे. भूतकाळातील आठवणीरूपी चांदण्या आणि मावळत्या क्षणांचा पाठलाग त्यांच्या ललितगद्य लेखनातून आविष्कृत झाला आहे. तसेच त्यांचे साहित्य-संस्कृती कलाविषयक विश्वभानदेखील व्यक्त झालेले आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा राजकीय प्रवास कथन करणारे चरित्र उल्लेखनीय ठरले. तर अनुवादाच्या क्षेत्रामध्ये प्रेमचंद, गि. द. मोपासा, रवींद्रनाथ टागोर, पुनत्तील कुन्हअब्दुल या भारतीय तसेच विश्वभरातील प्रतिभावंतांची अनुवादभेटी त्यांनी घडवून आणली. त्यांच्या अनुवादकार्याने मराठीचे अनुवादक क्षेत्र विस्तारले आहे. लहान मुलांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या बालसाहित्याची निर्मिती त्यांनी केली आहे. तसेच संस्थात्मक पातळीवर भाषासाहित्याविषयीचे मूलभूत कार्य त्यांनी केले आहे. यात अनुवाद व कोशकार्याचा समावेश आहे. साहित्य अकादमीच्या इंग्लिश लिटररी डिक्शनरी मराठी विभागाचे संपादन त्यांनी केले आहे.

डॉ. छाया महाजन यांनी स्वतःचे स्वतंत्र अशा प्रकारचे वेगळे कथाविश्व साकारले आहे. एक संवेदनशील स्त्री असल्यामुळे आणि स्त्रियांना येणाऱ्या बऱ्यावाईट अनुभवांना सामोरे गेल्यामुळे, त्यांच्या कथा कादंबरी मधून येणारी स्त्री ही विविध प्रश्न, समस्या घेऊन येताना दिसते. त्यांच्या लेखनाचे विषय वेगवेगळे आहेत. माणसाच्या वृत्ती-प्रवृत्ती, सामाजिक स्थित्यंतर आणि भवताल पर्यावरणाच्या विचारातून लेखन त्या करतात. डॉक्टर छाया महाजन यांचे साहित्य अतिशय वास्तववादी व जीवनाच्या जवळ जाणारे आहे. जीवनातल्या एरव्ही निसटून जाणाऱ्या अनुभवाची मांडणी अत्यंत थोडक्या शब्दात त्या करतात. त्यांची साहित्याची भाषा मार्मिक, चित्रमय आहे व व्यक्तिचित्रण सजीव आहे. छोटी वाक्य, काव्यमय शैली, नेमक्या शब्दात व्यक्त होणारा आशय आणि भावसंबंधाचे तरल चित्रण ही त्यांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील.

त्यामुळे डॉ. छाया महाजन यांची वाङ्मयनिर्मिती मौलिक स्वरूपची ठरते. ऐंशीनंतरच्या मराठी वाङ्मयाच्या विस्तार पार्श्वभूमीवर सामाजिक जीवनाची बृहद चित्रे त्यांनी त्यांच्या साहित्यातून रेखाटली. भारतीय कुटुंब जीवनातील बदलांचे विविधतापूर्ण चित्रण त्यांच्या लेखनात आहे. आशयसूत्रांतील व्यापकता, अनेक नवे विषय, अनोखे भूप्रदेश आणि वैशिष्टयपूर्ण रूपबंध हे त्यांच्या कंदर साहित्याचे वैशिष्ट्य आहे. लघुतमकथा नावाचा एक प्रकार त्यांनी मराठीमध्ये रूढ केला. नव्या वळणाची कथा त्यांनी लिहिली. मराठी लेखनसंवेदनस्वभावाचा परीघ ओलांडून काही नव्या विषयांची धाडसी मांडणी त्यांनी केली. बदलत्या सामाजिक जीवनाच्या पार्श्वभूमीवर एकल अनुभवसूत्रांऐवजी अनेकविध अनुभवसूत्रांचा शोध त्यांच्या सबंध लेखनात आहे. त्यामुळे ऐंशीनंतरच्या महत्त्वाच्या लेखिका म्हणून मराठी लेखनपरंपरेत त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो.

वैयत्तिक माहिती:

छाया महाजन यांचा जन्म आणि सुरुवातीचे शिक्षण अहमदनगर येथे झाले. बी.ए, एम. ए, डी. एच. ई ला त्या मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद च्या गुणवत्ता यादीत दुसऱ्या क्रमांकावर झळकल्या. पुढे त्यांनी ‘पॉल स्कॉटच्या कादंबरीतील स्त्री व्यक्तीमहत्त्व’ या विषयातून पीएच. डी. पदवी संपादन केली. १९९० साली डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालय येथे इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्या रुजू झाल्या. पुढे प्रपाठक, इंग्रजी विभाग प्रमुख म्हणून काम केले. याच महाविद्यालयात २००६ ते २००९ या काळात प्राचार्यपद भूषविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे पदव्युत्तर विभागात प्रपाठक आणि पीएच. डी. मार्गदर्शक म्हणून देखील काम केले. इ. स. २००० पासून औरंगाबाद खंडपीठाच्या लोकन्यायालयामध्ये पॅनल ऑफ जजेस मध्ये जज म्हणून, २००८ पासून बनारस विश्वहिंदू विद्यापीठ वाराणसी येथे (मेंबर ऑफ लॉर्ड्स) विधिसभा सदस्य म्हणून, तसेच देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले आहे. जालना येथे १७,१८ जानेवारी, २०१५ रोजी झालेल्या मराठवाडा लेखिका संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. विविध वृत्तपत्रांतून त्यांचे शोधनिबंध इंग्रजी, मराठीमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत ते त्यांनी देश, विदेश व राज्य पातळीवर सादर केलेले आहेत. इंग्रजी साहित्य, स्त्रीवाद साहित्य व विविध विषयांवरील लेख, मुलाखती, ललितगद्य प्रसिद्ध झालेले आहे. प्रौढसाक्षरांसाठी व निरंतर शिक्षण यासाठी त्यांनी लिखाण केलेले आहे. अनेक दिवाळी अंकांतून त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे.लोकसत्ता, लोकमत, दिव्य मराठी या वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापीठ तसेच शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्यकृतींचा समावेश करण्यात आलेला आहे. डॉक्टर छाया महाजन नवलेखकांना मार्गदर्शन करतात व प्रोत्साहन देतात. आतापर्यंत अनेक पुस्तकांना प्रस्तावना, ब्लर्ब देऊन त्यांच्या लिखाणाची सकारात्मक समीक्षा त्यांनी केलेली आहे. साहित्यविषयक, सामाजिक, स्त्रीविषयक, शैक्षणिक परिषदा तसेच विविध साहित्य संमेलने, सामाजिक परिसंवाद व चर्चा यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि त्यांची अध्यक्षपदेही भूषविलेली आहेत. अनेक सामाजिक, साहित्यिक आणि शैक्षणिक कार्यात त्यांचा सहभाग आहे आणि ह्या क्षेत्रांमध्ये त्या अजूनही सक्रियपणे कार्यरत आहेत.

Dr. Chhaya Mahajan - डॉ. छाया महाजन ह्यांची पुस्तके