Home / Authors / Dr. Ajeet Kembhavi | डॉ. अजित केंभावी
Dr. Ajeet Kembhavi | डॉ. अजित केंभावी
Dr. Ajeet Kembhavi | डॉ. अजित केंभावी

* डॉ. अजित केंभावी एक नामवंत खगोलशास्त्रज्ञ आहेत. पुण्यातील आयुका सेंटरचेही ते संस्थापक-सदस्य आहेत.
* कर्नाटकातील हुबळी येथे १९५० मध्ये अजित केशव केंभावी यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठाच्या रुईया कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्रात बीएससी आणि एमएससी पदवी घेतली. पुढे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेतून प्रा. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी मिळवली. त्यानंतर तेथेच संशोधक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पदव्युत्तर पदवीनंतरच्या संशोधनासाठी त्यांना केंब्रिजच्या खगोलशास्त्र इन्स्टिट्यूटची फेलोशीपही मिळाली होती.

* १९८८ मध्ये स्थापन झालेल्या पुण्यातील आयुका या संशोधन केंद्रात ते सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. २००९ मध्ये ते या केंद्राचे संचालक झाले. या पदावर त्यांनी ऑगस्ट २०१५ पर्यंत काम केले. सध्या ते या केंद्राचे मानद प्राध्यापक आहेत. त्यांच्या संशोधनात त्यांनी आकाशगंगा आणि अवकाशातील तत्सम बाबींवर लक्ष केंद्रित केले होते. तीस मीटरची दुर्बीण आणि लिगो इंडिया प्रकल्पावरही त्यांनी काम केले. केंभावी यांनी आभासी वेधशाळा या भारतीय प्रकल्पाचे नेतृत्व केले. या प्रकल्पाचे व्यवस्थापन, विश्लेषण आणि सादरीकरण यासाठी त्यांनी सुमारे १५ वर्षे योगदान दिले. या व्यतिरिक्त विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) माध्यमातून इन्फोनेट प्रोग्राम सुरू करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे भारतातील विद्यापीठांना शैक्षणिक नियतकालिकांमध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्रणा वापरणे सोयीचे झाले.

* जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या विभागीय केंद्राच्या सहकार्याने राबविल्या जात असलेल्या माहिती प्रकल्पाचे ते सध्या प्रमुख आहेत. ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सल्लागार समितीचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेचे उपाध्यक्षही आहेत. केपटाउनमधील खगोलशास्त्र विकास कार्यालयाचे अध्यक्ष म्हणून, तसेच बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात.

* डॉ. केंभावी भारतातील तिन्ही विज्ञान संस्थांचे सहयोगी सदस्य आहेत. त्यांना उत्कृष्ट शास्त्रज्ञांसाठी यूजीसीतर्फे दिला जाणारा हरी ओम पुरस्कारही मिळाला आहे. त्यांचे १०० हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. खगोलशास्त्रात पीएचडी करणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. विज्ञान सोपे करून सांगण्याच्या त्यांच्या इंग्रजी, मराठी आणि हिंदीतील व्याख्यानांबद्दलही ते लोकप्रिय आहेत.