Home / Authors / Anjali Thakur | अंजली ठाकूर
Anjali Thakur | अंजली ठाकूर

* अंजली ठाकूर म्हणजे मराठी साहित्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या मातोश्री हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात मराठी साहित्याच्या प्राध्यापक होत्या. त्यामुळे अंजली ठाकूर यांना मराठी साहित्याबद्दलच्या प्रेमाचे बाळकडूच मिळाले आहे. महाराष्ट्राबाहेर राहूनदेखील मराठीचे अफाट वाचन त्यांनी केले आहे.
* भाषा शास्त्रसारख्या विषयात एम. ए. करून त्यांनी उस्मानिया विद्यापीठात प्रथम येत चॅन्सलर्स सुवर्णपदक मिळविले आहे. लग्नानंतर नागपूर येथे स्थिरावल्यावर नागपूर विद्यापीठातून एल.एल.बी. करून त्यातदेखील विद्यापीठात पहिल्या दहात त्यांनी क्रमांक मिळविला आहे.
* त्यानंतर त्यांनी जरा वेगळी पायवाट चोखाळली. सर्वांप्रमाणे व कुटुंबाची लीगल फर्म असूनदेखील त्यांनी कोर्टात प्रॅक्टीस न करता कोर्टातील प्रसंगांवर कथा लिहिणे सुरू केले. ‘न्याय कथा’ लेखनाची वेगळी वाट त्यांनी आखली व त्यात बरेचसे लेखन केले. पुण्यातील अ‍ॅडव्होकेट सुप्रिया सरवटे न्याय कथा स्पर्धेत त्यांनी २००४ ते २००७ असे सलग चार वर्षे बक्षिसे पटकावली. त्यातूनच त्यांना न्याय कथांचे पुस्तक प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी २००७ मधेच ‘न्याय अंतरीचा’ हे न्याय कथांचे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक महाराष्ट्र राज्य ग्रंथ समितीच्या शासनमान्य यादीसाठी निवडले गेले आहे.
* त्यांच्या ‘गन्ध हे नवे’ ह्या दुसर्‍या कथासंग्रहात वैद्यकीय व विज्ञानावर आधारित कथा आहेत.
त्यांची योगगुरू रामदेवबाबा यांचे चरित्र ‘योगगुरू रामदेवबाबा’ व प्रख्यात समाजसेवक श्री. बाबा आमटे व त्यांची दोनही मुले डॉ. विकास व डॉ. प्रकाश आमटे व त्यांचे कुटुंबीय यांचे चरित्र ‘एका अवलियाचा प्रपंच’ या नावाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
* त्यांनी ‘श्री गुरुचरित्र’देखील साध्या व सोप्या मराठीत लिहिले आहे. काही वैज्ञानिक उल्लेख व रोजच्या जीवनातील उदाहरणे देत त्यांनी गुरुचरित्र सोपे व तरुण वाचकांना आवडेल अशा प्रकारे लिहिले आहे.
* त्यांनी अनेक लोकप्रिय पुस्तकांचे अनुवादही केले आहेत – जसे ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‘द अ‍ॅडव्हांटेज इंडिया’, राकेश बक्षी यांचे ‘डायरेक्टर्स डायरीज’, ‘मदर टेरेसा’ इ.
* त्यांचे कायद्याचे ज्ञान व मराठीवरील प्रभुत्व लक्षात घेऊन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ‘कोटर््स ऑफ इंडिया – पास्ट टू प्रेझेंट’ हे पुस्तक अनुवादित करण्याचे काम दिले. हे अनुवादित पुस्तक ‘भारतीय न्यायालये – एक सिंहावलोकन’ या नावाने सर्वोच्च न्यायालयाने, त्यावेळच्या सरन्यायाधीश
न्या. शरद बोबडे यांच्या हस्ते प्रसिद्ध केले आहे.
* त्यांनी नाट्य-लेखनातही आपले कौशल्य दाखविले आहे. स्वत:च्याच न्याय कथेवर त्यांनी दोन अंकी सामाजिक नाटक ‘न्याय अंतरीचा’ हे लिहिले. त्याचे अनेक यशस्वी प्रयोगही झाले. आकाशवाणीसाठी देखील काही नभोनाट्ये त्यांनी लिहिली व ती प्रसारित झाली आहेत.
* अनेक नियतकालिके जसे की लोकसत्ता, लोकमत, माझी सहेली, विपुलश्री यातून त्या लेखन करीत असतात. साधी सोपी भाषा, प्रसंग रंगवून सांगण्याची कला यामुळे त्यांचे लेखन लोकांना भावते.

Anjali Thakur | अंजली ठाकूर ह्यांची पुस्तके