दिलीप माजगावकर

दिलीप गणेश माजगावकर ऊर्फ ‘दिगमा’ म्हणजे राजहंस प्रकाशनाचे सर्वेसर्वा. श्रीकांत गणेश माजगावर यांचे धाकटे बंधू. श्री.ग.मांनी सुरू केलेल्या ‘माणूस’ साप्ताहिकात दि.ग.मांनी 1966 मध्ये प्रवेश केला. ‘माणूस’कार श्री.ग.माजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपादनापासून मुद्रण-वितरणापर्यंत सर्व जबाबदाऱ्या दि.ग.मांनी अतिशय समर्थपणे सांभाळल्या. 1984 पासून त्यांनी ‘राजहंस प्रकाशना’ची सूत्रे हाती घेतली. सामाजिक बांधिलकीचे सजग भान, राजकारण-समाजकारण-अर्थकारणापासून ललित साहित्यापर्यंत आणि संगीत-नृत्य-नाट्य-चित्रपट-चित्रकला-शिल्पकला यांपासून तत्त्वज्ञान-विज्ञान-पर्यावरणापर्यंत अनेक विषयांमध्ये त्यांना कायम रस आहे. या साऱ्यांचे ‘राजहंस प्रकाशना’च्या पुस्तकांमध्ये प्रतिबिंब उमटत असल्याचे आपण पाहिले आहे.

नव्या, ताज्या दमाच्या लेखकांना प्रोत्साहन देण्याचे कसबही प्रकाशक म्हणून त्यांच्याकडे आहे.  कायम नव्या विषयांचा शोध आणि त्याची उत्तम हाताळणी हीच प्रकाशक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. याशिवाय वाचकांच्या आवडीची त्यांना उत्तम जाण आहे.  आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणभूत मानलेली निर्मितिमूल्ये या साऱ्यांची सुयोग्य सांगड घातलेल्या पुस्तकांचे वाचकांकडून भरभरून स्वागत होते. कालांतराने दि.ग.मांनी व्यवसायवृद्धीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात विविध ठिकाणी ‘राजहंस प्रकाशना’च्या कायमस्वरूपी प्रतिनिधींची नेमणूक केली. त्यायोगे पुस्तकवितरणाचे जाळे महाराष्ट्रभर पसरण्यास मदत झाली.

केवळ वितरणच नाही तर या केंद्रांतर्फे विविध सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. त्यामुळे राजहंसचा व्याप दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते. आजही येणाऱ्या प्रत्येक संहितेवर दि.ग.मांचे बारकाईने लक्ष असते. इतकेच नाही तर त्यावर सुरू असलेल्या कामातील प्रत्येक गोष्टीबाबत ते जाणून घेतात. काळानुसार स्वत:मध्ये बदल करण्याची, नवे तंत्रज्ञान जाणून घेण्याची त्यांच्यातील तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे. एकूण काय तर ‘राजहंस प्रकाशन’ मराठी पुस्तकविश्वात अग्रगण्य प्रकाशनसंस्था बनवण्यात दि.ग.माजगावकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे.