शून्यातून शंभराकडे
₹250
Offer Price: ₹225
मराठवाड्यातला बीड जिल्हा.
त्यातला खोकरमोहासारखा ग्रामीण भाग.
त्या भागातल्या छप्परबंद समाजाच्या
कष्टकरी, गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा.
काटेरी, कष्टप्रद अन् समस्या-आव्हानांनी भरलेल्या
आयुष्याचा धकाधकीचा प्रवास पार करत
या मुलानं यशोभरारी घेतली.
या भरारीसाठी त्याच्या पंखात बळ भरलं
त्याच्या आईवडलांनी, नातेवाइकांनी
आणि सगळ्यात जास्त गुरुजनांनी,
गावातल्या वडीलधऱ्या माणसांनी.
गावातल्या पुढे जाणाऱ्या प्रत्येक मुलाला ताकद पुरवण्याची
ही परंपरा खोकरमोहानं वर्षानुवर्षं जपली, कायम राखली.
हा सगळा व्यक्तिगत अन् सामूहिक प्रवास रेखाटणारं –
सगळ्या तरुणाईसाठी मोटिव्हेशनल ठरणारं –
शून्यातून शंभराकडे …
in stock
SHAIKH MAHBOOB G –
शून्यातून शंभराकडे …….. छप्परबंद समाजातील एक यशोभरारी.
नमस्कार,
ललित वाड.मयात राजहंस पाणपक्षी मोती खातो व तो नीर-क्षीर विवेक असतो अशी त्याची अलंकारीक विशेषता सांगीतली जाते.त्याप्रमाणे पुस्तक प्रकाशन क्षेत्रातील “राजहंस प्रकाशन” सुध्दा लेखक रुपी मोती उचलून त्यांना पुस्तकांच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचे कार्य करत आहे; त्यापैकी एक आहे छप्परबंद या मागास समाजातून पुढे आलेले सा.बा.विभागातील कार्यकारी अभियंता शेख सलीम साहेब लिखित “शून्यातून शंभराकडे….” हे आत्मचरित्र. त्यामुळे प्रथमतः राजहंस प्रकाशनाला माझा सलाम.
हे पुस्तक मी जेंव्हा रात्री हातात घेतले तेंव्हा वाटले की, यात असेल सलीम साहेबांची संपूर्ण जीवनगाथा मी असे केले ,मी तसे केले वगैरे वगैरे;पण बालपणीचा काळ कष्टाचा हे प्रथम प्रकरण वाचत असतांना त्यातील प्रसंग व बारकावे वाचून माझ्या बालपणीच्या आठवणी आपसकूच जागृत झाल्या व हे माझेच आत्मचरित्र मी वाचतो की काय असे वाटू लागले व एका बैठकीत मी अर्धे पुस्तक वाचून हाता वेगळे केले.ज्याचा जीवन प्रवास संघर्षमय व ग्रामीण पार्श्वभूमी असेल त्यांना हे पुस्तक म्हणजे स्वतःचेच आत्मचरित्र आहे असे वाटल्या शिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. ब-याचजणांच्या बाबतीत यातील केवळ पात्रांची नांवे, प्रसंग व स्थळ वेगळे असतील इतकेच.याचे मुख्य कारण म्हणजे लेखकाने कुठेही आपली शेखी न मिरवता आत्मस्तुतीही केलेली नाही व प्रसंगांची वास्तविक मांडणी करुन खरा प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे.
मुस्लीम समाजातील तसेच समाज कल्याण विभागातील बहुतांश जणांना माहित नसलेल्या छप्परबंद समाजाशी संबंधीत अनेक बाबी लेखकाने प्रकाशात आणून सर्वांच्या ज्ञानात नवीन भर घातली आहे. लेखकाने एकंदरच आपले कुटुंब, शाळा, गुरुजनवर्ग, वर्गमित्र,वर्गमैत्रिणी तसेच तेजोमय खोकरमोहा या गावातील सर्वधर्मिय सण ,धार्मिक उत्सव तसेच माझे तेजोमय गाव या प्रकरणात त्यांची मुलगी कु. इब्तिसाम फातिमा व आंतरराष्ट्रीय बुध्दीबळपटू मुलगा नुबैरशहा शेख यांच्या यशाचा उल्लेख करुन आठवणींना योग्य व समतोल उजाळा देऊन या सर्वांची एक प्रकारे कृतज्ञताच व्यक्त केली आहे असे मला वाटते.
स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविका, पदवी, स्नातकोत्तर पर्यंत अर्हता प्राप्त करण्याच्या जीवन प्रवासात केलेला संघर्ष,त्यातून आलेला अनुभव व मित्रांची व इतरांची पदोपदी मिळालेली साथ यांचा नुसता उल्लेख नसून प्रसंगानुरुप आवर्जून मित्रांचा व इतरांचा नामोल्लेख करुन मित्रच माझी खरी शक्ती आहेत हे ” मित्र संग्रहणे बल संपद्यते” या उक्ती प्रमाणे सप्रमाण त्यांनी सिध्दही केले आहे.
पुस्तक वाचतांना कुठेही कंटाळवाने होत नाही,त्यातच साठवणीतल्या आठवणी प्रकरणामध्ये मजेशिर प्रसंगाची आठवण करुन हलका फुलका विनोद निर्माण केला आहे. एकंदरच हे पुस्तक वाचतांना अभि.शेख सलीम साहेब हे एक चांगले पुत्र,विद्यार्थी,मित्र,पिता,लेखक,कलाकार,उत्कृष्ट अभियंता व उत्तम समुपदेशक (Motivator) आहेत याची प्रचीती येते.
पुस्तकातील 33 प्रकरणांना दिलेले शिर्षक त्यातील मसुद्यास समर्पक असून चित्रबध्द केलेल्या आठवणीत “ईश्वर अल्ला तेरो नाम….” हे शिर्षक सर्वधर्म समभावाची शिकवण देते. पुस्तकाचे मुखपृष्ठ व आतील मांडणी आकर्षक असून पुस्तकात कुठेही चुक आढळून आलेली नाही हे उत्तम मुद्रितशोधनाचे फलित आहे असे मला वाटते.
स्पर्धा परिक्षा देणा-या व जीवनात संघर्ष करणा-या सर्वांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी असून ते त्यांनी नक्कीच वाचावे व आपल्या संग्रही ठेवावे असे माझे प्रांजळ मत आहे.
एक चांगले आत्मचरित्र पुस्तकस्वरुपात लेखनबध्द केल्याबद्दल अभि.शेख सलीम साहेबांचे व त्यास प्रकाशित करुन आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल राजहंस प्रकाशनाचे अभिनंदन व आभार.
आपला एक वाचक,
शेख एम.जी.
शाखा अभियंता (जलसंपदा विभाग)
विष्णुपूरी प्रकल्प विभाग क्र.2,नांदेड.
भ्रमणध्वनि क्र.9370197910
ई-मेल- reyyansk123@gmail.com
MD. YUNUS. Chartered Engineer. Aurangabad. –
Best book i ever read in my life….
आर एस नाईकवाडी, उपशिक्षणाधिकारी मुंबई –
मा. प्रकाशक
राजहंस प्रकाशन प्रा. लि पुणे
सर आपण प्रकाशित केलेले “शून्यातून शंभराकडे” हेआत्मचरित्र वाचले
एका छपरबंद समाजातील मुलाने, प्रतिकूल परिस्थितीत आयुष्यात यश मिळवले
सदर आत्मचरित्र वाचताना, प्रसंग समोर घडत असल्याचा भास होतो
ग्रामीण भागातील सामाजिक वातावरण ,निकोप असल्याची प्रकर्षाने जाणीव होते
आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगी, कुणी ना कुणी देवदूत बनून ऊभा राहिला म्हणूनच लेखकाची प्रगती झाली .लेखकाकडे असलेली अचाट बुद्धिमत्ता व प्रचंड इच्छाशक्ती लक्षात राहते
लेखकाची गुरूंच्या प्रति असलेली आस्था मनाला भावून जाते
आजही असे अनेक सलीम संघर्ष करत असतील,त्यांच्यासाठी हे पुस्तक निश्चितच प्रेरणादायी आहे
अशा अनेक सलीम यांना ताकत देण्याची शक्ती मिळेल अशी खात्री वाटते
पुस्तकाचे मुखपृष्ठ सुंदर व कल्पक आहे
अशा एका वंचित समाजात जल्मलेल्या सलीम याचा प्रवास ,समाजासमोर आणल्याबद्दल आपलेही मनापासून अभिनंदन!
आपला विश्वासू,
आर एस नाईकवाडी
उपशिक्षणाधिकारी ,मुंबई
GAUTAM SAMBHAJI KURE, W.C.O., AURANGABAD. –
राजहंस प्रकाशन ने प्रकाशित केलेले श्री सलीम शेख लिखित “शून्यातून शंभराकडे” हे आत्मचरित्र वाचले. मराठवाड्याच्या मागास भागातील, साहित्य लेखनाचा वारसा नसलेल्या एका छप्परबंद समाजातील सलीमचा जीवन प्रवास समाजासमोर आणल्याबद्दल “राजहंस प्रकाशन” यांचे शतशः आभार.
सदर आत्मचरित्रात लेखकाने बालपणापासूनच परिस्थितीशी केलेली झुंज व अशा प्रतिकुल परिस्थितीत देखील निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी केलेला प्रामाणिक आटापिटा खुप काही सांगून जातो. या पुस्तकाचे माध्यमातून लेखकाने दुर्लक्षित असलेल्या छप्परबंद समाजाचा अभ्यासपूर्ण व पुरावेदाखल अनमोल इतिहास समाजापुढे मांडला आहे. त्याचा समाजाला निश्चितच उपयोग होईल.
आत्मचरित्राची एकूण 33 भागामध्ये अतिशय सुरेख विभागणी केली आहे. यामध्ये लेखकाने वैयक्तिक स्वतःवर जास्त प्रकाश न टाकता, त्यांच्या आजूबाजूची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक परिस्थितीचे वास्तव वर्णन समाजासमोर मांडले आहे. ग्रामीण व मागास भागातील वाचकांना आपणही याच परिस्थितीतून गेलो असल्याची जाणीव निश्चितच होते.
आई वडील, कुटुंबिय व नातेवाईकांप्रती असलेले प्रेम तसेच या सर्वांची लेखकाच्या शिक्षणाविषयी असलेली तळमळ मनाला चटका लावून जाते. शाळा कॉलेज चा जिव्हाळा, गुरुजनांचा आदर, गांवातील थोरा मोठ्यांचा मान सन्मान, बाल सवंगड्यांचा खट्याळ सहवास, आपल्या गांवाबद्दलची आत्मियता व अभिमान तसेच शैक्षणीक काळात केलेल्या गमतीजमती, खेळ, नाटक, निवडणूका, खानावळ इत्यादी अगदी प्रसंगानुरूप मांडल्या आहेत. कान्होबाचा संदल, गांवची यात्रा, बैल पोळ्याचा मान या सांस्कृतिक उत्सवासोबतच फकीर समाजाने करावयाची सेवा, यामधून त्याकाळातील धार्मिक व सामाजिक सलोख्याचे उत्तम दर्शन घडते. काही अनिष्ट चालीरूढी व जातीभेदावर देखील लेखकाने परखड मत व्यक्त केले आहे. यामुळे समता व बंधूभाव वाढीस बळ मिळते.
कुटुंबाकडून मिळणारी तुटपुंजी मदत, शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्जाच्या मदतीने लेखकाने शालेय ते पदवीत्तोर शिक्षण जिद्द व अचाट बुद्धी च्या सामर्थ्याने पूर्ण केले असल्याचे प्रकर्षाने जाणवते. औरंगाबाद येथे मस्जिद मध्ये राहून घेतलेली पदवी तसेच 16 महिन्यात पूर्ण केलेले एम टेक चे शिक्षण हे वाचताना अंगावर शहारे येतात. मी लेखकाचा पदवीकेचा वर्ग मित्र असल्याने त्यांचा हा खडतर प्रवास जवळून अनुभवला आहे. आत्मचरित्रात वर्णन केलेले पदवीकेचे प्रसंग आम्हाला वाचताना त्याकाळात घेऊन जातात. पुस्तकातील प्रत्येक भागाचा शेवट व पुढील भागातील विषय याची उत्तम जोड दिल्याने वाचनातील उत्कंठा टिकून राहते.
आत्मचरित्रात लेखकाने शालेय शिक्षणापासून ते स्पर्धा परिक्षेत यथोचित यश प्राप्त करून सा. बां. विभागात अभियंता पदी हजर होईपर्यंतचा खडतर प्रवास मांडलेला आहे. जाता जाता हा प्रवास यशस्वी करण्यासाठी कोणत्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत, हे देखील त्यांनी “यशाचे गुपित” या भागात सविस्तर मांडले आहे. सर्व समाजातील युवा पिढीला यामधून मार्गदर्शन व प्रेरणा निश्चितच मिळणार आहे.
सलीमच्या जीवनात कठीण प्रसंगी खुप सद्गृहस्थ मदतीला धावून आले. त्यांच्यातला “देवदुत” ओळखून त्या सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करून लेखकाने आपला विनम्र स्वभाव सिद्ध केला आहे.
“राजहंस प्रकाशन” यांनी मुखपृष्ट रेखाटन व मलपृष्ट संदेश याची अर्थपूर्ण मांडणी केली आहे. त्यामधून या दोन पानाच्या आतील आत्मचरित्राचे संपूर्ण सारांश अधोरेखित होते. हाच “राजहंस प्रकाशन” चा जिवंतपणा म्हणावा लागेल.
सदर आत्मचरित्र म्हणजे लेखकाने आम्हास दिलेली रूचकर मेजवानीच आहे. तथापि वाचनानंतर पुढील भागची तृष्णा वाढवून जाते. सलीम यांना पुढील जीवनप्रवास लेखनास माझ्या खुप खुप शुभेच्छा…..
आपला
गौतम संभाजी कुरे
जलसंधारण अधिकारी, औरंगाबाद.
Show quoted text
Ad. Ramkrishna Misal –
अप्रतिम पुस्तक ! प्रकरणनिहाय उत्कंठा वाढविणारे , प्रत्येकाला काही ना काही देणारे, प्रेरणादायी, तरुणाईसाठी मार्गदर्शक व दिशा दाखविणारे . एका दिवसात वाचून पूर्ण केले . परत परत वाचावेसे वाटणारे. राजहंस प्रकाशन व लेखक सलीम शेख यांचे अभिनंदन !!
— विधिज्ञ रामकृष्ण मिसाळ, पाडळी, ता . शिरूर कासार , जिल्हा – बीड