लोकधुनांतून रागनिर्मिती

(1 customer review)

130
Offer Price: 117

लोकधुनेत जी स्वरावली आहे, जे स्वरसंवाद आहेत,
ते musically genuine असले; तर रागात प्रमाण होतात.
लोकसंगीतात केवळ रागनिर्मितीचीच बीजे आहेत,
असे नसून त्यांत शक्यताच शक्यता बीजरूपाने किंवा
रोपट्याच्या रूपाने अस्तित्वात आहेत, त्या रोपांचा बगिचा करायला हवा.
लोकसंगीत सहज आहे, तर रागसंगीताला बौद्धिक आधार आहे;
भावना-संवेदना दोन्हीकडे आहेत.
लोकधुनेची काही अंशी व्याख्या करणारे आणि
कलासंस्कृतीत तिची भूमिका दाखवून देणारे लिखाण
सौ. साधना शिलेदारांच्या हातून घडले आहे.
निर्मितीचे एक-एक टप्पे समजून घेऊन त्या प्रक्रियेला मान्यता देऊन
त्याप्रमाणे रागनिर्मितीचा रीतसर प्रयत्न
कुमारजींनंतर सर्वप्रथम साधना शिलेदार यांनी केलेला आहे.
पं. मुकुल शिवपुत्र

in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
SKU: B-07-2021 Category:

Additional information

Book Author

Book Name

लोकधुनांतून रागनिर्मिती

Illustrator

चंद्रमोहन कुलकर्णी

ISBN

978-81-947640-9-0

पहिली आवृत्ती

फेब्रुवारी २०२१

सद्य आवृत्ती

फेब्रुवारी २०२१

1 review for Lokdhunantun Ragnirmitee

 1. मिलिंद कोलटकर (verified owner)

  साधना शिलेदार , २०२१. लोकधुनांतून रागनिर्मिती : लोकसंगीतात आढळणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या बीजांचा शोध. राजहंस, पुणे. १३०/-
  क्वचितच असं होतं की सुट्ट्या लागून येतात. ख्याण्याची बेगमी करून ठेवलेली असते. अन तुमच्या हातात एक सुंदर पुस्तक येतं.
  या शनिवार-रविवारी अगदी असंच झालं. पाडव्यासाठी केलेली तयारी होतीच. मग नुकतंच मागवलेलं ‘लोकधुनांतून रागनिर्मिती’ हाती घेतलं. अन कालपासून भारावलेल्या सारखं वाचून आत्ता ते खाली ठेवल्यावर सकाळीच सांगायला बसलो.
  तशीही संगीताची मला आवड आहे. अशोक रानडे यांच्या ‘संगीत संगती’ची ओळख मी याआधीही दिलीच आहे. आपल्या “मुळांचा” शोध जसा आपण घेत असतो, तसा ऐकत असलेले राग आले तरी कोठून? कोणी ते निर्माण केले? हिंदुस्थानी संगीत “शास्त्रीय”/classical का समजलं जातं? नवीन राग निर्माण होतात का? असे अन अनेक प्रश्न आपलं संगीत ऐकतांना सहजच पडतात. अन म्हणूनच या छोटेखानी पुस्तकाच्या उपशिर्षकाने “लोकसंगीतात आढळणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या बीजांचा शोध” वाचायला हातात घेतांना अपेक्षा होत्या. अन त्या बहुतांशी त्या पूर्णही झाल्या.
  हे पुस्तक अगदी लहान आहे. सुबक आहे. मस्तय.
  शेवटची चार पानी संदर्भसूची सोडून फक्त शंभर पानं. पण या शंभर पानांत जे मिळतं, ते कदाचित एखाद्या मोठ्ठ्या ग्रंथातही सापडणार नाही. काय आहे असं?
  पहाच जोडलेला अनुक्रम.
  लोकसंगीत आपल्याला परिचयाचं आहे. लहानपणापासून आपण ते ऐकतोय. ‘अडगुलं-मडगुलं’, ओव्या, अभंग, लावण्या आणि आज अजय-अतुल. अनेक मराठी-हिंदी गीतांचे स्त्रोत लोकसंगीत आहेत हे आपल्याला माहितीय. पण मग आजचे प्रचलित राग लोकसंगीतातून तर पुढे आले नसतील? हो. पहाडी, पिलू सारख्या रागांचे मूळ लोकसंगीतातच आहे. कुमारगंधर्व यांनी पुढेजाऊन तब्बल ११ नवीन राग माळव्यातील लोकधुनांतून योजले. त्यांच्या सक्तीच्या विश्रांतीच्या काळात ते देवासला, माळव्यात जाऊन राहिले. डॉक्टरांच्या सक्त ताकिदीमुळे गाता येत नसल्याने, पण हिंडा-फिरायला बंदी नसल्याने याच विश्रांतीच्या काळाचा त्यांनी सदुपयोग केला. सहज कानावर पडणाऱ्या लोकधुनां खोलवर जाऊन अभ्यासल्या. त्यावर लिहिलं. (पहा: अनूपरागविलास १, २ आणि या पुस्तकाची संदर्भसूची).
  त्या ‘दोन शब्दांत’ मुकुल शिवपुत्र लोकसंगीत आणि रागसंगीत यांचं नातं सहज उलगडात. “रागसंगीतात आणि लोकसंगीतात जेव्हा एकरूपता दिसू लागते, लोकधुनेत रागरूप आणि रागात धून गवसते; तेव्हा त्या मूल्यांची सत्यता प्रमाणित होते.” बाकी अजून बरंच मलपृष्ठावर आलंयच.
  प्रास्ताविकात लेखिकेच्या ‘एकलव्य’ भूमिकेची आपल्याला कल्पना येते. लहानपणापासून कुमारगंधर्वांच गायन कानावर पडण, पुढे स्वतः प्राविण्य मिळवण, कुमारांच्या त्यांना उमजलेल्या धुनउगम व इतर वैशिष्ट्यांचा उपयोग गाण्यात करणं, यातून ती भूमिका अधोरेखित होते. लोकधुनांतून रागनिर्मिती कशी होत असेल याची त्यांना उतुस्कुता (आपल्यासारखीच) असते. त्यासाठी त्या मग वेगवेगळ्या स्त्रोतांचा अभ्यास करतात. अनेक विद्यापीठं, माळवा, केरळ, गोवा-कोकण फिरतात. अशा कलाकारांशी संवाद सादतात. अभ्यासतात. अन मग त्याही काही नवीन रांगांची निर्मिती त्याही करतात. आणि ते सारं कसं झालं ते आपल्याला सांगतात. यामुळेच या पुस्तकाचं महत्त्व वाढतं. आपण त्या प्रक्रियेचा भाग बनतो.
  पहिल्या लेखात संगीताचा इतिहास आपल्याला माहिती होतो. प्रक्रार, उपप्रकार, संगीताची विभागणी कशी होते, स्वर-ताल-लय, त्यांचं महत्व, विविध प्रकारांत फरक तो काय अन तो कसा पडतो हे सारे त्या सांगतात. संदर्भांसह. अन छोट्या अन उपयुक्त उदाहरणांसह. अन ओघवत्या भाषेमुळे विषय तसा क्लिष्ट असूनही आपल्यासाठी तो सोप्पा होतो. उलगडत जातो. लेखाचा शेवट वर्गीकरणाची एक सोप्पी पद्धत सांगून होतो.
  पुढच्या प्रकरणात लोकसंगीताचे स्वरूप, वैशिष्ट्ये – जसे की त्याची पारंपरिकता, अनामिकता, लवचिकता, अन प्रादेशिकता. कुमारगंधर्वांनी, अशोक रानडे सांगितलेली लोकसंगीताची लक्षणे त्या देतात. जात्यावारच्या ओव्या तशाच का याचा बारकाईने केलेला विचार पाहून लोकसंगीताचं रूप अधिक चांगल्या रीतीने उमगतं. गाणारा स्त्री-की-पुरुष, एकल की समुह गान, त्यातला वाद्यांचा उपयोग, अन त्यामुळे संगीताचे बदलणारे रूप लक्षात येते. पं. रविशंकर यांचे याबद्दलचे विचार मांडून या लेखाचा शेवट होतो.
  “लोकसंगीत व इतर गायनशैली यांचा संबंध” या तिसऱ्या लेखात आपली समज अधिक प्रगल्भ होते. दृढ होते. पृ. ३७ वर काही परिच्छेद वर-खाली झाल्यासारखे वाटतात. पण, असो. आपल्या खास महाराष्ट्रीय नाट्यसंगीताचं, भावगीतांच, लावण्यांच लोकसंगीतातलं महत्त्व त्या सांगतात. अनेक नामवंतांचे विचार दिल्याने ते सारं नीट विषद होतं. मजा येते. 🙂
  “धुनउगम रागांच्या संदर्भात पं. कुमारगंधर्व यांचे कार्य” हा लेख नेमकं तेच सांगतो. पुढे परिशिष्टात – “कुमारांच्या माळव्यात” – त्या फिरस्तीबद्दल विस्ताराने सांगतात. हा लेख ‘अनुभव’च्या २०१६च्या दिवाळी अंकात आला होता. त्यात काही फोटोही आहेत.
  “लोकधुनांचा अभ्यास” या तशा शेवटच्या लेखात विविध साधनांचा परिचय होतो. त्यांचे कष्ट, केलेली भटकंती, धडपड समजते. पुढे त्या लोकसंगीताची त्यांना जाणवलेली वैशिष्ट्ये, निरिक्षणे अन लक्षणे सांगतात. “एका स्वराची दोन रूपे पाठोपाठ येऊ नयेत” या नियमाची आवश्यकता तपासण्याची त्यांना गरज वाटते. या लेखात त्या “लोकधुनांतून निर्मित धुनउगम रागांची निर्मिती व टप्पे” देतात. ते सारं सोप नाही. पण कोणी हे कधी असं समजावून सांगितलं नव्हतं. ही एक गोष्ट माझ्यासारख्या कानसेनासाठी हे पुस्तक अमूल्य बनवतं.
  पढे त्या “नवीन धुनउगम राग” येतात. यात राग ऋतु, अनूप, आणि गोधूली यांची ओळख होते. स्वरलिपी व बंदिशी ही त्या देतात. असेच पुढे राग सावित्री बद्दलही होते.
  हे पुस्तक जेवढं वाचावं तेवढंच ते ऐकून अनुभवावं. लेखिकेच्या यु-ट्यूब चॅनल वर जाऊन – https://www.youtube.com/channel/UClL8Fh_fWI9NerS2PvE2mNw/videos वर उल्लेखलेल्या रागांची झलक आपण अनुभवू शकतो.
  आणि या पुस्तकाविषयी आपण लेखिकेच्याच शब्दात ऐकू शकतो: https://youtu.be/zX5bYY9d02I
  विशेष उल्लेख करावा अशी या पुस्तकाची सजावट, मुख-मलपृष्ठ केलंय ते चंद्रमोहन कुलकर्णी यांनी.
  हे पुस्तक आपण https://www.rajhansprakashan.com/product/lokdhunantun-ragnirmitee/ इथून मिळवू शकाल.
  एकूणच मजा आली.
  धन्यवाद.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.