संपादकीय

काही वेळा परक्या ठिकाणी गेल्यावर सांस्कृतिक भिन्नतेमुळे अचानक येणारे अनुभव आपल्या प्रवासावर, त्यातून मिळणाऱ्या आनंदावर विरजण घालू शकतात. म्हणूनच आपण जेथे जायचे आहे, त्या त्या ठिकाणची थोडी माहिती करून घेऊन गेलो तर आपला प्रवास निश्चितच सुखाचा आणि आनंदाचा होतो.

वाचकहो, सण-समारंभाच्या निमित्ताने इतरांना आनंददायी वाटेल असे काहीतरी द्यावे, ही आपली परंपरा आहे. म्हणूनच दिवाळीच्या निमित्ताने आम्ही ग्रंथवेधचा हा अंक `प्रवास विशेषांक’ म्हणून आपल्यासाठी सादर केला आहे, शिवाय आपण प्रवासाचे काही बेत आखत असाल तर त्याच्या तयारीसाठी याचा उपयोग होऊ शकतो.

आपल्या रोजच्या जीवनात काहीतरी बदल हवा जेणेकरून आपण नव्या उमेदीने पुन्हा नित्य व्यवहार करू शकतो, या उद्देशाने बहुतकरून प्रवास केला जातो. आपल्या संतांनी सुरू केलेली वारी हा माझ्यामते आपल्या संस्कृतीतील पहिला सामुदायिक प्रवास. यामध्ये सामील असलेले असंख्य वारकरी हे शेतकरी असतात. पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने ते वारीला नित्यनेमाने जात असतात. शेतीची बहुतांश कामे संपवून पावसाची प्रतीक्षा असण्याच्या काळात ही वारी असते. वारीवरून आल्यावर नव्या उत्साहाने ते कामाला सुरुवात करतात. थोडक्यात, प्रवास तुम्हाला तुमचे चाकोरीतले जीवन पुन्हा नव्याने जगायला ऊर्जा देतो. आजकाल बहुतेक सर्व जण कामामुळे इतके व्यस्त असतात की, त्यातून सुटका म्हणून निदान शनिवार-रविवार तरी जवळच्या ठिकाणांना भेट देण्याचा अनेकांचा कल असतो. तर काही जण कुटुंबाच्या सामूहिक सुट्ट्यांच्या काळात देशातला तर कधी परदेशातला प्रवास करतात. निवृत्तीनंतर अनेक लोक आपल्या आवडत्या ठिकाणांना भेटी देतात. याशिवाय कामासाठी, शिक्षणासाठी, सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या निमित्ताने देश-परदेशांत प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. म्हणजेच काही प्रवास छोटे तर काही प्रवास मोठे.

पूर्वी केवळ हौसेसाठी, आपला बहुश्रुतपणा वाढवण्यासाठी पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ, अनंत काणेकर यांची पिढी प्रवास करत होती. त्यानंतर मिलिंद गुणाजींसारख्या निसर्गप्रेमींनी छंद जोपासता जोपासता त्याचा व्यापकपणा वाढवला. अनेक वेगळ्या आणि अनवट वाटा शोधून काढून लोकांपुढे त्या आपल्या शब्दात मांडल्या. तर संदीप श्रोत्रींसारख्या काहींनी निसर्ग-निरीक्षणासाठी प्रवास केले. सानिया, अरुंधती दीक्षित, वैशाली करमरकर यांच्यासारखे काही लोक कामानिमित्त एखाद्या ठिकाणी गेले, तिथे वास्तव्य केले आणि जवळून त्या त्या प्रदेशाचे निरीक्षण केले. काळाबरोबर प्रवासाचे हेतू आणि तऱ्हाही बदलत गेल्या, त्याचप्रमाणे प्रवासवर्णनेही बदलत गेली.

थोडक्यात काय तर प्रवास हा आता फक्त चैनीचा राहिला नाही, तर तो जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. म्हणूनच प्रवासावरची असंख्य पुस्तके आज बाजारात उपलब्ध आहेत. आजच्या संगणकाच्या आणि आंतरजालाच्या काळात `एका क्लिकवर हवी ती सगळी माहिती मिळते, मग पुस्तकांची गरजच काय’, असे अनेकांचे मत असते; पण माहिती असते, पुस्तकात लेखकाने स्वत: अनुभवलेले विश्व असते, त्यामुळे त्यातून वाचकाला अधिक काहीतरी मिळते व काहीवेळा एखाद्या ठिकाणाला भेट देण्याचा योग आला नाही, तरी त्या ठिकाणाचा अनुभव तो वाचनातून मिळवू शकतो. म्हणूनच आमच्या काही प्रवासवर्णनविषयक पुस्तकांचा परिचय या अंकातून आम्ही सादर केला आहे.

या अंकात प्रथम महाराष्ट्रातील काही ठिकाणांचा परिचय करून देणारी पुस्तके आहेत, त्यानंतर आपल्या देशातील पर्यटनस्थळांचा परिचय करून देणारी पुस्तके आहेत, मग परदेशातील काही स्थळांचा परिचय करून देणारी पुस्तके आहेत.

प्रवासवर्णन कसे असावे, याबद्दल खूप लोक खल करताना दिसून येतात. त्यामुळेच ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक गंगाधर गाडगीळ यांचा `साहित्याचे मानदंड’ या पुस्तकातील `मुंबईचे वर्णन’ या लेखाचा संपादित भाग या अंकात मुद्दाम विशेष उद्देशाने घेतला आहे. गाडगीळांनी १९६२ साली या लेखात मांडलेले प्रवासवर्णनावरचे विचार आजच्या काळातही लागू होतात.

मराठीतील लिखित स्वरूपातील पहिले प्रवासवर्णन म्हणून वरसईकर गोडसे भटजींच्या `माझा प्रवास’ या पुस्तकाचा उल्लेख केला जातो. या पुस्तकावर अनेक लोकांनी अनेक प्रकारे भाष्य केले आहे. म्हणून या पुस्तकाचेच चरित्र आम्ही प्रकाशित केले, त्याचाही परिचय या अंकात दिला आहे.

आजकाल प्रवासी कंपन्यांबरोबर अनेक जण देश-विदेशांत प्रवास करतात, तसेच वैयक्तिकरीत्या प्रवास करणारी मंडळीही वाढत आहेत. काही वेळा परक्या ठिकाणी गेल्यावर सांस्कृतिक भिन्नतेमुळे अचानक येणारे अनुभव आपल्या प्रवासावर, त्यातून मिळणाऱ्या आनंदावर विरजण घालू शकतात. म्हणूनच आपण जेथे जायचे आहे, त्या त्या ठिकाणची थोडी माहिती करून घेऊन गेलो तर आपला प्रवास निश्चितच सुखाचा आणि आनंदाचा होतो.
अशा तयारीसाठी या प्रवासवर्णनपर पुस्तकांचा उपयोग होतो. देशात आणि परदेशात जाताना लागणारी उपयुक्त माहिती देणारी पुस्तकेही आम्ही प्रकाशित केली आहेत.

या अंकातील माहितीचा आमच्या वाचकांना निश्चितच उपयोग होईल, या विश्वासाने हा अंक आपल्यापुढे सादर केला आहे.

`राजहंस’चे सर्व शाखाप्रमुख, कर्मचारिवर्ग; `राजहंस’वर कायमच प्रेम करणारे वाचक,
शुभिंचतक, ग्राहक या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!!
आरती घारे, कार्यकारी संपादक

ग्रंथवेध ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ डाउनलोड करा.