संपादकीय

वाचकहो,

परकीय भाषेतील शब्दांचे मराठी भाषेवरील आक्रमण थोपवण्यासंदर्भात काय करता येईल, हा विचार मागील अंकात मांडला होता. स्वातंत्र्यपूर्वकाळातील मराठीची स्थिती आणि आजची स्थिती यात खरेच फरक पडला आहे का, या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने `नाही’ असे द्यावे लागेल, कारण खरेतर तेव्हाच इंग्रजी भाषेचे मराठीवर आक्रमण व्हायला सुरुवात झाली होती आणि आता तर अतिआक्रमण होते आहे. 

मराठी लोकांना `निबंधमालाकार’ म्हणून परिचित असणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्याबरोबर पुण्यात `न्यू इंग्लिश स्कूल’ स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.  `केसरी’ हे मराठी व `मराठा’ हे इंग्रजी वृत्तपत्र चालवणारी हीच त्रिमूर्ती. मराठी भाषा आणि वाङ्मय यांच्या आणीबाणीच्या काळात चिपळूणकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठी भाषेमध्ये येणारे परकीय शब्द स्वीकारायचे की नाहीत, यावरचे विचार त्यांनी आपल्या लेखात मांडले होते.

चिपळूणकर म्हणतात, `अर्वाचीन काळी मोठ्या योग्यतेस चढलेली जी इंग्रजी भाषा, तीत हजारो शब्द परभाषांतून आलेले आहेत. हे तर काय? पण ज्या भाषेने वरील भाषेत काही ना काही साहित्य केले नाही, अशी बहुधा थोडकीच सापडेल. यावरून समजावयाचे की, परभाषांचा मिलाफ सर्व भाषांत व्हावयाचाच, व तो झाला असता त्यात काही मोठे अनिष्ट आहे, असेही नाही. इतके मात्र व्हायला हवे की, जेथे जरूर नाही तेथे भेसळ होऊ नये; व परभाषेच्या पायी मूळ पद्धतीस म्हणजे वाक्यरचनेस वगैरे धक्का लागू देऊ नये. 

देशाचा उदीम वाढण्याकरता ज्याप्रमाणे सर्व ठिकाणांच्या व्यापाNयास व्यवहार करण्याची साऱ्या देशात मोकळीक असते, त्याप्रमाणेच अर्थवाहक जे शब्द, त्यांसही तशीच सर्वत्र सदर परवानगी असली पाहिजे. ती असली म्हणजे भाषेस शब्दप्राचुर्य, वैचित्र्य इत्यादी लाभच होणारे आहेत. इतकेच मात्र की, ते (पर) शब्द (मूळ) भाषेवर शिरजोर होऊ देता कामा नयेत, व त्यांच्या योगाने भाषेची शिस्त न बिघडेल अशी तजवीज ठेवली पाहिजे.’

चिपळूणकरांसारख्या अभ्यासकाचे हे विचार आपल्याला आजही विचारप्रवण करतात. आजच्या काळात ज्या इंग्रजी शब्दांना स्वीकारण्याशिवाय आपल्यापुढे पर्याय नाही, त्यांचा स्वीकार आपण केला पाहिजे, असे यावरून वाटते. कारण काही प्रणालींचे मूळ मुळातच पाश्चात्त्य देशांतून आलेले आहे. त्यामुळे त्यासाठी वापरण्यात येणारा शब्दसंग्रह इंग्रजी भाषेतील आहे. अशा वेळी प्रत्येक इंग्रजी शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द शोधण्याचा अट्टाहास करण्याचे कारण नाही. उदा. कॉम्प्युटरला आपण `संगणक’ हा मराठी शब्द वापरतो, पण त्यात वापरण्यात येणाऱ्या इतर सुट्या भागांसाठीच्या शब्दांचे काय? उदा. हार्ड डिस्क, रॅम, पेन ड्राइव, मेमरी, मॉनिटर, की बोर्ड, माउस, मदर बोर्ड, प्रोसेसर इत्यादी. हे शब्द तसेच स्वीकारण्याशिवाय आपल्यापुढे पर्याय नाही, कारण त्यांच्यासाठी पर्यायी शब्द शोधत बसणे म्हणजे भगीरथ प्रयत्नच आहे. या शोधकार्यासाठी अनेकांचे श्रम तर लागतीलच, शिवाय हा प्रयत्न कितपत यशस्वी होईल याबद्दल शंका वाटते; कारण आजच्या धावणाऱ्या युगात तोपर्यंत पुढचे कित्येक नवीन इंग्रजी शब्द आपल्या उंबरठ्यावर येऊन उभे असतील, त्यामुळे आपण त्यांच्या बरोबरीने चालू शकणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. चिपळूणकरांचा `शिरजोर’ हा शब्द स्पष्ट करताना आम्ही असे म्हणतो, की दैनंदिन व्यवहारात आज मराठी भाषेवर इंग्रजी शब्दांचा हल्ला होतो आहे. उदा. आज सुटीऐवजी आपण `हॉलिडे’ म्हणतो, सफरचंदाला `अ‍ॅपल’ म्हणतो. यातून आपण आपल्या भाषेचे स्वत्व गमावून बसतो आहोत, तसे होऊ नये.

मागील अंकातील आवाहनाच्या अनुषंगाने आमचे सातारा शाखेचे कार्यालय प्रमुख डॉ. उमेश करंबेळकर यांनी त्यांचे विचार मांडले आहेत, तेही इथे विचारासाठी आपल्यापुढे सादर करत आहोत.

`सर्वप्रथम, इंग्रजी शब्दांसाठी तयार करण्यात येणारे नवीन मराठी शब्द

शक्यतो क्लिष्ट नसावेत. साधे, सोपे, जीभेवर रुळायला अवघड जाणार नाहीत असे असावेत. दरवेळी शब्दनिर्मितीसाठी संस्कृतचा आधार घ्यायलाच हवा असे

नाही. इंग्रजी शब्दाचे मराठीकरण ग्रामीण लोक चांगले करतात. जसे रॉक ऑईलचे

`रॉकेल’, स्टेशनचं `ठेसन’, प्लॅटफॉर्मचं `फलाट’, डॅम्ड रॅटचं `डामरट’, डॅम्ड बीस्टचं `डांबीस’ इत्यादी. हे शब्द आता इतके रुळलेत की ते मूळचे इंग्रजी आहेत, हे लक्षातच येत नाही.

बऱ्याचदा असे दिसून येते, की कुणी एखादा नवा शब्द सुचवला, की प्रथम तो कसा अयोग्य आहे, त्याच्यात अतिव्याप्ती किंवा अव्याप्ती दोष कसे आहेत, यावरच चर्चा होते. अर्थात अशी चर्चा निश्चितच व्हायला हवी, पण म्हणून तो शब्द एकदम बाद करू नये. आणखी दुसरे पर्याय पुढे यावेत, त्यातून लोक एखादा पर्याय वापरतील आणि तो रूढ होईल. म्हणून जितके पर्याय अधिक तितके चांगले.

दुकानदारांना मराठीत पाट्या लिहिणे बंधनकारक केले, तरी इंग्रजी शब्दच देवनागरी लिपीत लिहिले जातात एवढेच. जसे ब्युटी पार्लर, मेन्स पार्लर, हेयर कटिंग सलून, मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्स, बुक स्टोअर, शॉपी, मॉल इत्यादी. यांसाठी आकर्षक मराठी शब्द सुचविले जावेत. साताऱ्यात एका उपाहार गृहाचं नाव `चुलिष्ट’ असं ठेवलेलं पाहण्यात आलं. चुलीवरील स्वयंपाकाची चव आगळी असते हे सूचित करणारा, स्वादिष्टशी साम्य दाखवणारा `चुलिष्ट’ हा नवीन शब्द तयार करण्याची कल्पकता यात दिसून येते. वाचकांना अशी कल्पक शब्दयोजना आढळल्यास ती कळवावी.

काही मंडळी असे शब्द तयार करून वापरतातही. गुगलवर शोध घेणे, या अर्थाचे `गुगलणे’ हे क्रियापद वापरले जाते. पी.सी. हँग झाल्यास `पीसी गंडला’ असे म्हटले जाते. नेटवर ट्रोल करणे, यासाठी `जाळ्यावरची टोमणेगिरी’ असेही म्हटले जाते.

वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द तयार करावेत, सुचवावेत आणि वापरावेत, भाषाशास्त्रज्ञांवर अवलंबून न राहता, हे त्यांचे कार्य आहे असे न समजता स्वनिर्मिती करावी, ही अपेक्षा. असो.’      

डॉ. करंबेळकर यांच्यासारखे किंवा त्यापेक्षा भिन्न असे अनेकांचे विविध विचार असू शकतील. आम्ही येथे दोन वेगवेगळ्या काळांतील एक एक विचार आपल्यापुढे मांडला आहे. त्यातून आपल्या मराठीसाठी काय करता येईल, हा विचार प्रत्येक मराठीप्रेमीच्या मनात जागृत होईलच, असे आम्हाला वाटते. ते तुम्ही आम्हाला अगत्याने कळवावे.  

२७ फेब्रुवारी हा `मराठी भाषा दिन’. `ज्ञानपीठ पुरस्कार’प्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा हा जन्मदिवस. या दिनाच्या निमित्तानं आम्ही या अंकापासून एक नवीन सदर सुरू करत आहोत.

कोणतीही संस्कृती टिकून राहते ती भाषेच्या जोरावर, पण आज आपण ती आपली भाषाच गमावत चाललो आहोत. आपल्या भाषेचं स्वत्व आपण कसं गमावतो आहोत आणि ते कसं टिकवायचं आहे, याविषयी या सदरातून संवाद साधायचा आहे.

तुम्ही काय काय प्रयत्न करू शकता, ते ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.

आरती घारे, कार्यकारी संपादक