आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात काम करत असल्या तरीही तिला समाजात कमी लेखले जाते. आपण स्त्री आणि पुरुषांकडे माणूस म्हणून का बघू शकत नाही असा प्रश्न ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी उपस्थित केला. विदर्भ साहित्य संघ आणि राजहंस प्रकाशनातर्फे नागपूरमध्ये महिला दिनानिमित्त ‘आधुनिक स्त्री-पुरुष तुलना’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

आजही स्त्रियांमध्ये भीतीचे वातावरण असेल तर समाजाने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. महिलांमध्येही पुरुषांप्रमाणे वागण्यासाठी चढाओढ सुरु आहे.यावेळी स्त्री आणि पुरुषांच्या मानसिकतेत काळानुसार कसा बदल होत गेला याचाही आढावा गोडबोले यांनी घेतला. या स्त्री-पुरुष तुलनेला साहित्य क्षेत्रही अपवाद नाही असे त्यांनी आवर्जून नमूद केले. स्त्रिया अनेक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे जात असल्याने त्यातून पुरुषांमधील अहंकाराला धक्का लागून अत्याचारांचे प्रमाण वाढत असल्याचेही मत त्यांनी नोंदवले.

तेलंग यांनीही आपल्या मनोगतात स्त्रियांच्या समाजातील स्थानाबाबत भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले तर आभारप्रदर्शन नरेश सब्जीवाले यांनी मानले.