राजहंस प्रकाशनाच्या परंपरेनुसार पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याच्या प्रतीसह एक पत्र व पेढ्यांचा बॉक्स लेखकाला दिला\पाठवला जातो. हे पत्र लेखकाची उमेद वाढवणारे आणि त्याला बळ देणारे असते. मराठी प्रकाशन व्यवसायात राजहंस प्रकाशनाने ही साधीशी पण महत्त्वाची परंपरा सुरू करून खूप वर्षं झाली आहेत. नुकतेच प्रकाशित झालेले आणि अल्पावधीतच चर्चाविषय झालेले सरिता आवाड यांचे ‘हमरस्ता नाकारताना’ हे आत्मकथन प्रकाशित झाल्यानंतर दिलीप माजगावकर यांनी आवाड यांना लिहिलेले हे पत्र…
____________________________________________________________________________________________________

५ ऑगस्ट २०१९

प्रिय सरिता,

माझं स्मरण दगा देत नसेल, तर बहुदा मधुकर तोरडमल यांच्या ‘भोवरा’ या नाटकातील पात्राच्या तोंडी एक वाक्य आहे – ‘लक्षात ठेवा, मी हाडाचा वकील आहे. पुराव्यासाठी हत्तीच्या शेपटाचा एक केस जरी माझ्या हाती लागला, तरी मी संपूर्ण हत्ती बाहेर खेचून काढल्याशिवाय राहणार नाही.’ विनोदानं मी म्हणेन की, ‘उद्या समजा मी एक नाटक लिहिलं (मी काय नाटक लिहिणार?), तर त्यात एका पात्राच्या तोंडी एक वाक्य असेल, मी हाडाचा संपादक-प्रकाशक आहे, कोणा नव्या लेखकानं लिहिलेल्या चार गुणवान ओळी जरी वाचनात आल्या, तरी त्याच्याकडून तीनशे पानांचं पुस्तक लिहून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’

तुमचं पुस्तक हाती देताना हे सहज आठवलं, कारण हे पुस्तक त्या वळणानं झालं आहे. आज ती दिवाळी मला आठवतीये. २०१६ साल होतं. नोव्हेंबर महिना. माझं आजारपण चालू. कशात लक्ष लागत नव्हतं. रात्री सहजपणे ‘हंस’ दिवाळी अंक हातात घेतला. चाळला. एका लेखापाशी थांबलो. सुमती देवस्थळे नावाचा संदर्भ वाचला. लेखक म्हणून ‘सरिता आवाड’ हे नाव वाचलं. आणि लेख वाचायला सुरुवात केली. पहिल्या ओळीपासून लेख पकडत गेला, तो अखेरपर्यंत पकड सैल झाली नाही. तुमच्या वडलांचं आणि पार्श्वभूमीवरचं आईचं चित्रण दोन्ही अस्वस्थ करून गेलं. मनाची ती अवस्था तुमच्यापर्यंत त्याच क्षणी पोहोचवावी, म्हणून काळ-वेळेचा विचार न करता रात्री अकरा वाजता तुमचा फोन नंबर मिळवण्यासाठी अरुणा अंतरकर यांना, विद्याताई बाळ आणि कोणाकोणाला फोन करत सुटलो. कळत होतं, ही घायकूत बरोबर नाही, हे उद्या करता येईल. इतकं करून तुम्ही फोनवर भेटला नाहीतच. मग कधीतरी दोन दिवसांनी फोनवर भेटलो. नंतर समक्ष. केवळ त्या चार पानांच्या लेखनातून तुमच्या विचार-लेखनाची ताकद समजली होती. काही एक अंदाज बांधला होता. त्या भेटीत मी धाड्कन तुम्हाला आत्मचरित्राचा प्रस्ताव दिला. तुम्ही सुरुवातीला थोड्या दचकलात, पण ‘शांतपणे विचार करते’ असंही आश्वासक बोललात. बोलताना तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसला, पण अतिआत्मविश्वास नव्हता. थोडं दडपण जाणवत होतं.

आता योगायोग पहा…

त्रेचाळीस वर्षं झाली या गोष्टीला. त्र्याहत्तर साल होतं. महिना नोव्हेंबरच. दिवाळी नुकतीच संपलेली. एका संध्याकाळी माझ्या आठ महिन्यांच्या मुलाला- गुरूला डिहायड्रेशनचा त्रास सुरू झाला. वाढत गेला. डॉक्टरांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितलं. वेळ रात्रीची. तेव्हा पुण्यात आजच्यासारखी दहा-दहा हातांवर हॉस्पिटल्स नव्हती. आठवड्यापूर्वीच एस. एम. जोशींचा मुलगा अजय याचं ‘अश्विनी’ हॉस्पिटल नव्यानं सुरू झालं होतं. तिथे गेलो. ओल्या रंगाचा वास येत होता. दारं धड उघडत नव्हती. पुढे चार दिवस माझा मुक्काम हॉस्पिटलमध्येच होता. वेळ कसा घालवायचा, म्हणून निर्मलाबाई म्हणाल्या, ‘मी घरी येताना कोणी सुमती देवस्थळे नावाच्या नव्या लेखिकेचं टॉलस्टॉय हस्तलिखित आणलंय. माझ्या आधी तूच वाच. वेळही जाईल चांगला.” पुढच्या चार दिवसांत ते सहाशे पानांचं हस्तलिखित मी वाचलं. तोपर्यंत मराठीतली बहुतेक चांगली, महत्त्वाची चरित्रं-आत्मचरित्रं माझ्या वाचनात येऊन गेली होती; पण ‘टॉलस्टॉय’ वाचनानं मी अंतर्बाह्य थरारलो. पूर्वी असं वाचनात जणू काही आलंच नव्हतं इतका भारावून गेलो. सुमतीबाईंनी टॉलस्टॉयच्या चरित्राचं शिवधनुष्य अतिशय समर्थपणे पेललं होतं. भाषा, मांडणी, आकलन या सर्वच अंगानं ‘टॉलस्टॉय’ने मला झपाटून टाकलं. एक सर्वसामान्य गृहस्थ आणि एक अद्वितीय कलावंत यांच्यातला अंतर्विरोध त्याच्या व्यक्तिमत्त्वात होताच. त्यामुळे एकाच म्यानात दोन तलवारी असणाऱ्या माणसाच्या आयुष्यात जी सांसारिक पडझड होते, ती तर त्याच्या वाट्याला आलीच; पण वयाच्या पन्नाशीनंतर धर्मवेत्ता, उपदेशक, तत्त्वज्ञानी, राजसत्ता आणि धर्मसत्तेचा प्रखर विरोधक या नात्यानं त्यांनी घेतलेल्या भूमिका एकमेकांच्या समांतर नव्हत्या; तर त्या छेदच देत राहिल्या आणि त्या सांभाळताना काऊंट लिओ टॉलस्टॉय या महात्म्याच्या जीवनाची कशी परवड झाली, याचं चित्रण सुमतीबाई करतात आणि आपण अक्षरश: अंतर्मुख होतो.

त्या रात्री माझं वाचन संपलं; तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते, मी निर्मलाबाईंना फोन केला, सुमतीबाईंचा फोन मागितला. ती म्हणाली, ‘अरे, पत्रात तो नव्हता. याचा अर्थ त्यांच्याकडे फोन नसणार.’ म्हणून रात्रीच मी हॉस्पिटलकडून कागद घेऊन त्यांना चार पानी पत्र लिहून, ‘तुम्ही फार अस्वस्थ केलंत’ असं लिहिलं. त्यांचं नंतर पत्रोत्तरही आलं. नंतर पुस्तकच.

त्रेचाळीस वर्षांनंतर त्यांच्या मुलीच्या लेखनानं असंच अस्वस्थ केलं. History repeats म्हणतात, ती अशी!

आता प्रकाशनव्यवसाय म्हटला की, महिन्या-दोन महिन्यांत दोन-तीन पुस्तकं हातावेगळी करावी लागतात. प्रत्येक पुस्तकात आपण कोणत्या ना कोणत्या नात्यानं गुंतत राहतो. कधी लेखनात, कधी लेखकात, कधी निर्मितीत. फार थोडी पुस्तकं अशी असतात की, ज्यांत प्रकाशक आतड्यानं गुंतला जातो. ते पुस्तक डोक्यात घेऊन वावरतो. तुमच्या पुस्तकानं हा अनुभव मला दिला. मनसोक्त दिला. आता तयार झालेलं पुस्तक कसं झालं आहे? त्याचं साहित्यिक तराजूत वजन किती भरेल? समीक्षक त्याला कोणत्या रकान्यात टाकतील? वाचकांना ते आवडेल का? या गोष्टी माझ्या लेखी महत्त्वाच्या आहेत आणि नाहीही. कारण या पुस्तकानं व्यक्तिश: मला जो आनंद, समाधान दिलं, ते  या सर्वांपलीकडे आहे.

आज मोकळेपणानं बोलतोय म्हणून सांगतो. यातला माझ्या कौतुकाचा भाग पूर्णपणं बाजूला ठेवून वाचा. श्री.ग.मा. मला ‘रत्नपारखी’ म्हणायचे आणि पाडगावकर म्हणायचे, ‘दहा हस्तलिखितं तुझ्यासमोर ठेवली आणि ती वरवर चाळून ‘तू यातलं एक निवड’ असं सांगितलं; तर तुझा हात ज्यावर पडेल, तेच त्यातलं उत्कृष्ट असेल.’ ती दोघं प्रेमातली होती, म्हणून कौतुक करणार, हे आपण गृहित धरू. तरी तुमच्या लेखनानं निखळ आनंद दिला. ही बाकी खाली उरतेच.

काय दिलं तुमच्या लेखनानं?

वरवर पाहिलं तर एका सर्वसामान्य मध्यम परिस्थितीत वाढलेल्या, बँकेत काम करणाऱ्या स्त्रीचं हे आत्मचरित्र आहे; पण वरचा पापुद्रा दूर केल्यावर आत एका कुटुंबाची, एका कुटुंबातील मानसिक  आंदोलनाची प्रचंड खळबळ आहे. कुटुंब चौकोनी आहे; पण त्यातला एक कोन फार प्रखर, प्रभावी आणि कुटुंबातल्या सत्तास्थानी आहे. कर्तबगार, हट्टी, मानी आहेच, जोडीला साहित्यक्षेत्रात स्वत:च्या कर्तबगारीनं स्वत:चं अजोड स्थान त्यानं निर्माण केलं आहे. तुलनेनं दुसरा कोन म्हणजे त्यांचा जीवनसाथी कमकुवत आहे. सर्वांगानं सामान्य आहे. हे त्याचं सामान्य असणं हा जणू त्याचा गुन्हा आहे. अशा वातावरणात एक सालस, सरळमार्गी, हुशार पण भोवतालच्या परिस्थितीबाबत संवेदनशील अशा स्वभावाची मुलगी आईच्या छायेखाली वाढत राहते. स्वत:च्या वागण्यानं, अभ्यासातल्या हुशारीनं आईची लाडकी बनते. तिच्या जगण्याचा केंद्रबिंदू होते. आई अर्थात तिच्याकडून काही एक अपेक्षा ठेवून असते आणि आयुष्याच्या एका अवघड वळणावर मुलगी आंतरजातीय लग्न करण्याचा निर्णय केवळ भावनेच्या आहारी न जाता संपूर्ण विचारानं घेते आणि ठामपणं कृतीत आणते. या तिच्या एका निर्णयानं घर हादरते. सत्तास्थान प्रथम डळमळते. नंतर  दुखावते आणि नंतर दुरावते. त्यानंतर त्या मुलीच्या जगण्याचा अवघा पोत बदलून जातो.

हा सगळा मी दहा ओळींत लिहून संपवलेला तुमचा जीवनप्रवास ज्या समजुतीनं तुम्ही मांडला आहे, ते या लेखनाचं बलस्थान आहे. या प्रवासात टोकाचं दारिद्रय, हिंसाचार, व्यसनाधीनता असं काहीही नाही; पण छोट्या-मोठ्या प्रसंगात माणसं कशी वागवतात, कशी बदलतात, कशी संभ्रमात टाकतात, त्यातून जगताना लहानमोठे पेच कसे निर्माण होतात- याचं चित्रण तुम्ही फार प्रभावीपणं करता. या सगळ्यांत जाणवली, ती तुमची समोरचा माणूस समजून घेण्याची क्षमता. समोरचा माणूस एका हिमनगासारखा असतो; तो जेवढा ज्या कोनातून दिसेल, त्याच भागापुरतं शक्यतेचा आधार घेऊन त्याच्यासंबंधी भाष्य करावं, हे तुमचं भान सदैव जागं आहे.

विशेषत: तुमचे आई-अण्णा- त्यांचे स्वभाव, स्वभावातल्या बारीक-सारीक छटा, त्यातून घडत- बिघडत गेलेले संबंध- याविषयी तुम्ही किती संयमाने लिहिता! आईने अण्णांना सहन केलं, पण त्यांचा स्वीकार केला नाही. आपण सहन करतो म्हणजे दुसऱ्याच्या डाचणाऱ्या गोष्टीवर सहनशक्तीचा पडदा ओढतो. ही सहनशक्ती एका क्षणी शबल होते, तेव्हा आतला ज्वालामुखी उसळून बाहेर येतो. दुसऱ्या व्यक्तीचा स्वीकार करताना मुळात, मनात प्रेमाचा प्रचंड स्त्रोत असावा लागतो. ते प्रेम वस्तूसारखं हातात पकडता येत नाही, पण सकाळच्या उबदार उन्हासारखं ते तुम्हाला जाणवतं. अण्णांच्या बाबतीत आईचं असं कधीच झालं नाही, त्यांना ती केवळ सहन करत गेली आणि हीच आईची खरी शोकांतिका ठरली. तुम्ही हे सगळं मोकळेपणानं सांगता, पण दोघांना समजून घेऊन सांगता. कोणालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही.

असाच एक प्रसंग.

तुम्ही एकदा आईला ‘टॉलस्टॉय लेखनामागची तुझी प्रेरणा काय होती?’ असं विचारलं, उत्तरही तुम्हीच दिलं. म्हणालात, ‘You never wanted to live as clerk’s wife & you never wanted to die as clerk’s wife’. असंच ना गं, आई?’ तुमची अतीव इच्छा असते, आईनं ठाम ‘नाही’ म्हणावं. आईच्या उत्तरासाठीचे चार-पाच सेकंदही तुम्हाला खूप मोठे वाटतात. आईच्या तोंडून ‘नाही’ उत्तर ऐकण्यासाठी तुम्ही अधीर असता आणि थंडपणानं आई ‘हो’ म्हणाली. पुढे तुम्ही लिहिता, ‘हा माझ्या आणि आईच्या संबंधातला टर्निंग पॉईंट होता. मी आईचं लेखन वाचणं केलं.’

काय प्रसंग आहे हा!

वरवर साधा वाटणारा, पण अंतरंगात अनेक प्रश्नांचा गुंता निर्माण करणारा. आई-अण्णांच्या संबंधांवर भाष्य करणारा, तुमची आईशी असलेली भावनिक मुळं पुरती विस्कटून टाकणारा. कमाल म्हणजे तुम्ही हाच नाही, असे अनेक प्रसंग अतिशय कुशलतेनं आणि संयमानं हाताळले आहेत.

एक शेवटचा प्रसंग सांगतो. त्याचा शेवट तुम्ही फार मार्मिक पण अंतर्मुख करणारा केला आहे.

रमेशशी तुमची ओळख होते. संबंध वाढतात. विचार आणि स्वभावाच्या तारा जुळतात. रमेश, त्याचं विचारविश्व, त्याची माणसं, या जगाला तुम्ही सामोरे जात असता, त्याचं जग हे हळूहळू तुमच्या परिचयाचं होत जातं आणि एका क्षणी तुम्ही ‘मी रमेशशी लग्न करणार’ असं आईला सांगता. आई हादरते. शांत होण्यासाठी घराबाहेर निघून जाते. आल्यावर आईचा पहिला प्रश्न –‘तुझे सासरे दलित आहेत. मालधक्क्यावर काम करतात. मी लग्नात माझ्या व्याह्यांची ओळख काय करून द्यायची?’ – या प्रश्रानं तुम्ही भांबावून जाता. ‘रमेशचे वडील – ही ओळख नाही का पुरेशी ?’ असा साधा प्रश्न तुम्ही विचारता. पण आई तोपर्यंत वेगळ्याच अवकाशात गेलेली असते. दोघांच्या अवकाशाचा जणू काही संबंधच नसतो. पुढे तुम्ही लिहिता, ‘एक अनोळखी जग ओळखीचं होता-होता ओळखीचं मात्र अनोळखी व्हायला लागलं.’

मोठ्या लेखनाचं एक वैशिष्ट्य असं असतं की, ते वाचत असताना तुमच्या मनात त्याला समांतर जाणाऱ्या विचारांचे नवे तरंग तयार होत असतात. एकाच वेळी तुम्ही तेही वाचत असता आणि समोरचं लेखनही. तुमच्या लेखनात हे सारं एकवटून आलं आहे.

त्यानंतर रमेश तुमच्या आयुष्यात येतो आणि आयुष्याची दिशाच बदलते. तुमचं नवरा-बायकोचं नातं, त्यात नव्या कुटुंबाशी, नव्या जगाशी जुळवून घेताना तुमची झालेली ओढाताण, छोट्या-मोठ्या प्रसंगातून होणारे समज-गैरसमज, दोघांचे झालेले अपेक्षाभंग हे तुम्ही फार प्रांजळपणं मांडता. ‘या प्रवासात रमेश माझा मित्र नाही होऊ शकला’ हे शल्य तुम्हाला इतकं वेदनादायक होतं की, ‘तुझ्यात आता ब्राह्मण्याचा अंश शिल्ल्क राहिला नाही.’ ही रमेशची मृत्यूआधीची कबुलीसुद्धा तुमच्या मनावर समाधानाची फुंकर घालू शकली नाही. इतक्या तुम्ही मिटून गेल्या होतात. या सर्व गोष्टी वाचकाला आतून हलवून जातील.

वास्तविक नवं पुस्तक लेखकाच्या हाती देताना एक छोटं पत्र पाठवण्याचा ‘राजहंस’चा संकेत आहे. तसंच एक छोटं पत्र तुम्हाला लिहिण्याचं डोक्यात होतं. लिहायला सुरुवात केली आणि वाहात राहिलो. असाच वाहात राहिलो, तर एक छोटी पुस्तिकाच तयार होईल; म्हणून आता थांबतो.

शेवटी इतकंच म्हणतो, की पुस्तकात तुम्ही एक लहानपणची आठवण लिहिली आहे.

एकदा वर्गात बसल्यावर समोर दिसत असलेल्या चिंचेच्या झाडावर तुम्ही एक पानभर लेख लिहिलात. शिक्षकांचं लक्ष गेलं. त्यांनी तो लेख वाचला. म्हणाले, ‘या मुलीनं काय सुरेख लिहिलंय बघा!’ हे तुम्ही पुरतं ऐकलंही नाही कारण तोपर्यंत तुम्ही मनानं आईपर्यंत पोहोचला होता. आईनं लेख वाचला. कौतुक केलं, म्हणाली, ‘सरडू, अगं, तू काय लिहिलयंस, याची तुला कल्पना नाही.’

आज सर्व पुस्तक वाचून झाल्यावर मी म्हणेन, ‘सरिताबाई, तुम्ही काय लिहिलंय, याची तुम्हाला कल्पना नाही!’