२४ नोव्हेंबर २०१८ या दिवशी दिगमा अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त माणूसकार श्रीगमा स्मृतिनिधी अर्पण सोहळा उत्साहाने साजरा झाला. त्यानिमित्त सुप्रसिद्ध लेखिका मंगला आठलेकर यांनी पत्ररूपाने त्यांचे मनोगत समारंभात वाचून दाखवले, ते येथे सादर केले आहे.

व्यासपीठावरील सन्माननीय आणि साहित्यप्रेमी रसिकहो, नमस्कार.

माझं हे एक साधंसं पत्ररूप मनोगत!

सर्वप्रथम पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त तुमचं मनापासून अभिनंदन आणि पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा! साधारणत: दोन महिन्यांपूर्वी मला डॉ. सदानंद बोरसेंनी फोनवर विचारलं की, ‘राजहंस परिवारानं २४ नोव्हेंबरच्या कार्यक्रमादिवशीच दिलीप माजगावकरांचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा करायचा, असं ठरवलं आहे. तर तुम्ही त्यांच्याविषयी बोलाल का?’

मी क्षणाचाही विचार न करता ‘हो’ म्हटलं. काही देणी अशी असतात, की ती सोबत वागवायला आवडतात. त्याविषयी बोलताना आपल्याला अवघडून जायला होत नाही. उदा. समृद्ध करणाऱ्या मैत्रीविषयी बोलायला मिळणं! तुमच्याविषयी मला बोलायला मिळणं, हा मी माझा सन्मान मानते.

तुम्ही तुमच्या लेखकांना आजवर खूप सुंदर पत्रं लिहिली आहेत. माझ्याकडेही तुमची काही पत्रं आहेत. कधी चेष्टामस्करी करणारी, मिस्कील तर कधी गंभीर, आत्मचिंतन करायला लावणारी. संदर्भ कुठलाही असो, लेखकाविषयीचा तुमच्या मनातला आदरभाव त्यात दिसल्याशिवाय राहत नाही. माझे-तुमचे काही विषयांवर मतभेदही झाले, काण मतभेद ठेवूनही परस्परांच्या विचारांचा आदरच करायचा असतो, हे तुमचं भान एकदाही सुटल्याचं मला आठवत नाही. वेगवेगळया निमित्तानं तुमचे हजारो माणसांशी संबंध आले असतील; वादाचे, मतभेदांचे प्रसंग आले असतील. दुखवणाऱ्या अप्रिय घटनाही घडल्या असतील. अशा वेळी मनाला गाठी बसल्याच नसतील असं नाही, पण त्यांचं विच्छेदन करत राहणं, शत्रुत्व जपणं हा तुमचा स्वभाव नाही.

आपली ओळख खूप उशिरा झाली. १९९४-९५च्या आसपास. तुमचा ‘राजहंस’चा प्रवास सुरू झाल्यानंतर तब्बल तीस-पस्तीस वर्षांनी. तुमच्या त्या प्रवासातल्या पडझडी तर खूपच नंतर कळल्या. विशेषत: ‘नेहरू डायरी’ प्रकाशित करण्याची तुम्ही अंगावर घेतलेली जोखीम… लाखो प्रतींचं… करोडो रुपयांच्या व्यवहाराचं स्वकन… तुमच्या प्रयत्नात कुठेही कसूर नसतानासुद्धा केवळ नशिबानं दिलेली हुलकावणी… त्यात बसलेला जबरदस्त फटका आणि परत एकदा पानिपतच्या निमित्तानं तुम्ही खेळलेला जुगार…! सगळंच मोठं विलक्षण होतं.

संघर्ष हा तर जगण्याचा एक अतूट हिस्सा आहे. तुमच्या आयुष्यात अशा संघर्षाच्या वेळा अनेक आल्या. राजहंसच्या प्रवासाविषयी बोलताना त्या तुम्ही व्यक्तही केल्यात. जोखीम पत्करल्याशिवाय यशाचा रस्ता उघडतच नाही. ती जोखीम तुम्ही अनेकदा पत्करलीत. मध्यमवर्गी परिास्थिंतीतल्या एका प्रकाशकाची खरंतर वाताहतीनंच झालेली ही व्यवसायाची सुरुवात आणि आज प्रकाशनक्षेत्रात त्यानं निर्माण केलेला स्वत:चा मानदंड! स्वत:च्या मर्जीनं प्रकाशन व्यवसाय निवडलेला नसतानाही त्यात घेतलेली ही उंच झेप!

हे फक्त तुम्हीच करू शकता.

राजहंस परिवार हा तर एखाद्या एकत्र कुटुंबासारखाच! पुणं-मुंबई, सातारा, नाशिक, नागपूर, गोवा ही अंतरं पार पुसून टाकली आहेत तुम्ही तुमच्या आपुलकीच्या वागण्यानं! तुमचा लेखक असो, तुमच्या कार्यालयात काम करणारी माणसं असोत, तुमची मित्रमंडळी असो, तुमच्या रक्ताच्या नात्याची माणसं असोत… साऱ्यांचं तुमच्यावर प्रेम! तुमच्या कार्यपद्धतीचा धाक तर राहिलाच, पण ‘माजगावकर आपलेच आहेत,’ असा विश्वासही निर्माण केलात तुम्ही साऱ्यांच्या मनात. गावोगावच्या तुमच्या ऑफिसमधल्या साऱ्या माणसांना आणि या कार्यक्रमासाठी इथं आलेल्या तुमच्या प्रत्येक लेखकालासुद्धा हेच वाटतं, की माजगावकरांशी आपलंच नातं सर्वांत जवळचं आहे, खास आहे. मी-सुद्धा ह्याच भ्रमात आहे, पण काय हरकत आहे आपण भम्रात राहिलो तरी! असे सुखावह भ्रमसुद्धा हवेतच की! काही असो, पण माणसं राखण्यातली तुमची हातोटी मोठी विलक्षण आहे, यात शंका नाही.

जगण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हे तुमचं सर्वांत मोठं वैशिष्टय! त्रास देणाऱ्या, निराश करू शकणाऱ्या गोष्टींवर सहज मात करता तुम्ही आणि तुमच्या सान्निध्यात आलेल्या माणसांनाही नवा विचार करायला भाग पाडता. कुणाचंच आयुष्य रेशमी असत नाही. अपयश, चुकामूक तर कुणालाच चुकली नाही. तेव्हा तुम्हीही यातून गेलेले असणारच. त्याचा कधी तुम्ही उच्चार केला नाही. पण अस्वस्थतेला वाट तर मिळायलाच लागते. ती मिळाली तुम्ही विविध प्रसंगी लिहिलेल्या लेखांतून.

तेंडुलकरांवरचा तुमचा लेख त्यांच्याविषयी लिहिता लिहिता तुमच्याच आयुष्यातल्या निसटलेल्या क्षणांविषयी आहे की काय, असं वाटायला लावणारा आहे. श्रीगमांच्या निधनानंतरचा तुम्ही लिहिलेला लेखही असाच रुखरुख लावणारा! तुम्हा दोन भावांतल्या अखेरपर्यंत अव्यक्त राहिलेल्या प्रेमाविषयीचा वीस वर्षांपूर्वी लिहिलेला हा लेख वाचताना आजही अंत:करण तुटतं. एकमेकांवर आतडयापासून प्रेम असतानाही हाती फक्त घुसमटच राहावी, हेच तर निर्दय प्राक्तन! तुमचा विशेष हा, की कोणतेच दोषारोप न करता तुम्ही हे प्राक्तन शांतपणे स्वीकारता. नातेसंबंधांवर हृदयस्पर्शी भाष्य करणारा हा लेख तुमच्या भावना, विचारातलं सच्चेपण आणि भाषेवरच्या प्रभुत्वाचं दर्शन घडवणारा आहे. मन मोकळं करण्याचा आणि परत पाय रोवून उभं राहण्याचा याहून शहाणा मार्ग नाही हे तर खरंच, पण लेखन तेवढयापुरतंच का ठेवलंत? तुम्ही लिहीत राहिला असता, तर मराठी साहित्यक्षेत्रात ‘दिलीप माजगावकर’ हे नाव एक दमदार लेखक म्हणून ख्याती पावलं असतं. अर्थात उशीर नसतोच कधी कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करायला! आयुष्याच्या संध्याकाळी सुरुवात केली, तरी आपल्यासाठी ती नव्या कामाची पहाटच असते.

तुम्ही हिंदुत्ववादी, उजव्या विचारसरणीचे आणि त्यामुळे तशाच लेखकांची पुस्तकं तुम्ही प्रसिद्ध करता किंवा अशाच विचारसरणीचे लोक तुमच्याभवती असतात, असंही तुमच्याबद्दल दबकत बोलणारी आणि अर्थातच स्वत:ला पुरोगामी म्हणवणारी काही मंडळी मला भेटली आहेत. पण तुमच्याकडे के. र. शिरवाडकर, शेषराव मोरे, स. रा. गाडगीळ, न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. नरेन्द्र दाभोलकर, तारा भवाळकर अशा वेगवेगळया विचारधारांच्या साऱ्या विचारवंतांनी लिहिलं! सर्वच विचारांचं तुमच्याकडे स्वागत असल्याचं मी पाहिलं आहे.

जगण्यासाठी धर्म आवश्यक आहे, असा तुमचा ठाम विश्वास असतानाही धर्मच नाकारणाऱ्या माझं धर्म आणि हिंसाहे पुस्तक तुम्ही सहज प्रसिद्ध केलंत. अमूक एक लेखक उजव्या विचारसरणीचा आहे, अमूक एक लेखक डाव्या विचारसरणीचा आहे आणि त्या निकषावर ह्याचं लेखन प्रकाशित करावं किंवा त्याला नाकारावं, असं कधी तुम्ही केलं नाही. कोणत्याही एका विचारधारेला वा राजकीय पक्षाला न बांधलेलं प्रकाशन हीच तुमची ओळख राहिली. डावे-उजवे असे गट करून भांडत राहणाऱ्यांच्या कोलाहलात मला तुम्ही नेहमीच खऱ्या अर्थानं रॅशनल वाटलात. लेखकाला त्याच्या लेखनस्वातंत्र्याविषयी विश्वास देणारा आणि स्वत:च एक विचारवंत असणारा प्रकाशक मला माझ्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात भेटावा, हे माझं भाग्य.

आवतीभोवतीचं अस्वस्थ करणारं वर्तमान हा तुमच्या चिंतेचा विषय आहे, हे तुमच्या प्रकाशनाच्या भूमिकेतून जाणवतं. वैचारिक लेखनातून नेहमी समाजाचं भरणपोषण होतं, हा हेतू तर विविध पुस्तकं प्रकाशित करताना मनात ठेवलातच. पण अमूक एक विषय वर्ज्यही मानला नाहीत. तुम्ही सर्व तऱ्हेच्या विचारांना तुमच्या प्रकाशनात जागा दिलीत. राजकारण, समाजकारण, नाटक, सिनेमा, संगीत, विज्ञान, कविता… यातली तुमची रुची तुमच्या प्रकाशनातून समोर येते. तुमचं कवितांचं पाठांतर तर अवाक करणारं! तुमच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय तुम्ही प्रकाशित केलेल्या अनेक पुस्तकांतून येतो. किशोरी आमोणकरांचं स्वरार्थरमणी, विजया मेहतांचं झिम्मा, मोहन आपटेंचं आर्यभटीय, अरविन्द पारसनीसांचं आईनस्टाईनचा सापेक्षतावाद, दत्तप्रसाद दाभोलकरांचं माते नर्मदे, अंबरीश मिश्रांचं शुभ्र काही जीवघेणे… किती वैविध्य! आणि तेही केवळ विविधतेच्या हव्यासापोटी नाही, तर तुम्हाला स्वत:लाच त्यात विलक्षण रुची आहे म्हणून आणि ही सगळी मंडळी शब्दबद्ध झालीच पाहिजेत; आपल्या वैचारिक, सांस्कृतिक ठेव्याचं हे एक प्रकारे जतन आहे, अशीच जणू काही भूमिका! अनेक कलावंतांना तुम्ही लिहितं केलंत आणि हा सांस्कृतिक वारसा पुढच्या किाढीच्या हाती सोपवलात, त्याचं मोल खूप मोठं आहे. एकाच वेळी प्रयोगशील आणि लौकिकदृष्टयाही यशस्वी होणारा तुमच्यासारखा प्रकाशक दुर्मीळ!

इतकं सगळं करताना तुम्ही केवळ एक प्रकाशक नव्हताच. स्व आणि स्वेतर समाज जाणून घेण्याचं तुमचं कुतूहल ह्या वैविध्यपूर्ण निर्मितीतून दिसत राहिलं. तुम्ही स्वत:च तेंडुलकरांना लिहिलेल्या एका पत्रात ते व्यक्तही केलंय. तेंडुलकरांना तुम्ही लिहिता, ‘तुमचं पुस्तक मी प्रकाशित करतो, तेव्हा मी केवळ प्रकाशक उरत नाही. तुमच्या प्रत्येक नव्या पुस्तकाबरोबर आत्मशोधाच्या नव्या वाटेनं मी प्रवासाला निघतो.’

आत्मशोधाची आस असलेला तुमच्यासारखा प्रकाशकही अपवादात्मकच!

उगीच नाही श्री. पु. भागवतांनी तुमच्याविषयी गौरवोद्गार काढले! श्री. पु. म्हणतात, ”वाचकांची त्याचप्रमाणे प्रकाशनव्यवसायाचीही मनापासून काळजी वाहणारा माजगावकरांसारखा दक्ष प्रकाशक विरळा. मला त्यांच्याबद्दल फार आदर आहे. विशेष म्हणजे त्यांची स्वत:ची वाणी व लेखणी चांगली आहे. भावना व विचार ती पुस्तकरूपात व्यक्त करते. त्यांनी कधी प्रकाशक म्हणून आपले अनुभव प्राधान्यानं सांगणारं आत्मचरित्र लिहिलं, तर ते ‘मौज’ प्रकाशनाचं प्रकाशन झालेलं मला आवडेल.”

प्रकाशन क्षेत्रातल्या एका साक्षेपी, चिंतनशील प्रकाशकानं तुमच्याविषयी ही भावना व्यक्त करावी! याहून मोठी कोणती कमाई असते माणसाची? तुम्ही इतरांना खूप दिलंत. किती जणांना आर्थिक मदत केलीत, जगण्यासाठीचा विश्वास दिलात. मोठया लेखकांकडे तुम्ही कधी गेला नाहीत. उलट अनेक नवे, उदयोन्मुख लेखक मोठे केलेत. हे सारं करताना तुम्ही किती आणि काय काय मिळवलंय ह्याची साक्ष म्हणजे केवळ तुमच्यासाठी जमलेली ही समोरची गर्दी!

”सत्कार हा समाजोन्मुख कामाचा व्हावा असामान्य पराक्रमाचा व्हावा केवळ देवाच्या दयेमुळे किंवा दुर्लक्षामुळे वाढणाऱ्या वयाचा होऊ नये.” ह्या कुसुमाग्रजांच्या उद्गारानुसार आजचा हा सत्कार तुमच्या असामान्य कर्तृत्वाचाच आहे, ही आम्हा साऱ्यांची भावना आहे याची खात्री बाळगा.

मुखवटयांचीच गर्दी असलेल्या ह्या जगात तुम्ही तुमच्या मूळ चेहऱ्यानिशीच वावरलात. अधूनमधून लेखस्वरूपात कुठे कुठे व्यक्त होत राहिलात. त्या अधूनमधून व्यक्त होण्यातही तुमची समज आणि धारणा सकसपणे समोर येत राहिली. खूप कुतूहल आहे मला विविध सामाजिक प्रश्नांविषयी तुम्हाला काय वाटतं याविषयी, राजकीय कोलाहलासंदर्भातल्या तुमच्या सविस्तर भूमिकेविषयी, तुम्ही तुमच्या आयुष्याकडे कसं बघता याविषयी. तुमच्या आयुष्यातल्या सार्थकतेच्या जाणिवेच्या क्षणाविषयी आणि ‘तुझ्या आयुष्याचं फलित काय’ असं विचारणारी एखादी कातरवेळ जेव्हा समोर येऊन उभी ठाकते, तेव्हा तुमचा स्वत:शीच संवाद कसा घडतो याविषयीही!

तुम्ही लिहाच माजगावकर. सारं काही लिहा. तुमची पत्रं, तुमची भाषणं, तुमचे लेख, माणसाचं तुमचं आकलन, आणि मुख्य म्हणजे तुम्ही माणसावर केलेलं प्रेम………….मंगेश पाडगावकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर,

माणसाहून मोठे काहीच नाही

हे ज्यांना कळते

त्यांच्यासाठीच फुले उमलतात

त्यांच्यासाठीच सूर्य उगवतो

ही सारी फुले तुमची आहेत माजगावकर,

यापुढचे सारे सूर्य तुमचेच आहेत…….

पुन्हा एकदा शुभेच्छा!