राजहंस प्रकाशनतर्फे नुकतेच मंत्र गुंतवणुकीचा हे आर्थिक विषयांवर भाष्य करणारे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. ”  मंत्र गुंतवणुकीचा’  या पुस्तकाचे लेखक अरविंद परांजपे यांनी पुस्तक प्रकाशनावेळी मनोगत व्यक्त करताना, या पुस्तकात दिलेले  गुंतवणुकीचे मंत्र म्हणले तर फसवुणकीचे पिशाच्च दूर  पळून जाईल. तसेच त्या मंत्रपठणामुळे आर्थिक सुबत्तेचे तेजही मिळेल असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, सध्याच्या माहितीच्या महापुरामुळे सामान्य गुंतवणूकदार गोंधळून गेला असून त्यांना भेडसावणारे  प्रश्न लक्षात घेऊन या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.  अर्थसाक्षरता वाढवण्याकरता या पुस्तकाची बहुमोल मदत होईल. पुस्तकाचे प्रकाशन अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांच्या हस्ते झाले, तर यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, श्रीमती सीमा परांजपे व राजहंस प्रकाशनचे संपादक डॉ. सदानंद बोरसे उपस्थित होते.

राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त करताना पुस्तकाची उपयुक्तता विशद केली.  “आज  अनेक पुस्तके उपलब्ध असली तरीही वाचकाला नेमका सल्ला देऊन त्याप्रमाणे कृती करायला हे पुस्तक मदत करते. संत ज्ञानेश्वरांनी वर्णन केल्याप्रमाणे लेखकाचे शब्द ‘ साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ , अमृताचे !’ अशा  वर्णनाला साजेसे आहेत. म्हणजे खरे आणि सौम्य  तसेच , थोडक्यात आणि रस निर्माण करणारे असे आहेत. हे पुस्तक वाचून तुम्ही स्वतंत्रपणे विचार करु  शकाल आणि हेच या पुस्तकाचे यश आहे. वाचकांच्या गुंतवणुकीविषयक शंका दूर होतील आणि गुंतवणुकासारख्या गोष्टीसाठी कोणावर अवलंबून न राहाता स्वतः:चा विचार करता येईल. ”

” संपत्ती ही भारताची धारणा नसून ही पाश्चिमात्य धारणा आहे. समृद्धी हा भारताचा मंत्र असून त्यामध्ये केवळ मानवजातीचा नव्हे, तर संपूर्ण निसर्गाचा विचार होता. पैसा आणि सदिच्छा या भिन्न संकल्पना असून निस्वार्थता हा सेवेचा गाभा आहे. हा देश सेवेला महत्त्व देणारा आहे, असे मत भारतातील नव्या अर्थक्रांतीचे प्रवर्तक आणि अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञ अनिल बोकील यांनी व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन  कलापिनीचे डॉ. अनंत परांजपे यांनी केले.