जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या स्मृतिदिनी कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा वितरण सोहळा नुकताच जळगाव येथे पार पडला. भवरलाल यांनी साहित्याला बळकटी देण्यासाठी व भाषेला समृद्ध करण्यासाठी कल्पकतेने काही पुरस्कार सुरू केले. त्यामुळे दरवर्षी फाउंडेशनतर्फे साहित्याखेरीज विविध क्षेत्रांचे कार्य अधोरेखित करून 25 हून अधिक पुरस्कार दिले जातात. यंदा ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना प्रदान करण्यात आला. तर बहिणाई पुरस्कार मेघना पेठे (बाणेर-पुणे), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कार अजय कांडर (कणकवली, जि.सिंधुदुर्ग) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कार रफिक सूरज (हुपरी, जि. कोल्हापूर) यांना देण्यात आला.

सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ते म्हणाले, स्त्री भृण हत्या ही शिक्षित समाजामध्ये जास्त आढळून येते ही चिंतेची बाब आहे.  सध्या महिलांवरील अत्याचाराचे मूळ हेच आहे असे सांगत कायदासुव्यवस्थेसह पोलीस, सैन्य दलातील महिलांना अग्रक्रमाने स्थान दिले पाहिजे असेही त्यांनी सुचवले. सर्व पुरस्कार विजेते यांचे साहित्य व कलेविषयी कार्य हे राष्ट्र, धर्म, जात, लिंग यापलिकडेचा विचार करणारे आहे. सर्व पुरस्कारार्थी आपआपल्या क्षेत्रात दिग्गज आहेत, अशा व्यक्तींचा सत्कार ही चांगली बाब होय असे प्रतिपादन त्यांनी केले.

पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटक म्हणून कविवर्य ना.धों. महानोर उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित होते. जैन हिल्स परिसरातील गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पुरस्काराविषयीची भूमिका आनंद गुप्ते यांनी प्रस्तावनेत सांगितली.

यावेळी लेखिका मेघना पेठे म्हणाल्या, खरा पुरस्कार कोणता असा विचार केल्यानंतर, व्यक्त होत असताना लिहिण्यासाठी जीवनानं आपली निवड केली हाच मला सर्वोत्तम पुरस्कार वाटतो. कारण आपल्याला जे लिहायचे आहे ते लिहिल्यानंतर मिळणा-या आनंदाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही. संवेदनशील साक्षेपी वाचकाची दाद आणि त्यांना माझ्या लिखाणातून सोबत मिळाली वा त्यांची जाणीव विस्तारली, ही प्रतिक्रिया हा माझ्या दृष्टीने दुसरा पुरस्कार आहे. हे दोन्हीही अतिशय निर्मळ पुरस्कार आहेत. औपचारिक शिक्षण न मिळताही बहिणाबाईंनी आपल्या स्वतंत्र आणि स्वयंभू प्रतिभेने जे लिहिलं त्यातली शहाणीव थक्क करणारी आहे. त्यामुळे बहिणाबाईंच्या नावाने मिळणाऱ्या या पुरस्कारामुळे मला विशेष आनंद झाला आहे.

यावेळी राम सुतार म्हणाले, पुरस्कार हे स्फूर्ती देणारे असतात. काम करताना पुरस्कार मिळावे ही आस ठेऊ नये, फक्त सकारात्मक चांगल्यातील चांगले निर्माण करीत राहणे हेच आर्टिस्टचे ध्येय पाहिजे. एखाद्या झाडाप्रमाणे कार्य करीत राहणे हाच कलाकाराचा उद्देश असावा. आपल्या झाडाची फळं-फुलं कोण घेतं याचा विचार कलाकाराने कधीच करू नये. ज्ञानेश्‍वर शेंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.