फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे औचित्य साधून दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या आत्मकथनाचे प्रकाशक आणि त्यांचे सुहृद दिलीप माजगावकर यांनी त्यांच्या या पुस्तकानिमित्ताने त्यांच्या एकंदर साहित्याची आणि एक व्यक्ती म्हणून आजवर आलेल्या अनुभवांची केलेली विचक्षण पत्रात्मक चिकित्सा..  (सौजन्य : लोकसत्ता ४ ऑक्टोबर, २०१९)
—————————————————————————————–

१४ फेब्रुवारी २०१९

फादर,

सप्रेम नमस्कार.

‘ओअ‍ॅसिसच्या शोधात’पासून हातात हात घालून सुरू झालेल्या आपल्या प्रवासाने ‘नाही मी एकला’पर्यंतच्या परिक्रमेचं एक वर्तुळ पूर्ण केलं. बघता बघता पंचवीस वर्ष होत आली की या प्रवासाला! वाटेत लेखक-प्रकाशक संबंध केव्हा गळून पडले आणि केव्हा ते नात्यात रूपांतरित झाले हे कळलंच नाही, इतकं हे सहजी घडून गेलं.

एक फरक मात्र लक्षात आला- ‘ओअ‍ॅसिसच्या शोधात’ प्रकाशित करतानाची आपल्या दोघांची मन:स्थिती आणि ‘नाही मी एकला’च्या वेळची मन:स्थिती यांत फार तफावत पडली आहे. त्यावेळी आपण दोघांनी पन्नाशीचा उंबरा ओलांडला होता. ऐन उमेदीत होतो आपण. ‘एकला’च्या वेळी पंच्याहत्तरीची वेस आपण ओलांडली आहे. दोघांचाही एका अर्थी परतीचा प्रवास सुरू झाला आहे याची जाणीव आपल्याला झाली आहे, आणि दोघांनी ती स्वीकारली आहे.

त्यावेळी ‘राजहंस’ नव्या उमेदीनं, भरारीनं आकाशात पंख विस्तारत होतं. पाठीवर अपयशाची गाठोडी होती. नव्या कल्पना, धाडसी योजना यांनी भारावून जात होतो. सुचेल ते करून पाहत होतो. आपणही त्यावेळी वेगळ्या मनोविश्वात होतात. लेखनाच्या मदानात आपली तलवार तळपत होती. ‘ओअ‍ॅसिसच्या शोधात’च्या दैनिकातील सदरानं लोकप्रियतेचा कळस गाठला होता. आज वाचकांना त्या लोकप्रियतेची कल्पना करता येणार नाही. मी केव्हातरी पत्रात गमतीनं ‘सध्या आपली लोकप्रियता धकधक गर्ल माधुरी दीक्षितसारखी आहे,’ असं लिहिल्याचं आठवतंय. ‘ओअ‍ॅसिसच्या शोधात’च्या लेखनाचा वाङ्मयीनदृष्टय़ा भारदस्त ऐवज प्रकाशनासाठी हाती आला होता. त्याच्या साहित्यिक वजनाची मला जाण होती. मराठीत अशा पद्धतीचं लेखन दुर्मीळ होतं. प्रवाही ललित लेखन आणि वैचारिकता सहसा हातात हात घालून जात नाहीत. इथे ती पानोपानी भेटत होती. तुमच्या सहजत्स्फूर्त अशा ललित लेखनात कौटुंबिक-सामाजिक जाणिवांचे प्रवाह बेमालूमपणे मिसळून जात होते. त्याला तुमच्या संतवाङ्मयाच्या अभ्यासातून चपखल अशा ओव्या-अभंगांची तुम्ही जोड देत होता. ‘ओअ‍ॅसिस’ने तुमच्या व्यक्तिगत जीवनात एक न-कळत क्रांती केली. ती अशी की, एका बाजूने तुमची ‘फादर’ ही प्रतिमा सांभाळून तुम्ही मराठी झालात. मराठी भाषेच्या ऐन प्रवाहात स्वत:ला तुम्ही उभे करू शकलात.

पुस्तक निर्मितीच्या बाजूनं देखणं करावं, त्यात कसर राहू नये असा प्रयत्न होताच; पण त्या जोडीला ते लवकरात लवकर यावं असंही डोक्यात खूळ होतं. मी २६ जानेवारी तारीख मनाशी योजली होती. हाताशी वेळ कमी होता. युद्धपातळीवर निर्मिती सुरू होती. दोन दिवस आधी मुखपृष्ठ छापून झाले. पण मुखपृष्ठावरचा निळा रंग सतीश देशपांडे यांच्या मनासारखा जमला नव्हता. हाताशी चोवीस ताससुद्धा नव्हते. तरीही रातोरात नव्यानं मुखपृष्ठ छापून प्रती तुमच्यापर्यंत स्वतंत्र माणूस पाठवून पोहोचवल्या. रेखा ढोले यांच्याकडे छोटेखानी, घरगुती प्रकाशन समारंभ योजला होता. वि. स. वाळिंबे, डॉ. मुजुमदार, स. ह. देशपांडे अशी मोजकी लेखक मंडळी समारंभाला होती. तुमच्या हातात सकाळी दहापूर्वी पुस्तक मिळावं आणि त्याचवेळी इथे ते प्रकाशित व्हावं, अशी योजना होती. इकडे वाळिंबे पुस्तकाचं कौतुक करत असतानाच तुमचा फोन आला आणि तुम्ही झालेला आनंद फोनवरून व्यक्त केलात. ‘मी आत्ता चर्चमध्ये जाऊन प्रभूपाशी प्रार्थना करतो..’ असं म्हणालात.

दुसरा एक प्रसंग लख्ख आठवतोय, तो म्हणजे या पुस्तकाचं पुलंनी घरगुती प्रकाशन करावं अशी तुमची मनोमन इच्छा होती. पुलंची प्रकृती नरमगरम होती. बाहेरचे समारंभ आणि बाहेर जाणं या दोन्हींवर बंधनं होती. तरीही तुमचा माझ्यापाशी हा प्रेमळ हट्ट होता. मी पुस्तकाच्या प्रेमात होतोच; आणि तुमच्या प्रेमात हळूहळू पडत होतो, म्हणून सुनीताबाईंशी बोललो. त्यावेळी माझे ग्रह उच्चीवर असावेत. त्यांनी होकार भरला. घरीच जेवण ठरलं. तुम्ही आणि तुमचे दोन-तीन जीवलग (फादर असल्यामुळे ‘जीवलग’ यापुढे मित्र वाचा, मैत्रिणी नको.) यांच्यासह मुंबईहून तरंगत घरी आलात. भाई अन् सुनीताबाई पाच-दहा मिनिटांनी आलेच. पुढे जेवणं झाली, भाईंची विश्रांती झाली. ते दोन-तीन तास आपल्या दोघांच्याही दृष्टीनं जपून ठेवावा असा ठेवा होता. मला आठवतोय तो तुमचा भाई आल्याच्या आनंदानं भारावलेला चेहरा. तुम्ही त्यावेळी थोडे कमी बोललात; पण प्रत्येक क्षण आत भरून घेत होतात.

बाकी पुस्तकाचं झालेलं स्वागत, आलेले अभिप्राय, मिळालेले पुरस्कार हा आता इतिहास झालाय. त्याविषयी नाही बोलत.

एकदा आपल्याशी गप्पा चालू असताना त्याच ओघात काही वर्षांपासून मनात घोळत असलेला एक विषय चमकून गेला.. तो होता जगातल्या प्रमुख धर्मग्रंथांच्या प्रकाशनाचा. जगातल्या प्रमुख धर्माचे धर्मग्रंथ आपल्याकडून मराठीत प्रकाशित व्हावेत अशी एक योजना मनात होती. त्याला कारण भोवतालची परिस्थिती.

गेली काही वर्ष धार्मिक कारणांवरून एक प्रकारच्या अस्वस्थ, अशांत अशा वातावरणातून आपण सगळेच जण जात आहोत. पावलोपावली त्या- त्या धर्माचे आततायी अनुयायी आपल्या स्वार्थासाठी त्या- त्या धर्मग्रंथाचे मतलबी दाखले देऊन हिंसा, अत्याचार घडवून आणत असतात. ते धर्मग्रंथ मुळातून आपण समजून घ्यायला/ द्यायला हवेत. त्या- त्या धर्माची शिकवण, त्यांचे सिद्धांत, त्यांचे आचारधर्म हे माहीत करून घ्यायला हवेत, या एकाच हेतूनं हे प्रकल्प ‘राजहंस’कडून पूर्ण व्हावेत असा विचार गेली काही वर्ष मनात चालू आहे. त्यातलं पहिलं पाऊल लोकमान्य टिळकांच्या ‘गीतारहस्य’नं उचलावं, या विचारातून मी आणि वि. स. वाळिंबे त्यावेळी जयंतराव टिळक यांना भेटलो होतो. जयंतरावांनी या योजनेत विशेष रस दाखवला. चच्रेच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या, पण पुढे काही कारणानं हा प्रकल्प मार्गी लागू शकला नाही याची खंत आजही वाटत आहे.

त्या दिवशी आपल्याशी गप्पा मारताना हे सगळं कुठेतरी माझ्या मनाशी असावं. आणि तुमच्या रसाळ शैलीत चार-पाचशे पानांत तुम्ही ‘बायबल’ मराठी वाचकांसाठी करता का, असं मी तुम्हाला विचारलं. त्यावेळी अर्थातच हे इतकं मोठं शिवधनुष्य मी उचलतोय आणि तुम्हाला उचलायला लावतोय याची मलाही कल्पना नव्हती. मला होकार देताना ती तुम्हालाही नसावी. एका गाफील क्षणी आपण दोघं एकमेकांना शब्द देऊन बसलो. तुम्ही हे आव्हान स्वीकारलंत. पुढे दोन वर्ष मान मोडून आणि मांडी ठोकून ते पेललंत. या ग्रंथाला टीपा आवश्यक आहेत, ही आनंद हर्डीकरांची बहुमोल सूचना तुम्ही स्वीकारलीत आणि त्या ग्रंथाचं मोल शतपटीनं वाढलं.

तुम्हीच ‘बायबल’संबंधी लिहिताना असं लिहिलंत- ‘हे काम करताना अनेक पात्रं मला भेटत गेली. मानवी स्वभावाची, मानवाच्या दुबळेपणाची, तसंच त्याच्या महानतेची ओळख झाली. त्याच्या स्खलनशीलतेनं मला सावध केलं. दुर्बलतेवर त्यांनी मिळवलेल्या दिग्विजयानं मला नैतिकतेच्या मार्गावरून चालण्यासाठी प्रोत्साहन दिलं. भाविकांचे आध्यात्मिक पोषण करणारा, कलावंतांचे कुंचले आणि साहित्यिकांच्या लेखण्या यांना विषय पुरवणारा, जनसेवेसाठी आपल्या उभ्या आयुष्याचा यज्ञ करण्यासाठी प्रेरणा देणारा ‘बायबल’ हा अभिजात ग्रंथ आहे. त्याचा भावानुवाद करताना माझे हात पवित्र होत गेले.’

काय सुरेख लिहिता हो तुम्ही! ग्रंथाचं प्रयोजन आणि इतिकर्तव्यता लेखकानं किती नम्रपणानं सांगावी? हा नम्रपणा मूळ तुमच्या व्यक्तिमत्त्वात असल्यानेच लेखनात सहजपणे झिरपतो असं मला वाटतं. तुमचं जवळपास सर्व लेखन मी वाचलेलं आहे. अनेकदा पत्रातून, समक्ष आपण बोललो आहोत. तुम्ही फार सुबोध (‘सोपं’ या अर्थानं नाही.) लिहिता. तुम्हाला एक गंमत सांगू? दोन महिन्यांपूर्वी मी शिलाँगला गेलो होतो. साधारण शंभर कि. मी.वर उंब्रघाट नावाची नदी भारत-बांगलादेश या दोन देशांमधून वाहते. सर्वात स्वच्छ, नितळ, पारदर्शी अशी ही जगातल्या काही निवडक नद्यांपैकी एक. मला नदीतून जाताना असं लेखन करणाऱ्या काही लेखकांची नावं त्यावेळी आठवली. त्यात तुम्ही आणि माडगूळकर प्रकर्षांने आठवले. तुम्ही ख्रिस्ती धार्मिक, आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक आहात. संतवाङ्मयाचेही अभ्यासक आहात. या दोन्ही प्रांतांत तुम्ही सुखेनव रमता. हे खरं असूनही तुम्ही निसर्गविषयक लेखन कमालीचं सुंदर करता. इतकं कमालीचं, की तुम्हालाही त्याची पुरेशी जाणीव नसावी. आणि नसेल तर ते फार उत्तम आहे. एका कोठल्या तरी लेखात तुम्ही गावठी गुलाबाविषयी लिहिलं आहे.. ‘तरीही गावठी गुलाबाने घातलेली मोहिनी कधीच कमी झालेली नाही. चापूनचोपून बांधलेल्या पाकळ्या, त्याचा सौम्य गुलाबी रंग आणि विशेषकरून त्याचा सहज गंध. मोगऱ्याची उन्मादकता आणि रातराणीची मस्ती त्याच्यात नसते. तसा पारिजातकाचा मवाळ सोवळेपणा आणि तेरडय़ाचा भाबडा कोवळेपणाही त्यात नसतो. पण त्यात असते एखाद्या घरंदाज गृहिणीची शालीनता.’

खरं तर असं खूपसं काही तुमच्या निसर्ग-लेखनाबद्दल लिहिता येईल. या जोडीलाच तुम्ही मानवी संबंधांबद्दल फार आत्मीयतेनं लिहिता. घडलेले प्रसंग, तुम्हाला भेटलेली माणसं यांची संगती लावताना तुम्ही मानवी संबंधांबद्दल जाता जाता अंतर्मुख करेल असं भाष्य करता.

इटलीमध्ये फिरताना तुम्हाला यंत्रसंस्कृतीमध्ये माणसं यंत्रासारखीच जीवन जगू लागली आहेत असं जाणवत राहतं. तुम्ही लिहिता, ‘कुणी कुणाशी जास्त बोलत नाही. कोणाला कोणाची गरज भासत नाही. इथला प्रत्येक मानवाचा पुत्र ‘स्वाधीन’च असतो. कुणी ‘पराधीन’ नसतो. तो स्वयंपूर्ण असतो, म्हणून खूप एकटा नि एकाकीही असतो.’

तुमचं ‘ओअ‍ॅसिसच्या शोधात’ असेल, ‘सृजनाचा मळा’ असेल किंवा ‘नाही मी एकला’ असेल.. असं जागोजागचं पाहणं खूप वेगळं आणि मोलाचं आहे. उगाच नाही मराठी वाचक तुमच्यावर प्रेम करत!

आता या तुमच्या एकूण लेखनाच्या पाश्र्वभूमीवर जेव्हा मी ‘नाही मी..’ हे पुन्हा वाचलं. तेव्हा काय वाटलं ते लिहू? प्रयत्न करतो. बघा पटतंय का? नाही तर सोडून द्या. किंवा माझ्या मनात असलेल्या विचारवाऱ्यांची एक झुळूक समजा.

तुमचं निसर्गलेखन हे शक्तिस्थान खरंच. ‘एकला..’मध्ये याचा प्रत्यय कसा येतो बघा. तुमचं गाव, तिथलं मनाला भुरळ पाडणारं वातावरण, तिथला निसर्ग, तिथले लोक, त्यांची सुखदु:खं, सण-समारंभ, त्यांच्या सामाजिक जाणिवा याविषयी लिहिताना तुमची निवेदनशैली बघा, तुमचं व्यक्त होणं बघा. किती मोकळं मोकळं आणि प्रसन्न वाटतं. पण एकदा तुम्ही सेमिनारीचा रस्ता पकडलात, की तुमची लेखणी कळत-नकळत सावध होते. बंधनात पडते.

पुढचा भाग वाचनीय आहेच, पण तुम्ही मोकळे नाही आहात. पुढचं सगळंच लेखन हे वाचनीय, पण एका पठारावरून चालत जातं. असं बघा, सेमिनारीत प्रवेश करण्यापूर्वीचं तुमचं गावातलं आयुष्य हे एका अर्थी सरधोपट आहे. काही दलित चरित्रांतून जसं अंगावर येणारं वास्तव आपण अनुभवलंय, तसं तुमच्या बाबतीत नाही. पण तुम्ही हा सर्व भाग फार मोठय़ा उंचीवर नेऊन ठेवता. तुलनेनं पुढील आयुष्यातली तुमची वाट ही मळलेली नाही. सर्वस्वी वेगळी, सर्वसामान्यांना अपरिचित, म्हणून कुतूहल वाटणारी. तुम्हीच उल्लेख केलेल्या रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेप्रमाणे ‘लेस ट्रॅव्हल्ड’ अशी आहे. पण तिथे मात्र तुम्ही किती मोकळं व्हायचं, न व्हायचं या पेचात स्वत:ला अडकवून घेतलंत. पुढे ‘सुवार्ता’ आणि ‘हरित वसई’ इथे तर हे प्रकर्षांनं जाणवतं. तिथे वाटेतली अवघड वळणं घेण्याचं तुम्ही नाकारताच, किंवा वळसा घालून पुढे जाता. त्यामुळे आयुष्यातील घटनाक्रम कळतो; पण जगण्यातले पेच तुमच्या मनाशीच राहतात. वाचकांपर्यंत ते पोहोचत नाहीत. वाचकांनी अंतर्मुख व्हावे असे थांबेच या प्रवासात लागत नाहीत.

अर्थात तुमच्या म्हणून काही अडचणी असतील, बंधनं असतील. ती मी नजरेआड करत नाही. आत्मचरित्रात हीच मोठी अडचण असते. काही प्रसंगी स्वत:वर कडक आसूड ओढून घेण्याचा आपला निर्धारही आसुडाचे टोक इतर कोणाला लागेल अशा भीतीनं गळून पडतो. तसंच थोडंफार इथं झालेलं आहे.

वास्तविक मी ‘नाही मी एकला’च्या निमित्तानं चार ओळींचं पत्र लिहावं या विचारात होतो; पण लिहिताना तुमच्या लेखनात अडकलो आणि वेगळ्या अर्थानं प्रवाहपतित झालो. हेच तर तुमच्या लेखनाचं बलस्थान आहे. वाचक प्रवाहाच्या कडेला उभा राहू शकत नाही, तो सहजपणे त्यात ओढला जातो. असो.

आता थांबतो. काही लेखन प्रकल्प डोक्यात असतीलच.. त्या सर्वाना शुभेच्छा!

(सौजन्य : लोकसत्ता ४ ऑक्टोबर, २०१९)