चंद्रपूरमधील ‘चांदा क्लब’ आणि नागपूरच्या ‘विदर्भ साहित्य संघा’तर्फे चंद्रपूरमध्ये ‘राज्यस्तरीय साहित्य संस्कृती महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. महोत्सवातील ग्रंथदालनांमध्ये समाविष्ट असलेल्या ‘राजहंस’ प्रकाशनाच्या दालनाला साहित्य रसिक व वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. दिनांक २१ ते २३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत पार पडलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते सचिन खेडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार, पूर्व केंद्रिय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर, माजी खासदार नरेश पुगलिया आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नामदेवराव कल्याणकर उपस्थित होते.

ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी ‘राजहंस’च्या दालनाचेही उद्घाटन केले. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणेही उपस्थित होते. त्यांनी प्रदर्शनात खरेदी करत असलेल्या वाचकांना आपल्या ‘गोत्र’ या पुस्तकावर स्वाक्षरीही दिली. राजहंस प्रकाशनचे नागपूर शाखा प्रतिनिधी नरेश सब्जीवाले यांनी पाहुण्यांना नुकत्याच प्रकाशित झालेल्या शशिकांत पित्रे लिखित ‘या सम हा’ या पुस्तकाची प्रत व ग्रंथवेध भेट दिले. तीनही दिवस वाचकांनी राजहंसच्या पुस्तक दालनातून खरेदीचा आनंद लुटला. संमोलनातील ग्रंथदिंडी, परिसंवाद, कवी संमेलन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा उपस्थितांना आनंद लुटला. चंद्रपूर साहित्य संमेलनानंतर झालेले हे मोठे संमेलन असल्याने विदर्भवासियांनी सर्वच कार्यक्रमांना भरभरुन प्रतिसाद दिला.