निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी लिहीलेल्या या सम हा या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला. भारतीय स्थलसेनाप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांच्या हस्ते या पुस्तकाचे मोठ्या थाटात प्रकाशन करण्यात आले. बाजीराव पेशवे यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घ्यावी इतके मोठे कतृत्व आहे. मात्र आपल्या मातृभूमीतही त्याची विशेष दखल घेतली गेलेली नाही अशी खंत बरेच दिवस सतावत असल्याने आपण हे पुस्तक लिहील्याचे पित्रे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

यावेळी नरवणे म्हणाले, काही सेनापती लढाया जिंकतात, तर काही हरतात. मागील युद्धात केलेल्या चुका पुन्हा होऊ न देण्यासाठी लष्करी इतिहासाचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. वीस वर्षे भारतभर अखंड मोहिमा काढत कधीही न हारता चाळीस लढाया जिंकणारा बाजीराव हा अद्वितीय योद्धाच नव्हता, तर सैनिकांच्या आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या सोल्जर्स जनरलने सैन्यशास्त्राला केलेले हे अमूल्य योगदान आहे, असे ते बाजीरावांचे कर्तृत्व सांगताना म्हणाले.

पुस्तकाचे संपादक आनंद हर्डीकर यांनी पुस्तकाची प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी किमान युद्धसंसाधनांचा वापर करुन शत्रूला नामोहरम करणाऱ्या बाजीरावाच्या अमोघ कौशल्यावर पित्रे यांनी प्रकाश टाकल्याचे त्यांनी सांगितले. राजहंस परिवाराच्या सहभागाने या पुस्तकाला मूर्त रुप मिळाल्याचे शशिकांत पित्रे यांनी अतिशय नम्रपणे सांगितले.