प्रिय मंगेश पाडगावकर..

तुम्ही गेल्याला आता चार वर्षं होतील. सलग आठ दिवस गेले नाहीत, जेव्हा तुम्ही आठवला नाहीत. आताच बघा, तुम्हाला पत्रातून भेटावं, जुना काळ, जुने दिवस आठवावेत,असं ठरवलं आणि तीस वर्षांपूर्वीच्या दादर येथील हॉटेल अॅमीगोमधल्या आपल्या गप्पा आठवल्या. तुम्ही, वि.स.वाळिंबे (गमतीनं त्यांना तुम्ही ‘ट्वेंटी वाळिंबे’ म्हणायचात. वास्तविक हे नाव त्यांना ग.दि.मां.नी दिलेलं होतं) आणि मी असे तिघेच होतो. गप्पांमधे केशवराव कोठावळ्यांचा विषय निघाला. वाळिंब्यांचे ते परममित्र. दोघांची घट्ट मैत्री. कोठावळे गेल्यावर वाळिंबे यांनी ‘ललित’मधे त्यांच्यावर लेख लिहिला होता. तो लेख आपल्या दोघांच्या अपेक्षांना उतरला नव्हता. वाळिंबे यांची समज आणि शैली त्यात कुठे उतरली नव्हती. त्यावर तुम्ही म्हणालात, “ट्वेंटी, माणूस फार जवळचा असेल ना, तर तो गेल्यावर तू लगेच त्यावर लिहू नकोस. अशा लेखनात जवळचा माणूस परका होत जातो. तेच तुझं या लेखात झालंय.”

तुम्ही गेल्यावर दैनिकांकडून मला तुमच्यावरच्या लेखनाची विचारणा झाली, तेव्हा तुमचे हेच शब्द मनाशी आले. मी नकार दिला. आताही चार वर्षांनंतर या पत्रातून तुमच्याशी बोलताना ते डोक्यात घोळत आहेतच.

शाळा-कॉलेजच्या काळापासून तुमचं नाव परिचयाचं झालंच होतं. कविताही वाचनात आली होती. पण तेव्हा ते इतर चार मोठे कवी तसे तुम्ही इतकंच होतं. तुम्ही माझे झाला नव्हता. ते झालात ते दत्तप्रसाद दाभोळकरची आणि माझी मैत्री जशी आकार घ्यायला लागली, वाढायला लागली त्या काळात. मी मुंबईत कामासाठी जायला लागलो, त्याच्या गोरेगावच्या कुमकुम बिल्डिंगमध्ये उतरायला लागलो. आमची जेवणं-गप्पा रंगू लागल्या. विषय फक्त साहित्य आणि साहित्यिकांचाच असायचा. एका पावसाळी संध्याकाळी अशाच कवितेवर गप्पा रंगल्या.त्याच्या टेबलावर ‘सत्यकथे’चा नवा अंक पडला होता, त्यात तुमची एक कविता प्रकाशित झाली होती. दत्तप्रसादला ती पाठ होती. आणि नंतर तास-दोन तास दत्तप्रसादने तुमच्या आणि स्वत:च्या काही कविता धडाधड म्हणून दाखवल्या. ‘प्रश्नोपनिषद’ या नावाची तुमची कविता होती. अर्वाच्य शिवी ओठात दाटून यावी कचकचीत, तसे यांना गर्भात घेऊन दारिद्रय गरोदर राहिलं. ही ओळ ऐकली आणि क्षणभर दचकलो. तोवर इतकी भेदक सामाजिक वास्तव मांडणारी कविता डोळसपणे माझ्या वाचनात आली नव्हती. एखादं इण्ट्राव्हेनस इंजेक्शन टोचून घ्यावं, तसं वाटलं. त्या रात्री तुमच्या कवितेकडे मी प्रथम ओढला गेलो. नंतर तुमची पुस्तकं विकत घेऊन ती वाचत राहिलो. पण तुम्हाला कधी भेटावं हे आम्हा दोघांनाही सुचलं नाही म्हणा, वाटलं नाही म्हणा.

पुढे दोन वर्षांनंतर तुमची पहिली भेट झाली ती एका विचित्र प्रसंगात. १९६६ च्या ‘माणूस’ च्या दिवाळी अंकात हंसाबाईंची आत्मकथा प्रकाशित झाली. साहजिक ती चर्चेत आली. त्या निमित्तानं माझं हंसाबाईंकडे जाणं-येणं वाढलं. फार प्रेमळ होत्या त्या. वाचायच्या खूप. विडयाच्या पानाबरोबर गप्पा छान रंगवायच्या. माझ्याबरोबर कधी दाभोळकर, तेंडुलकर, पिंगे, सरवटे, रमेश मंत्री असायचे. एका संध्याकाळी सातच्या सुमारास पिंगे आणि मी त्यांच्याकडे सहज म्हणून गेलो. पण घरात शिरल्यावरच वातावरण गंभीर, उदास वाटलं. कण्हण्याचा, रडण्याचा आवाज येत होता. बाहेरच्या खोलीत नेहमीच्या कॉटवर त्या झोपल्या होत्या. अंगावर चुरगळलेली साडी होती. केस विस्कटले होते. शेजारी राजन म्हणजे बाबा जावळे- त्यांचा नवरा उभा होता. म्हणाला, “गेले आठ-दहा दिवस असं चालू आहे. पोटाचा गंभीर विकार आहे. डॉ.पुरंदरे सकाळ-संध्याकाळ पाहताहेत.” नंतर आम्ही थोडा वेळ बसलो. जुजबी बोललो. निघताना व्हरांडयात बाबा म्हणाला, “कोणी ज्योतिषी आहे का तुमच्या ओळखीत? हंसाचा फार विश्वास आहे ज्योतिष्यावर.” मुंबईत माझ्या तर ओळखीचं कोणी असण्याचा प्रश्न नव्हता. तेवढयात पिंगे म्हणाले, “अहो,आपला पाडगावकर आहे की !” मी विचारलं “कोण ? कवी मंगेश पाडगावकर ?” पिंगे म्हणाले, “हो, उत्तम ज्योतिषी आहे तो.” राजन म्हणाला, “पिंगे, काही करा,पण त्यांना एकदा घेऊन या.” पिंगे म्हणाले, “उद्या-परवाच घेऊन येतो.”

आम्ही खाली उतरल्यावर जवळच शेट्टीचं हॉटेल होतं तिथून पिंग्यांनी तुम्हाला फोन केला. तपशील सांगितला आणि दुसऱ्या दिवशी त्याचवेळी भेट ठरली.
मी हंसाबाईंकडे आधी पोचलो. आदल्या दिवशीपेक्षा हंसाबाई आज बऱ्या दिसत होत्या. कुंकू- पावडर लावून, केस विंचरून पडल्या होत्या. माझ्यामागोमाग पिंगे आणि तुम्ही आलात. बाहेर थोडा पाऊस होता. त्यावेळी प्रथम मी तुम्हाला पाहिलं. रुबाबदार, गोरापान रंग, हनुवटीखाली दाढी, निळा फुल बुश शर्ट, एक बाही चार-सहा इंच दुमडलेली. जाड काचांचा चष्मा. पिंग्यांनी ओळख करून दिली. पहिल्याच ओळखीत एकेरीवर आलात, म्हणालात, “अरे, तू फारच पोरसवदा दिसतोयस. मला वाटलं, तू चाळिशीचा असशील.” नंतर राजनशी आणि हंसाबाईंशी तुम्ही फार प्रेमानं बोललात. राजन प्रकृतीचे तपशील एका बाजूनं पुरवत होता. हंसाबाईंनी तुम्हाला पत्रिका दिली. तुम्ही सावरून बसलात. म्हणालात, “मला पाच-दहा मिनिटं द्या.” असं म्हणून तुम्ही सिगारेट काढली. झुरका घेतला आणि पत्रिकेकडे बारकाईने आणि अत्यंत एकाग्रपणे पाहत राहिलात. तुमचं असं एकाग्र पाहणं आणि ऐकणं पुढे मी अनेकदा अनुभवलं. मला ते कायम वेगळं वाटत आलं. जणू काही भोवतालचं सारं जग तुम्ही त्यावेळी विसरलेले असायचा. त्याहीवेळी पत्रिका पाहताना तुम्ही स्वत:शीच पण थोडया मोठया आवाजात बोलत होतात, “अच्छा, शुक्र इथे आहे आणि त्याची मंगळावर दृष्टी आहे. तुमचा बुध इथं पडलाय. तुमचा रवी पंचमात आहे,” हे स्वत:शी बोलत होतात. नंतर तुम्ही हंसाबाईंकडे बघितलं आणि म्हणालात, “आता विचारा.” त्या म्हणाल्या, “मी यातून उठणार का नाही, ते सांगा, पाडगावकर.” तुम्ही क्षणाचाही विलंब न करता ठामपणे म्हणालात, “शंभर टक्के उठणार. ठणठणीत बऱ्या होणार. खाली उतरणार, फिरणार, पण एक सांगतो, तुमच्या कुंडलीचा पावसाशी संबंध आहे. बाहेर पाऊस असेल, तर आत तुम्हाला त्रास होईल. हा पावसाळा तुम्ही काढाल. पुढचा मात्र कठीण वाटतोय.” हंसाबाई आणि राजनचा चेहरा त्यावेळेपुरता खुलला. मग इतरही गप्पा झाल्या. आपण उठलो. निघालो.

सांगायचं म्हणजे दोन महिन्यांनी हंसाबाई बऱ्या झाल्या. माफक हिंडू-फिरू लागल्या. त्याचवर्षी डिसेंबरमधे त्यांच्या ‘सांगत्ये ऐका’ या चरित्राला ‘उत्कृष्ट वाड्.मय’ हा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. बाई समारंभाला आल्या. त्यांचे फोटो झळकले आणि पुढच्या वर्षी बाई गेल्या.

त्या गेल्या, पण तुमच्या-माझ्या आयुष्यभराच्या भेटींचं निमित्त होऊन गेल्या.

त्यानंतर आपण भेटत राहिलो. वारंवार भेटत राहिलो. एखादीच माझी मुंबई फेरी असेल, तुम्हाला न भेटता गेल्याची. कित्येक तास आपण एकत्र काढले. ऑफिस असेल आणि नंतर घर असेल. गप्पा. विविध विषयांवर गप्पा. त्यानंतर साग्रसंगीत जेवण. गप्पांना तर विषयांचं बंधन नव्हतंच. राजकारण, समाजकारण, साहित्य, संगीत आणि या सगळ्यांच्या केंद्रभागी असायचा या सगळ्यांमागचा माणूस. तो समजून घेण्याचा आणि देण्याचा तुमचा प्रयत्न. कधी कधी मला वाटतं, त्या गप्पा जर आपण टेप केल्या असत्या; तर तुमच्या विचारांचा, विचार करण्याच्या पध्दतीचा एक सांस्कृतिक ठेवा मागे राहिला असता. मी या सगळयामागे माझ्या शिक्षणाचा, माझी एकूण समज वाढवण्याचा एक भाग म्हणूनच सतत पाहत होतो. आजही पाहतो. मनात त्याची उजळणी करत असतो.

ही माझी धडपड तुमच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नव्हती. याचा अनुभव मला केव्हा आला सांगू ?

वि.स.वाळिंब्यांच्या मोठया मुलीचं लग्न मित्रमंडळ कार्यालयात झालं होतं. जेवायला उशीर होता; म्हणून तुम्ही, जयवंत दळवी, पिंगे आणि इतर दोघं-तिघं असे आपण जवळच्या कल्पना हॉटेलमध्ये चहा घ्यायला गेलो. तिथे बोलताना तुम्ही सहज बोलून गेलात, “दळवी, या दिलीपला तू ओळखतोस ना, तो गप्पा छान रंगवतो, पण सतत आपल्याला बोलतं ठेवतो. त्याला सगळयात रस आहे, पण तो गॉसिप करत नाही. त्याला भेटत जा.”
तेव्हा मी चपापलोच. म्हणजे तुम्ही मलाही जोखत होतात.
गप्पांमधे तुमच्याकडून न चुकता विषय निघायचा तो श्री.पु. भागवतांचा. काय तुमची विलक्षण मैत्री ! तुम्ही दोघं एकमेकांच्या जगण्याचा, विचारांचा जणू अभिन्न भाग बनून गेला होता. एरवी तर्कशुध्द बोलणारे तुम्ही, श्री.पुं.चा फक्त अपवाद करायचात. मीही ते भान ठेवून श्री.पु. तुमच्याकडून समजून घेत होतो. श्री.पुं.चं मोठेपण मी जाणून होतोच.

एक प्रसंग आठवतोय. ‘चतुरंग’तर्फे पु.लं.ना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात आला होता. आपण दोघं, यशोदाबाई, रेखा, मधू गानू सगळे समारंभाला गेलो होतो. समारंभ दादरला होता. श्री.पु., पु.लं.वर बोलणार होते, पण आधीचा कार्यक्रम खूप लांबत गेला. उशीर झाला होता. लोकांना लोकलची घाई होती. लोक पु.लं.ना ऐकायला उत्सुक होते आणि श्री.पु. बोलायला उभे राहिले. त्यांचं भाषण विचारगर्भ, अवघड, नीरस समीक्षेच्या अंगाने जाणारं होतं. लोक कंटाळले. टाळया पडू लागल्या. वाढल्या. पु.लं.नी उभं राहून सांगितलं, “हे भाषण महत्त्वाचं आहे. आपण शांतपणे ऐकून घ्या.” पण टाळया थांबेनात.
पुढच्या आठवडयात तुमच्या घरी जेवताना यशोदाबाईंनी हा विषय काढला, “काय, तुझ्या श्री.पुं.नी गोंधळ केला रे त्या दिवशी! त्यांना कळत नव्हतं का रे, आपण थांबावं ? त्याला काय एम.ए. चे विद्यार्थी समोर बसलेत असं वाटलं का?” तुम्ही म्हणालात, “पण त्याच्या बोलण्यात एक-दोन महत्त्वाचे मुद्दे होते, हे लक्षात घे.” त्यावर मी म्हणालो, “काही म्हणा तुम्ही, तिथे जमलेले लोक आपल्यासाठी नसून पु.लं.साठी आहेत, हे तुमच्या श्री. पुं. ना कळू नये ? एरवी तुम्ही अगदी विवेकी, विचारशील म्हणून तुमच्या श्री.पुं.चं वर्णन करता, मग त्या दिवशी कुठे गेला होता विवेक?” तुम्ही रागरंग ओळखून माघार घेतलीत. पण तरी ‘असं श्री.पुं.चं भान सुटायला नको होतं.’ असं पुटपुटलात. त्यात एक विषाद जाणवला मला.

मी रामदास भटकळांचं ‘जिगसॉ’ प्रकाशित केलं. उत्तम व्यक्तिचित्रांचा तो संग्रह आहे. तुम्हालाही ते आवडलं. पुढे चार-सहा महिन्यांनी मला रामदासचा फोन आला. म्हणाला, “श्री.पुं.चा ‘जिगसॉ’ आवडल्याचा फोन आला होता. म्हणाले, ‘मौजे’ला हे पुस्तक काढायला आवडलं असतं.” एकूण रामदास खुषीत होता. साहजिक होतं. मी मात्र श्री.पुं. बाबत विचार करू लागलो. केव्हातरी तुमच्याशी या बाबतीत बोलायचं मनात आलं. एकदा तुम्ही, यशोदाबाई, मुलगी अंजू, जावई दिलीप सगळेच पुण्यात आला होतात. सूर्या हॉटेलमध्ये उतरला होता. रात्री जेवणापूर्वी हॉटेलच्या खोलीत गप्पा झाल्या. मी म्हणालो, “मला श्री.पुं.चं एक कळत नाही. आज ते म्हणतायत, आम्ही ‘जिगसॉ’ काढलं असतं, याला काय अर्थ आहे ? रामदासचं लिखाण गेली आठ-दहा वर्षं विविध दिवाळी अंकांतून येत होतं. श्री.पुं.नी ते वाचलं असणारच. कारण सगळे साहित्यिक तर लेखन-विषय होते. मग दोन-चार व्यक्तिचित्रं वाचून श्री.पुं.ना रामदासच्या लेखनाचं सामर्थ्य कळू नये ? की शेवटची ओळ वाचल्याशिवाय लेखकाबाबत धोका पत्करायचा नाही, असं निर्धोक (safe) धोरण श्री.पु.ठेवतात?” यशोदाबाई, अंजूनीही या माझ्या म्हणण्याला होकार भरला. तुम्हाला मी म्हणतोय, ते पटलं होतं; पण आवडलं नाही. तुम्हाला तो विषय आणखी वाढवणंही नको होतं. त्यामुळे जुजबी उत्तर देऊन तुम्ही विषय थांबवलात. म्हणालात, “तू म्हणतोस त्यात अर्थ आहे. मी या बाजूनं श्री.पुं.चा विचार केला नव्हता. मी बोलेन श्री.पुं.शी याबाबत.”

नंतर तुम्ही अर्धा-पाऊण तास श्री.पुं.बद्द्ल बोलत राहिलात, ते विलक्षण होतं. श्री.पुं.विषयी तुम्ही किती खोलवर विचार करायचात, हे त्यातून माझ्या लक्षात आलं. श्री.पुं.चं मोठेपण नेमकं कशात आहे, हे मला कळून चुकलं. म्हणालात, “श्री.पु. हा खऱ्या अर्थानं मराठीतला सर्जनशील संपादक. मी गमतीनं त्याला म्हणतो की, परमेश्वरानं तुला सर्जनाचं एक केंद्र दिलं, पण ते स्वत:च्या लेखनासाठी न वापरता फक्त संपादनासाठी वापरायचं असं बजावून तुला खाली पाठवलं.” पुढे म्हणालात, “मी कोणत्या अर्थानं त्याला सर्जनशील म्हणतो, ते सांगतो. असं अनेकदा होतं, एखाद्या कवितेचं बीज मनात पडतं, त्याच्यातल्या काही धुरकट प्रतिमा, त्यातून एखादं-दुसरी ओळ मनात घोळत असते. वाटतं यात पुढे जावं, पण पुढची खात्री वाटत नसते. वाट निसरडी वाटते. अशावेळी पटकन विचार येतो, श्री.पु. शी बोलावं. पण एक लक्षात ठेव, मी त्या कवितेत मनाने दोन-चार दिवस, काही वेळा तर महिना-महिना असतो. मी फोन उचलतो. श्री.पु.ला माझी मन:स्थिती सांगतो. त्यावेळी श्री.पु.कदाचित कुठल्याशा कादंबरीचं हस्तलिखित वाचत असतो, लेखकाशी कादंबरीतल्या एखाद्या पात्राबाबत चर्चा करत असतो. त्यातून बाहेर पडून माझ्या संवेदनशीलतेच्या पातळीवर यायचं, माझ्या विचाराचा कोश समजून घेऊन मला एखादी कल्पना, प्रतिमा, शब्द सुचवायचा- हे श्री.पु. स्वत: सर्जक असल्याशिवाय करू शकेल का? हे श्री.पु.गेली पन्नास वर्षं करतो आहे. तेही साहित्याच्या सर्व वाड्.मयप्रकारात. मी तुला सांगतो, अठ्ठेचाळीस सालापासून माझी एकही कविता प्रकाशित झालेली नाही, जी मी श्री.पु.ला आधी वाचून दाखवली नाही.”

त्या रात्री तुम्ही मला श्री.पु.नव्यानं सांगितलेत.तुमचा सूर छान लागला होता. त्या रात्री एकूणच संपादन याविषयी तुम्ही खूप बोललात. मला बरंच देऊन गेलात.
हे सगळं मला इतक्या तपशिलात कसं आठवतंय सांगू ?

तो काळ माझ्या व्यक्तिगत आयुष्यात फार उलथा-पालथीचा काळ होता. ‘माणूस’ चं निशाण खाली पडलेलं होतं. त्याला एक प्रकारे मरगळ आली होती. तुम्ही ‘माणूस’चे सर्व नाही, पण बरेच अंक नजरेखालून घालत होता. एकदा तुमच्या काही कामानिमित्त आपण मुंबई आकाशवाणीवर गेलो होतो. तुमची संबंधित व्यक्ती स्टुडिओत गेली असल्याने आपण दोघंच कँटीनमधे चहा घेत बसलो. विषय ‘माणूस’चा निघाला. फार विस्ताराने, विचारपूर्वक, मोलाचं बोललात. म्हणालात, “ज्या पध्दतीने श्री.ग. आणि तू हे चालवत आहात, त्याचं मला कौतुक आहे. पण अलीकडचे ‘माणूस’ चे काही अंक पाहिले, तर मला काळजी वाटते. श्री.गं.च्या वैचारिक भूमिकेबाबत माझे मतभेद असतील, पण ज्या निष्ठेने, धडाडीने त्याने ‘माणूस’ उभं केलं त्याचं मात्र कौतुक आहे. पण साप्ताहिकाच्या माध्यमातून समाजसेवा, समाजजागरण करताना व्यवहार आणि ध्येयवाद याचा तोल सांभाळावा लागतो. आपला वाचक कोण, त्याला काय हवंय, त्याच जोडीला त्याला काय द्यायला हवंय, हे भान सुटून चालत नाही. ते सध्या तुमचं सुटलंय, असं जाणवतं. असंच चालू राहिलं, तर तुमचा ‘साधना’ व्हायला वेळ लागणार नाही. पण ‘साधना’ची गोष्टच वेगळी आहे. त्यांची ध्येय-धोरणं आणि त्यांचा व्यवसायाच्या मागचा विचार स्वतंत्र आहे. गेल्या वर्ष-दोन वर्षांतल्या काही अंकांचा, काही विषयांचा अपवाद सोडला, तर ‘माणूस’चे अंक या सामाजिक भानाखाली वाकलेले वाटतात. एकसुरी वाटतात. हे न पेलणारं ओझं तुम्ही फार काळ नाही उचलू शकणार. आणि मग अशा नियतकालिकांचा अपमृत्यू होतो. तुमचा तसा होऊ नये. याचा तुम्ही विचार करावा असं वाटतं.”

पुण्यात आल्यावर श्री.गं.शी मी हे बोललो. म्हणाला, “पाडगावकरांनी अचूक नस दाबलेली आहे. या गोष्टी आपल्यालाही जाणवतायत. पण सध्यातरी वेढा पडलाय खरा.”
एका बाजूने ‘माणूस’ची ही कथा, तर दुसऱ्या बाजूला प्रेसची घसरण झालेली. १९८०-८५ च्या काळात लेटरप्रेस मागे पडू लागला होता. त्याची जागा ऑफसेटच्या आधुनिक तंत्राने घ्यायला सुरुवात झाली. मुळात आमचा प्रेस छोटा. तो केवळ गरजेतून सुरू झालेला. मला यंत्राची भीती. केवळ नाइलाज म्हणून चालू केलेल्या प्रेसमध्ये माझं मन कधी रमलंच नाही. नवीन तंत्रज्ञान आणायचं, तर पुन्हा भांडवलाचा प्रश्न. आधीच इतक्या कर्जात होतो, की नवं कर्ज मिळण्याची शक्यता कमी. त्यामुळे त्या आघाडीवर काय करायचं, हा प्रश्न भेडसावत होता.

राहता राहिलं ‘राजहंस प्रकाशन’. तोवर मोजकी पुस्तकं काढून ‘राजहंस’ने छोटी असेल पण स्वत:ची ओळख निर्माण केली होती. पण जीव छोटा होता. दहा-पंधरा वर्षांच्या ‘माणूस’ आणि ‘राजहंस’ च्या उमेदवारीत एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की, माझं मन प्रकाशनात अधिक रमतं. अनेक विषयांतली माझी आवड आणि गती, ‘माणूस’च्या कामामुळे विषय शोधण्याची मनाला लागलेली सवय, अनेक लेखकांशी झालेली ओळख, त्यातून निर्माण झालेले मैत्रीसंबंध यातून आपण चांगल्या पुस्तकांचा, विषयांचा शोध घेऊ शकू- असं मला वाटत होतं. पण त्याचवेळी देशमुख, ह.वि.मोटे, रामदास, श्री.पु. यांची कामं बघून छाती दडपायची. वाटायचं आपल्याला मराठी भाषेची अॅकॅडमिक पार्श्वभूमी नाही, एखाद्या विषयाचं सखोल वाचन नाही, मग हे सगळं कसं झेपणार ? अशा अंधाऱ्या अवस्थेत माझे दिवस चालू होते. मनातून पुरता निराश होतो. रोजचा खेळ सुरू ठेवायचं नाटक उसनं अवसान आणून चालू ठेवत होतो. अशा मनाच्या विकल अवस्थेत एकदा मुंबईत आलो असता, संध्याकाळी तुमच्याकडे आलो. तुम्हाला माझ्या मनाची अवस्था सांगितली. तुम्ही खूपसे प्रश्न विचारून खुलासे करून घेतले आणि नंतर समोरच्या परिस्थितीचं मार्मिक विश्लेषण करत म्हणालात, “दिलीप, मी तुला दहा-पंधरा वर्ष जवळून ओळखतोय. या तुझ्या परिस्थितीविषयी तू अधूनमधून बोलत होतास. आता मी सांगतो, ते ऐक. प्रकाशकाला साहित्याची अॅकॅडमिक पार्श्वभूमी असणं केव्हाही चांगलं. पण ती नसेल, तर तू वाचनाने आणि जाणकारांशी बोलून ही कमतरता भरून काढू शकशील. पण मला विचारशील, तर प्रकाशकाकडे सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असायला हवी असेल; तर माणसांविषयीचं, जगण्याविषयीचं एक प्रकारचं कुतूहल. भोवतालच्या घटना-घडामोडी, परिस्थिती आणि त्यात सापडलेली माणसं या साऱ्यांकडे शोधकतेने बघण्याची नजर. हे पाहणं किंवा कुतूहल केवळ गॉसिप पातळीवरचं असून चालणार नाही, तर एकूण मानवी आयुष्याच्या काही मूलभूत प्रेरणा जाणून घेण्याविषयीचं ते असायला हवं. मी तुला अनेक वर्षं जवळून ओळखतोय. तुझे विचार,विचारांची पध्दत आणि बोलणं मला माहिती आहे. यातून तू नव्या विषयांचा, नव्या लेखकांचा शोध घेऊ शकशील. आणि स्वत:ला झोकून देऊन काम करशील, तर निश्चितपणे मोठा प्रकाशक होऊ शकशील.”

त्या दिवशी तुमच्याकडून बाहेर पडतानाचा मी पूर्ण बदललेला होतो. गेली दोन-तीन वर्षं गेलेला माझा आत्मविश्वास मला परत मिळाल्याचं जाणवलं. मी प्रकाशक होण्याचा निर्णय मनाशी घेतला. मी मोठा प्रकाशक झालो का छोटा, हा मुद्दा गौण आहे. पण मी प्रकाशक झालो. माझ्या मनाप्रमाणे काम करू शकलो आणि हे काम करताना मला जो आनंद मिळाला, त्याची कशाशी तुलना होऊ शकणार नाही. तो मला तुम्ही मिळवून दिलात.

नंतरची दहा-पंधरा वर्षं मी झपाटल्यासारखं काम केलं. अनेक नवे विषय, नवे लेखक, छोटे-मोठे प्रकल्प नेटाने पूर्ण केले. काही फसले, काहींना मर्यादित यश मिळालं, काही उत्तम दान पदरात टाकून गेले. तुम्हाला तर भेटत होतोच. सगळया गोष्टी सांगत होतो. मनात एक इच्छा होती,तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी. तुम्ही गद्य लेखन करत नव्हता. फार तर तुरळक प्रासांगिक गद्य लेखन करत होता. कविता मी प्रकाशित करत नव्हतो. त्यामुळे तुम्ही माझे लेखक व्हावं, असं मला कधी वाटलं नव्हतं. पण तुमच्या विचाराने, तुमच्या सहभागाने एखादं-दोन पुस्तकं करावीत, असं मात्र प्रकर्षाने वाटत होतं. त्या दृष्टीने आपल्यात केव्हा केव्हा बोलणंही व्हायचं.
एक कल्पना तुम्ही मला सांगितलीत. मधू लिमये तुमचे जवळचे मित्र होते. बोलताना एकदा म्हणालात, “मधूने काही व्यक्तिचित्रं पूर्वी लिहिली आहेत. मधू अतिशय सुरेख लिहितो. जयप्रकाश, नेहरू, लोहिया, इंदिराबाई अशांवर त्यांनं मराठी आणि इंग्रजीत लिहिलं आहे. तू त्यांचं पुस्तक कर.” मला कल्पना एकदम आवडली. मला म्हणालात, “मी तुला पत्र देतो आणि त्याच्याशी फोनवर बोलतो.” मी मागे लागलो, “आपण दोघं दिल्लीला जाऊ. भेटू. म्हणजे निश्चित काम होईल.” तुमचं ‘नको, तशी गरज नाही’, हे चालू होतं. नंतर तयार झालात. पण दोन दिवसांनी फोन करून म्हणालात, “दिलीप, खरंच तू इतका खर्च करू नकोस. मी मधूशी सविस्तर बोललो आहे. तुझं काम झालंय. तू त्याला केव्हाही जाऊन भेट.” मी दोन-चार दिवसांनी दिल्लीला गेलो. दत्तप्रसाद तिथे होताच. त्याची आणि मधू लिमयांची छान मैत्री होती. आम्ही दोघं मधू लिमयांकडे गेलो. दोन तास गप्पा झाल्या. जी कात्रणं त्यांच्या हाताशी होती, ती त्यांनी आम्हाला दिली. बाकीचे सात-आठ लेख शोधून पाठवतो म्हणाले. पण नंतर कोणत्या ना कोणत्या कामात ते अडकत गेले आणि आपलं ते पुस्तक झालंच नाही.

असाच दुसरा एक योग आला होता. एकदा तुमच्या ऑफिसमधे आपल्या गप्पा सुरू होत्या. तेवढयात तुम्हाला श्रीनिवास खळ्यांचा फोन आला. तुम्हाला भेटायला येतो म्हणाले. ते येईपर्यंत तुम्ही खळ्यांविषयी, त्यांचा साधेपणा, निगर्वी स्वभाव आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांचं कर्तृत्व याविषयी बोलत राहिलात.
इतरही संगीतकारांचे,गीतकारांचे विषय येत राहिले. बाबूजी-सुधीर फड़के यांच्यावर बोलताना म्हणालात, “त्यांच्यातल्या गायकाने त्यांच्यातल्या संगीत दिग्दर्शकावर काहीशी मात केली, असं मला वाटतं. श्रीनिवास गात नाही, हे फार चांगलं आहे.” थोडयाच वेळात खळे आले. मी प्रथमच त्यांना भेटत होतो, पण तुम्ही असल्याने अवघडलेपण नव्हते. कॉफी आली. गप्पा रंगू लागल्या. एखादी चाल सुचते कशी, हे खळे फार मोकळेपणानं सांगत होते. तेवढयात तुम्ही एका पुस्तकाची कल्पना मांडलीत, “दिलीप, आपण असा एक प्रयोग करून पाहू. मी मराठीतली गेल्या काही वर्षांतली उत्कृष्ट अशी दहा गाणी निवडतो. गाणं रसिकांपर्यंत पोचण्याआधी तीन कलावंत त्यात गुंतलेले असतात. कवी, संगीतकार आणि गायक. या प्रत्येकाशी आपण बोलू. त्यांचा त्या गाण्यामागचा विचार हा त्यांनी सांगावा. अशा तीस जणांच्या मुलाखती आपण कोणाला घ्यायला सांगू. या सर्व कलावंतांची निर्मितिप्रक्रिया सांगणारं एक छान पुस्तक त्यातून वाचकांसमोर येईल.” मी ‘नाही’ म्हणायचा प्रश्न नव्हताच. तुम्ही संयोजक म्हणून काम करायचं मान्य केलं. पुढे काय झालं, आता आठवत नाही. पण आपलं हेही काम फसलं.

आपण दोघांनी ठरवलेल्या गोष्टी होत नव्हत्या. पण एक अनपेक्षित गोष्ट मात्र घडली. निमित्त झालं ‘लोकप्रभा’ साप्ताहिकातील यशोदाबाईंच्या लेखाचं. माझ्या आठवणीप्रमाणे लेखकांच्या पत्नींनी लेखकाच्या घरावर, साहजिकच लेखकाच्या घरातल्या वावरावर, दोन-चार पानं लिहावीत, असं त्या सदराचं स्वरूप होतं. त्यात यशोदाबाईंनी एक लेख लिहिला. तो माझ्या वाचनात आला. इतर लेखकांच्या बायका सहसा लिहिणार नाहीत, इतका मोकळा आणि प्रांजळ असा तो लेख होता. त्यात एक प्रश्न होता, ‘तुमचे पाडगावकर व्यासपीठावर काव्यवाचन करतात, तेव्हा तुम्हाला प्रेक्षकांत बसताना कसं वाटतं?’ यशोदाबाई म्हणाल्या, “अतिशय कंटाळा येतो मला. त्याच त्याच कविता किती वेळ ऐकणार हो.” पुढे त्या म्हणाल्या,”दिवस तुझे फुलायचे, झोपाळयावाचून झुलायचे, हे लिहिणारे पाडगावकर बाहेर लोकांसाठी हं, घरात मुलांनी झोपाळा मागितल्यावर मात्र त्यांना दोन धपाटे मिळाले.” या चार पानांच्या लेखात मला यशोदाबाईंचं आत्मकथन दिसू लागलं. मी त्यांना म्हणालो, “लिहिता का आत्मचरित्र?” त्या म्हणाल्या, “श्री.पुं.ना दाखवू नका. ते काढणार नाहीत. कारण त्यांचं पाडगावकरांवर अतिशय प्रेम आहे. त्याच्या संबंधी ते काही अप्रिय चालवून घेणार नाहीत.” मी म्हणालो, “मी करतो ना.” त्या म्हणाल्या, “बघा, मंगेशला चालेल का, ते तुम्ही बघा.” मी नंतर तुमच्याशी बोललो.तुम्ही, ‘तुला योग्य वाटेल ते कर’, असं सांगितलंत. तुम्हाला फार आनंद झाला नाही, पण चेहऱ्यावर नाराजी नव्हती. पुढे वर्ष-दोन वर्षांत ते प्रकाशित झालं. श्रीनिवास कुलकर्णींनी त्याचं उत्कृष्ट संपादन केलं. या संपूर्ण काळात मी तुमच्याकडे बारकाईने पाहत होतो. तुम्ही एकदाही या पुस्तकाचा विषय काढला नाही. प्रगती विचारली नाही. पण एक धूर्तपणा केलात. एकदा सकाळी मला कमलचा म्हणजे तुमचा मुलगा अजित याच्या बायकोचा फोन आला. तिचं तुमच्यावर फार प्रेम. तुमची तर ती लाडकी होतीच. सून कमी पण मुलगी अधिक. फार लाघवी, प्रेमळ होती. अनेकदा आपल्याबरोबर ती, अजित, यशोदाबाई जेवायला येत. ती म्हणाली, “दिलीपराव, मला जरा तुम्हाला भेटायचंय. घरी नको. बाहेर. मला आईंनी बाबांविषयी जे लिहिलंय, तेवढाच भाग वाचायला द्याल का?” त्याप्रमाणे आम्ही भेटलो. काही भाग त्यांनी वाचला. म्हणाल्या, “यापेक्षा अधिक काही नाही ना ?” मी म्हणालो, “तुम्ही काळजी करू नका. श्रीनिवास काय, मी काय आम्ही काळजी घेऊच हो.” माझा अंदाज असा आहे की, तुम्हीच कमलमार्फत ही चाचपणी केलीत. माझ्याशी मात्र बोलला नाहीत. पुढे पुस्तक आलं. साहित्यिक वर्तुळात वाचलं गेलं. सुधीर रसाळांचा फार मोठा अभ्यासू लेख आला. आमची विनया खडपेकर पुण्यात त्यावर जाहीर बोलली. तुम्ही त्या भाषणाला हजर होता. ते भाषण आवडल्याचं मला सांगितलंत. पुस्तकाच्या आवृत्त्या निघाल्या. केव्हातरी मी तुम्हाला विचारलं, “आता दिवस लोटलेत. आता तरी सांगा की यशोदाबाईंचं पुस्तक कसं वाटलं ? वाचलंत की नाही?” तुम्ही माझं बारसं जेवलेले होतात. मंद हसलात आणि विषय बदललात.

यानंतर आपल्या नात्यात फार मोठा बदल झाला. मी केवळ तुमचा न राहता तुमच्या अवघ्या कुटुंबाचा घटक बनून गेलो. तुम्ही निवृत्त झाला होतात. त्यामुळे सगळया भेटी घरीच व्हायच्या. तुम्ही कामात स्वत:ला फार छान गुंतवून घेतलंत. कबीर, मीरा, सूरदास, बायबल (त्यातील चार शुभ वर्तमान), जोडीला तीन कवितासंग्रह… हे सगळं काम तुम्ही या काळात केलं. तुमची लेखनाची बैठक पक्की होती. एकदा म्हणालात, “तुला सांगतो, बापट, विंदा आणि मी यात सगळयात बुध्दिमान कोणी असेल, तर वसंत बापट. मराठी, संस्कृतवर विलक्षण हुकमत; पण आम्हा दोघांसारखी बैठक नाही रे. त्यामुळे बापटच्या बुध्दिवैभवाचं चीज झालं नाही. काही फुटकळ लिहीत राहिला. गप्पा विलक्षण रंगवायचा. अत्यंत बहुश्रुत. नकला छान करायचा. विंदा विद्वान तर खरंच पण बैठकीला पक्का. मला विचारशील तर काही प्रसंगी तो दाखवत असलेला गावरानपणा हा त्यानी अंगावरच्या सदऱ्याप्रमाणे वापरला. बोलायला रोखठोक. व्यासपीठावर मिळालेला नारळ वाजवून बघणारा. कधी तर पैसेही मोजून घेणारा. पण मनाने मोठा. आतबाहेर काही नाही. पण आमचे काव्यवाचनाचे कार्यक्रम व्हायचे ना, तेव्हा त्या संयोजकांशी या दोघांचं अनेकदा जमत नसे. पहिल्या भेटीतच हे दोघं अटी, मानधन, सोयी इ. सांगायचे. आम्हाला गरज नाही-असाच यांचा पवित्रा. पण ती चतुराई माझ्याकडे होती. एकाच वेळी आम्हाला गरज आहे, पण आम्ही गरजू नाही, हे मी बोलण्यातून त्यांच्यापर्यंत अचूक पोचवायचो. मंडळी हसत हसत बाहेर पडायची. ‘नको नको’ म्हणत असताना अॅडव्हान्स पाकीट देऊन जायची.” तुम्हा तिघांच्या मैत्रीबद्दल, तुमच्या जाहीर काव्यवाचनाबद्दल मला फार कुतूहल होतं. मी अनेकदा त्यावर तुम्हाला विचारायचो, पण तुम्ही फार काही बोलायचा नाहीत. “आमचे ते फार बहारीचे दिवस होते !” असं फक्त म्हणायचात. एकदा म्हणालात, “लोकांना असं वाटत असेल की, आम्ही तिघं जमलो म्हणजे कवितेवर बोलत असणार. पण तुला आश्चर्य वाटेल की, आमच्या गप्पांत कविता हा विषय वर्ज्य असायचा आणि एकमेकांच्या कवितेवर तर आम्ही कधीच बोललो नाही.”

पु.ल.त्याला कवितेचं ट्रिपल इंक्शन म्हणायचे. आज मला आश्चर्य वाटतं, त्या काळात आपण वारंवार भेटत होतो, तुम्ही, बापट आणि विंदा या तुमच्या त्रिकुटाचे जाहीर काव्यवाचनाचे कार्यक्रमही चालू होते. पण आपण सगळे मिळून एकदाही भेटलो नाही. मला फक्त एक भेट आठवते. तुम्ही आणि बापट त्यावेळी पुण्यात होतात. बापटांच्या मुलाने भांडारकर रोडच्या आसपास नवा ब्लॉक घेतला होता. तो बघण्यासाठी आपण गेलो. नंतर जेवायला गेलो. बोलताना पु.लं.चा विषय निघाला. त्यांची लोकप्रियता, एकपात्री कार्यक्रम याविषयी आपण बोलत होतो. बोलता बोलता बापट म्हणाले, “पु.लं.च्या एकपात्री कार्यक्रमाला प्रेक्षक जसा तुडुंब प्रतिसाद देतात,तसाच प्रतिसाद आपल्या काव्य-वाचनालाही मिळतो.” तुम्ही म्हणालात, “चुकतोयस. पु.लं. च्या कार्यक्रमाला लोक तिकीट काढून गर्दी करतात. आपले कार्यक्रम प्रायोजित असतात. ते आपण तिकिटं लावून केले, तर आपल्या बायकाही येणार नाहीत.” तुमचं वास्तवाचं भान किती पक्कं होतं, हे मला जाणवून गेलं.

एकदा बोलताना म्हणालात की, “अरे, अनेकदा मला त्या दोघांची आठवण येते. टिंगल-टवाळया आठवतात. त्यात आम्ही तिघंही बेरकी. आम्ही एकमेकांना सांगत असायचो की, आपल्याला काव्य वाचनासाठी पैसे मिळतात, हा भ्रम काढून टाकू. त्यावेळी आपल्याला बाकी दोघांच्या कविता ऐकाव्या लागतात, त्याची ती ऐकणावळ असते. तुला एक गंमत सांगतो. काही दिवसांपूर्वी विंदा घरी आला. त्याचं ‘अष्टपदी’ पुस्तक मला भेट द्यायला. चहा-पाणी झालं. गप्पा झाल्या. निघाला. जिना उतरून गेला. मी माझ्या खोलीत गेलो. तेवढयात तो पुन्हा हजर. म्हणाला, ‘मंग्या, एवीतेवी तू माझं पुस्तक वाचणार नाहीस, तर मलाच निम्म्या किमतीला विकत दे. मी बाहेर पूर्ण किमतीला विकतो.’ आणि हसत हसत निघून गेला.”

दुसऱ्या एका प्रसंगात तर मी हजर होतो. तुमच्या लग्नाला पन्नास वर्षं झाली,म्हणून दिलीप आणि अजितने एक शानदार पार्टी ठेवली. आपण शंभर एक लोक होतो. सुरुवातीचा भाषण-काव्य वाचनाचा समारंभ संपल्यावर सगळे जेवायला उठले. त्यावेळी कोणाला तरी दहा रुपयांची खाली पडलेली नोट मिळाली. त्यांनी ती तुम्हाला दिली. तुम्ही माईकवरून जाहीर केलेत, “इथे दहा रुपयांची एक नोट मिळालीय. विंदा सोडून ज्याची असेल त्याने घेऊन जावी.”

कवी म्हणून आणि गीतकार म्हणून या काळात तुमची लोकप्रियता सतत वाढत होती. ‘शुक्रतारा’चे अरुण दाते यांचे कार्यक्रम गावोगाव होत होते. अनेकदा तुमचा त्यात सहभाग असायचा. वाढतं वय, प्रकृतीच्या तक्रारी, जबर मधुमेह यामुळे सर्व सोयी असूनही तुम्हाला त्रास व्हायचा. झेपायचं नाही. अजित, यशोदाबाई ‘नका जाऊ’ म्हणत. पण जाण्याने तुम्हाला मनापासून आनंद मिळायचा. कारण तुम्हाला त्या निमित्ताने माणसं भेटायची, कौतुक व्हायचं. लोकांचं हे प्रेम तुम्हाला हवंहवंस वाटायचं. यातून मिळणारा पैसा तुम्हाला नको होता असं नाही, पण पैशासाठी तुम्ही कार्यक्रम घेत नव्हता. एकदा सकाळी आपल्या गप्पा सुरू होत्या. कुठे सांगली-कोल्हापूरच्या कार्यक्रमाविषयी, गर्दीविषयी सांगत होतात. नंतर उठलात. ‘आत ये’ म्हणालात. बेडरूममधे घेऊन गेलात. तिथलं कपाट उघडलंत. समोरच्या ड्रॉवरमध्ये शंभर, पाचशेच्या नोटांचा ढीग होता. म्हणालात, “परमेश्वर कशी गोची करतो बघ. मला आता पैशाची गरज नाही. अमेरिकन सरकारचं पेन्शन येतंय. अजितची प्रॅक्टिस कमालीबाहेर आहे. एरवी मी कार्यक्रमाचे पैसे दोन दिवसांनी नियमित बँकेत भरतो. पण गेले दोन महिने अखंड कार्यक्रम सुरू आहेत. मला पैसे मोजायला आणि बँकेत जायला वेळ नाही. आज या पैशांचं मी काय करू ? एक काळ होता, मी चाळीत राहत होतो. मुलांच्या शिक्षणासाठी नोकरीतून सुटल्यावर बसने लोकांच्या घरी जाऊन शिकवण्या घेत होतो. त्यावेळी दातावर मारायला पैसा नव्हता. आता पैसा आहे पण ….”

हे सारं तुम्ही एका कौतुकाने सांगत होता. कारण तुम्हाला तुमच्या लोकप्रियतेचं पुरेसं भान होतं. मला काही वेळा आश्चर्य वाटायच. वाटायचं, इतकी प्रतिष्ठा,इतका पैसा, इतकी लोकप्रियता मिळाल्यावर माणसाने मनानं तरी यातून थोडं निवृत्त व्हायला हवं. तुमची तीव्र आणि तरल बुध्दिमत्ता बघता तुमच्या मनात हे विचार डोकावले असणारच. याच विषयाच्या अनुषंगानं आपण कुसुमाग्रजांवार अनेक वेळा बोललो होतो. म्हणून तुमच्याकडून तरी मला असं काहीसं अपेक्षित होतं. पण तसं होत नव्हतं. यावर खूप विचार केल्यावर मला असं जाणवलं की, तुम्ही जसे एका बाजूनं एकान्तप्रिय आहात, तसे दुसऱ्या बाजूनं माणसांचे लोभी आहात. माणसं तुमच्यावर प्रेम करतात, तसे तुम्हीही त्यांच्यावर उत्कट प्रेम करता. माणूस हा तुमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहे. त्या दृष्टीनं मी तुमच्या कवितेकडे बघतो; तेव्हाही जाणवतं की, तुम्ही सर्व प्रकारची कविता लिहिली. अगदी बालकविता, वात्रटिका, प्रेमकविता, निसर्गकविता, राजकीय, सामाजिक कविता, गझल, गाणी, बोलगाणी हे सर्व प्रकार हाताळलेत; पण या सगळ्यांतून तुम्ही शोधत राहिलात तो माणूस. माणूस आणि त्याच्या विविध रूपांचा, मनोवस्थांचा शोध हीच तुमची कवितेमागची प्रेरणा राहिली. तुमच्या ‘सलाम’ काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, त्यावेळच्या भाषणात ‘माझी कविता कशासाठी?’ या प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही एक छोटी गोष्ट सांगितलीत. वडील चार मुलांना विचारतात, ‘तुम्ही पुढे कोण होणार?’ थोरला उत्तर देतो, ‘मी इंजिनियर होणार.’ दुसरा म्हणतो, ‘मी डॉक्टर होणार.’ तिसरा म्हणतो ‘मी सेनाधिकारी होणार.’ वडील चौथ्या मुलाला विचारतात, ‘तू कोण होणार?’ तो आपल्याच तंद्रीत असतो. वडील पुन्हा विचारतात, ‘अरे, तू कोण होणार?’ तो तंद्रीतून बाहेर येऊन म्हणतो, ‘मी .. मी.. माणूस समजून घेणार.’ वडील विचारतात, ‘तू काय समजून घेणार आहेस?’ ‘मी माणूस समजून घेणार आहे. माणूस सुखी होतो म्हणजे काय? दु:खी होतो म्हणजे काय? तो ज्या यशामागे छाती फुटेपर्यंत धावतो, त्या यशाचा नेमका अर्थ काय आहे? ते मिळाल्यावर तो सुखी होतो का? मृत्यूचा अर्थ काय? हे सारं मला समजून घ्यायचंय.’ पुढे तुम्ही म्हणालात,”माझी कविता कशासाठी, याचं उत्तर चौथ्या मुलाच्या उत्तरापेक्षा वेगळं नाही.”

तर असा हा माणूस ही केवळ तुमच्या कवितेमागची प्रेरणा नाही, ती तुमची अंतर्यामीची गरज आहे. तुमची जीवनधारणा आहे.

अनेक प्रसंगांत तुम्ही सर्वसामान्य माणसाशी कसे वागता, हे मी अनुभवलंय. एक-दोन प्रसंग सांगतो.

हे सांगताना मला ‘लगे रहो मुन्नाभाई’ सिनेमा आठवला. त्यातल्या नायिकेला एक मुलगा आवडतो. तो तिच्या प्रेमात पडलेला असतो, पण तो स्वभावाने कसा आहे ? माणूस म्हणून कसा आहे? आणि हे पहिल्या भेटीत ओळखायचं कसं, असा तिच्यासमोर प्रश्न असतो. तेव्हा चित्रपटातले गांधी तिच्या मदतीला येतात. ते म्हणतात, ‘एक साधी गोष्ट सांगतो. तो तुला हॉटेलमध्ये भेटणार आहे. तिथे तो तुझ्याशी, तुझ्या मित्रांशी चांगला वागेलच, पण तो तिथल्या वेटरशी कसा वागतो ते बघ आणि त्यावरून त्याची पारख कर.’

आता माझा अनुभव तुम्हाला सांगतो. आमच्या मुंबई ऑफिसमध्ये दोन-तीन मुलं कामाला आहेत. कोणाकडे पुस्तकं, हस्तलिखित, प्रुफं, निरोप पोचवणं अशी कामं ते करतात. ते अनेक लेखकांकडे त्यानिमित्ताने जातात, पण तुमच्याकडे जाऊन आल्यावर ते अतिशय आनंदात असतात. कारण तुम्ही प्रेमानं त्यांची विचारपूस करता, चहा-पाणी विचारता, मूळ गाव कोणतं, घरी कोण आहेत विचारता. त्यांच्या दृष्टीने तुमच्यासारखा मोठा माणूस, जो वृत्तपत्रातून, टी.व्ही.वरून पाहिलेला असतो तो आपल्याशी इतकं बोलतो-हीच मोठी गोष्ट असते. जी ते चार लोकांना सांगत असतात आणि हे तुम्ही फार सहजपणे करता.

दुसरा अनुभव सांगतो. अखरेची सात-आठ वर्षं तुम्हाला नागिणीसारख्या आजारानं छळलं होतं. अनेकदा फोनवर कण्हत, कुथत बोलायचात. त्यातही तुमचा गमत्या स्वभाव डोकवायचा. म्हणायचात, “ही नागीण किती बेअक्कल आहे बघ. या वयातही माझ्यासारख्या म्हाताऱ्याच्या कमरेला विळखा घालून बसलीय.” या आजाराच्या भयंकर वेदना असूनही त्या दिवशी तुम्हाला मुंबईबाहेरच्या एका पूर्वी घेऊन ठेवलेल्या कार्यक्रमाला जायचं होतं. अजित, यशोदाबाई ‘जाऊ नका’ असं वारंवार सांगत होते. मी तिथेच होतो. म्हणालात, “अरे, ऐनवेळी त्या संयोजकांची किती पंचाईत होईल? कार्यक्रमाला येणाऱ्या हजार-पंधराशे लोकांना तो काय सांगेल? मी गोळया-इंक्शन्स घेतो पण जातो.” एखाद्या व्यक्तीवर समाज जेव्हा वेडयासारखं प्रेम करतो ना, तेव्हा त्या माणसाला, प्रसंगी शारीरिक वेदना बाजूला ठेवून त्याला प्रतिसाद द्यावा लागतो. तसा तुम्ही देत राहिलात.

या शेवटच्या सात-आठ वर्षांच्या काळात मला तुमचं अजून एक वैशिष्टय जाणवलं. साहित्यिक काय, कलावंत काय यांचं स्वतंत्र असं कलेचं जग असलं; तरी नेहमीचा संसार, त्यातले व्याप आणि ताप, आजारपण, मृत्यू हे त्यांच्यामागचं चक्र तर सुरूच असतं. अखेरच्या या काळात तुम्ही चारीबाजूनं या चक्रात घेरला गेला होता. तुमची नागीण, यशोदाबाईंचं कमरेचं दुखणं, अजितचं आजारपण हे सगळं या काळात सुरू होतं. तरी तुमच्या कामात खंड नव्हता. बायबल, महाभारत, कवितासंग्रह ही सगळी या काळातलीच निर्मिती होती. मला आश्चर्य वाटायचं. एकदा या संदर्भात मी तुम्हाला विचारलं, “या वातावरणात आणि इतक्या त्रासात हे एकाग्र होणं तुम्हाला कसं शक्य होतं?” तुम्ही म्हणालात, “जोपर्यंत या सांसारिक काळज्या, हे आजार मला छळत असतात; तोपर्यंत मी सर्व सामान्यांसारखाच एक माणूस असतो. मलाही त्याचा त्रास होतो, पण एखाद्या क्षणी माझ्या मनात नव्या कवितेचं बीज पडतं, तिची धुनी पेटते, त्या क्षणी एखादं झुरळ झटकावं तसे हे सर्व ताप मी क्षणात झटकतो आणि माझ्या कवितेला सामोरा जातो”.

तेव्हा मला मागे केव्हातरी एका फ्रेंच चित्रकाराची वाचलेली मुलाखत आठवली. ती एका भारतीय पत्रकाराने घेतली होती. त्याने प्रश्न केला, ‘तुम्ही आज वयाने इतके थकला आहात. शारीरिक व्याधी तुमच्यामागे आहेत. तरी तुम्ही एवढी मोठी कामं या काळात कशी करता?’ तो चित्रकार हसला, म्हणाला, ‘मला तुम्हा भारतीयांची एक गोष्ट फार आवडते, तुम्ही लोक देवळात जाताना तुमच्या चपला, बूट बाहेर काढून ठेवता. आणि तुमच्या देवाला भेटता. मीसुध्दा माझ्या स्टुडिओत जाताना, माझे आजार,चिंता या जोडयाप्रमाणे स्टुडिओच्या बाहेर काढतो आणि माझ्या कॅनव्हासला भिडतो.’

अशी तुमची कामं, तुमचे कार्यक्रम, छोटे-मोठे सत्कारसमारंभ चालू असताना तुमच्या घरात मात्र एक मोठं संकट दबा धरून होतं. अजितची बायको कमलचं आजारपण. एका दुपारी चार वाजता तुमचा फोन आला. रविवार होता. मी घरी एकटाच होतो. म्हणालात, “दिलीप,ऐक, माझ्या घरी अजित-कमल दोघंही बाहेर गेलीत. यशोदा तिच्या खोलीत झोपलीय. अरे, आपली कमल..” असं म्हणून तुम्ही हुंदका दिलात. मी विचारलं, “काय झाल कमलला?” म्हणालात, “अरे, तिला ब्रेस्ट कॅन्सर झालाय. शेवटच्या अवस्थेत गेलाय. अजित मुंबईतल्या मोठमोठया डॉक्टरांना भेटतोय. पण आशा नाही रे ! अरे, घरात दोन दोन म्हातारी माणसं असताना या चाळिशीच्या मुलीला तो उचलून नेतोय.” बराच वेळ तुम्ही बोलत होता. मी ऐकत होतो. मी तुम्हाला धीर तरी कसा देणार होतो ?
पुढे कमल गेली.

यातून हळूहळू तुम्ही सावरलात. मन रमवण्यासाठी छोटे-मोठे कार्यक्रम करू लागलात. याच सुमारास तुम्हाला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. देखणा समारंभ झाला. गावोगावी तुमच्या सत्काराचे आणि काव्यवाचनाचे कार्यक्रम सुरू झाले. या सगळया आनंदसोहळयात तुम्ही जातीने हजर होता. पण मनाने नव्हता.
पुढे श्री.पुं.चं आजारपण सुरू झालं. तुम्ही मला म्हणालात, “एकदा येऊन भेटून जा रे.” मी आलो. आपण दोघे फडके नर्सिंग होम मध्ये गेलो. त्या दिवशी श्री.पु. उत्साहात होते. गप्पा छान झाल्या. श्री.पु. विनोद वगैरे करतात, हे मला नवीन होतं. तुमच्या नव्या कवितेबद्दल श्री.पुं.नी विचारणा केली. नंतर तिथून आपण निघालो.
ती माझी आणि त्यांची शेवटची भेट. तुम्ही शेवटच्या दिवसांत रोज घरी जात होतात. एक दिवस सारं संपलं. तुमचा मला फोन आला. ‘तू येऊ नकोस’, असं सांगितलंत. तुम्ही शांत होता. आवाजात काही खळबळ नव्हती. मला बरं वाटलं.

त्यानंतर आठ दिवसांनी एका संध्याकाळी तुमचा फोन आला. श्री.पुं.च्या आठवणीने व्याकुळ झाला होतात. भडभडून आल्यासारखे बोललात.
म्हणालात, “आता जगण्यात रस वाटत नाही, आता कविता तरी कोणासाठी करायची ?” खूप वेळ असंच बोलत राहिलात. थोडे मोकळे झाल्यासारखे वाटलात. म्हणालात, “एक मागू तुझ्याकडे ? माझी नवी कविता ऐकायला आता तो नाही. यापुढे मी तुला फोन करून त्रास देईन. तू ऐकशील ?”
मी ‘नाही’ म्हणायचा प्रश्न नव्हता. पुढे वर्ष-दोन वर्षं तुम्ही फोनवरून मला दहा-बारा कविता अधून मधून वाचून दाखवल्या. त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न गौण होता.
तुम्ही स्वत:ला असे रमवत असतानाच अजून एक घाव तुमच्या जिव्हारी बसला. दिलीपचा म्हणजे तुमच्या लाडक्या अंजूच्या नवऱ्याचा मृत्यू. फोनवरून तुम्ही मला त्याच्या आजाराबद्दल प्रथम सांगितलंत आणि मीच हादरलो. फोनवरून बोलताना तुमच्या मनाची उलघाल माझ्यापर्यंत पोहोचत होती, पण मी इकडून काय करू शकणार होतो ? अशा वेळी जे बोलायचं ते मी बोललो. पुढेही दोन-चारदा तुमचे त्याच्या आजाराच्या संदर्भात फोन आले. ‘अंजू आता एकटी पड़णार रे.’ असं तुम्ही व्याकुळतेनं म्हणालात. तुमचा भावनाशील आणि काळजी करणारा स्वभाव लक्षात घेता हा काळ खऱ्या अर्थानं तुमची सत्त्वपरीक्षा बघणारा काळ होता. अंजू आणि अजितने सर्वतोपरी प्रयत्न करूनही अखेर लिव्हर कॅन्सरच्या आजारातून तो बाहेर आला नाही.

दिलीप गेला.
मनात आलं की, जन्मभर तुम्ही कवितेतून माणसाचा शोध घेत राहिलात. त्याच्या तऱ्हेतऱ्हेच्या मनोवस्थेचा वेध घेत गेलात. असा हा माणूस हतबल होतो म्हणजे काय याचा अनुभव तुम्हाला या काळाने दिला.
या काळात थोडी मनाला उभारी देणारी घटना म्हणजे यशोदाबाईंच्या आग्रहामुळं तुम्ही कमला सुब्रह्मण्यम या विदुषीच्या ‘महाभारता’च्या अनुवादाचं काम नेटानं पूर्ण केलंत. तुमच्या घरी छोटेखानी समारंभ आपण केला. अंजू, अजित, यशोदाबाई या साऱ्यांनी कार्यक्रमाची छान तयारी केली. तुम्ही काहीसे सुखावलात.
त्यानंतर वर्षभरानं मात्र तुम्ही कोमेजत गेलात. बाहेर जाण्यासाठी उत्सुक नसायचात. आपण घरीच बोलायचो. पण गप्पा जुजबी व्हायच्या. दोन्ही बाजूनं त्यात जान नसायची. मीही यावेळपर्यंत सत्तरीचा उंबरठा ओलांडला होता. काही आजार मागे लागले होते. तुम्ही आवर्जून वारंवार विचारणा करायचात. ‘मुंबईतल्या कोणत्याही मोठया डॉक्टरांचा सल्ला हवा असेल, तर तू यांना मदत कर,’ असं अजितला सांगायचात. शेवटच्या काही भेटीत तर खुर्चीवरून उठताना हाताला आधार लागायचा. वजन कमी होत होतं.
अशीच एक भेट आठवतेय. सकाळी अकराचा सुमार होता. मी आलो. यावेळी तुम्ही नेहमीच्या खुर्चीवर नव्हता. माझ्या खुर्चीवर होतात. अंगावर फक्त अर्धी पांढरी विजार होती. पोटावर टॉवेल होता. त्यातून गोरी छाती दिसत होती. हातपाय पार सुकून गेलेले दिसले. थकला होतात. बोलायचा उत्साह नव्हता. शून्यात नजर लावून बसला होतात. मी समोर बसल्याचं तुम्हाला जाणवलं नव्हतं. यशोदाबाई, अजित औषध-पाणी सांभाळत होते. मी रागरंग ओळखून उठलो. तुम्ही उठायचा प्रयत्न केलात. इतके अशक्त झाला होतात की, माझा आधार तुम्हाला घ्यावा लागला. ‘जपून जा’ म्हणालात आणि संथ पावलं टाकत तुमच्या खोलीकडे निघालात. तुमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी गोठून तसाच उभा होतो. मी समजून चुकलो. ही आपली शेवटची भेट आहे. जिना उतरताना गलबलून आलं. पाय जड झाले. थोडी थोडकी नाही, पंचेचाळीस वर्षं तुम्ही माझं मनोविश्व व्यापून राहिला होतात. माझा आधार होतात. कुटुंबात किंवा व्यवसायात काही बिनसलं, तर मी तुमच्याकडेच यायचो ना ? एखादी नवीन कल्पना सुचली, विषय सुचला, तर एका उत्साहाने अधीरपणे तुमच्याशी बोलायचो. मी व्यासपीठीय वक्ता नाही, पण निमित्ताने केव्हा बोललो तर त्या आधी तुम्हाला फोनवरून भाषण वाचून दाखवायचो. तुम्ही शब्द अन् शब्द काळजीपूर्वक ऐकायचात. आता लक्षात आलं, हे उद्यापासून संपणार. गाडीत एकटाच होतो. रडू येईल असं वाटत होतं, पण सावरलो. थेट पुण्याला आलो.

अपेक्षेप्रमाणे दहा-बारा दिवसांनी अजितचा फोन आला, ‘बाबा गंभीर आहेत. काही सांगता येत नाही. एकदा येऊन जा.’ दुसऱ्या दिवशी रेखा आणि मी निघालो. अजितने तुमच्या खोलीतच हॉस्पिटल उभं केलं होतं. अजित, यशोदाबाई हॉलमधे बसल्या होत्या. अजित म्हणाला, “आत जाऊन येऊ. बघा ओळखतायत का.” आमच्या मागून तो आला. मोठया आवाजात तुम्हाला हाक मारत राहिला, “बाबा, बाबा, बघा कोण आलंय ? दिलीप माजगावकर आलेत. दिलीप.दिलीप. पुण्याहून आलेत.” पण तुमचे डोळे निस्तेज होते. बुबुळांची काहीच हालचाल दिसली नाही. तुमचा अनंताचा प्रवास सुरू झालेला होता. थोडा वेळ थांबून आम्ही बाहेर पडलो. दोघं तडक पुण्यात आलो. दुसऱ्या दिवशी मला उपचारासाठी रुबी हॉल नर्सिंग होममध्ये दाखल व्हायचं होतं.
दोन दिवसांनी सकाळी हॉस्पिटलमधे अजितचा फोन आला, ‘बाबा गेले.’

रेखा सकाळी दहाला हॉस्पिटलमधे येताना सर्व वर्तमानपत्रं घेऊन आली. ‘टी.व्ही. लावा’ म्हणाली, ‘पाडगावकरांच्या बातम्या सांगताहेत.’ मी ‘नको’ म्हणालो, पेपर्सची घडीसुध्दा उघडली नाही. शांत होतो.
मनाशी तुम्ही तुमच्या लाडक्या अजित, अंजू, अभय यांच्यावर केलेली कविता आठवत राहिली.
काळोखाचे थैमान घालीत हा वारसा येईल.
तेव्हा सूर्य घेऊन त्याला सामोरे जा.
माणसामाणसांत आम्ही उभ्या केलेल्या भिंती
कोसळून टाकणाऱ्या पोलादी पहारी व्हा,
पण पहारींची माणसांवर मात होऊ देऊ नका.
माणसाहून मोठे काहीच नाही.
हे ज्यांना कळते,
त्यांच्यासाठीच फुले उमलतात.

-दिलीप माजगावकर
भ्रमणध्वनी : ९८२२१९०६२३
‘ऋतुरंग’ दिवाळी २०१९ अंकातून