देशात झुंडशाही वाढली आहे

म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘निर्वासित आमच्या देशांमध्ये नकोत, असे म्हणणाऱ्या शक्ती बलवान होत आहेत. जगात असहिष्णुता वाढली आहे. सांस्कृतिक उंची नसलेली माणसे मुख्य स्थानी आली आहेत. अमेरिकेत तेच आणि भारतही त्याला अपवाद नाही,’ असे टीकास्त्र माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी रविवारी सोडले. ‘हिंदू धर्मात वाद-प्रतिवादाला स्थान होते. नास्तिक चळवळीचाही सन्मान होता. मात्र, आजच्या हिंदू धर्माचे स्वरूप उग्र आहे. देशात झुंडशाही वाढली आहे,’ अशी सडकून टीका करून, ‘हेकेखोरपणा सत्तेचा दुर्गुण आहे. ज्ञानाचे विरोधक सत्तेत येतात, तेव्हा हिंसा होते,’ अशी टिप्पणी त्यांनी केली.

राजहंस प्रकाशन आणि डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्र यांच्या वतीने पहिला ‘श्री. ग. माजगावकर स्मृतिसन्मान’ चपळगावकर यांना ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ‘राजहंस’चे संपादक डॉ. सदानंद बोरसे आणि केंद्राच्या प्रमुख व साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे उपस्थित होते.

‘जिभेवर नियंत्रण आणले, तरी मनावर आणता येत नाही. स्वातंत्र्याची ऊर्मी थांबवणे कोणत्याही राजवटीला शक्य नसते. माणसाचे अस्तित्व विचारशक्तीवर अवलंबून आहे. इतिहासातील एक हजार वर्षांचा काळ उदारमतवादाचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आहे. या काळातील भारतीय दर्शनांमध्ये आस्तिक-नास्तिक दोन्ही विचारधारांचे अस्तित्व होते. भारतीय संस्कृतीने विरोधी विचारांचे कायम स्वागत केले आहे; पण ही संस्कृती आता नाही. विचारस्वातंत्र्य चिंतेचा विषय झाला आहे,’ अशी खंत चपळगावकर यांनी व्यक्त केली.

लेखकाचे आणि वाचकाचे स्वातंत्र्य या विषयी ते म्हणाले, ‘झुंडशाहीच्या विरोधामुळे लेखक स्वातंत्र्य गमावतो. सरकार पुस्तकावर बंदी घालते, तेव्हा वाचकाचेही स्वातंत्र्य संपते. पूर्वीही उदार लोक अल्पमतात होते आणि बहुमत असहिष्णू लोकांच्या बाजूने होते. सरकारला फार भिण्याचे कारण नाही; कारण सरकारने बंदी घातली, तर न्यायालयात न्याय मागता येतो; पण झुंडशाहीचे बळी ठरणाऱ्यांचे काय? तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत पर्याय उरत नाही. दुसरीकडे लेखणी उचलून विनाअडथळा काहीही लिहिणे निर्माणशील स्वातंत्र्य नाही. लेखकाने स्तुतीपासून दूर राहिले पाहिजे. इमानाची शपथ घेऊन खोटे लिहिणार नाही, असे सांगितले पाहिजे. सल्ला देणारे विचारवंत समाजात आवश्यक आहेत.’

‘वैचारिक परंपरा समृद्ध, उदारमतवादी’

‘मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा संवाद नव्हता. कोणत्याही चळवळीत पश्चिम महाराष्ट्राने मदत केली नाही. आपण महाराष्ट्राचा भाग आहोत आणि महाराष्ट्रातच विलीन व्हायचे आहे, हा विचार मराठवाड्यातील सुशिक्षित मध्यमवर्गाने जिवंत ठेवला; पण पश्चिम महाराष्ट्राकडून प्रतिसाद मिळाला नाही. आमची मातृभाषा मराठी असूनही ‘तुम्ही मराठी बोलता का,’ असे विचारले जायचे,’ अशी खंत सुधीर रसाळ यांनी व्यक्त केले. ‘आपण संकुचित होत आहोत. आपली वैचारिक परंपरा समृद्ध, उदारमतवादी होती, हे सांगणे गरजेचे आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.