पुणे – निसर्गामध्ये राहिल्यामुळे आमचे आयुष्य समृद्ध झाले. प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण करणे आणि निसर्गामध्ये रमणे या गोष्टी आपल्याला अनेक अर्थाने घडवतात असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. राजहंस प्रकाशनाच्या ‘स्टीव्ह आणि मी’ या अनुवादित चरित्राच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. मंदाकिनी आमटे, प्रसिद्ध लेखक व पानिपतकार विश्वास पाटील, नाट्य दिग्दर्शिका आरती गोगटे, पुस्तकाच्या अनुवादक सोनिया सदाकाळ-काळोखे व राजहंस प्रकाशनचे संपादक डॉ. सदानंद बोरसे उपस्थित होते. तसेच राजहंसचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर, रेखा माजगावकर उपस्थित होते.

डॉ. आमटे म्हणाले, वन्य प्राण्यांबद्दल प्रेम आणि निसर्गाबद्दल आस्था निर्माण व्हावी यादृष्टीने काम व्हायला हवे. आपल्याकडे अनेकदा प्राण्यांबाबत भिती घातली जाते, त्यातून अंधश्रद्धा निर्माण होतात आणि मग मुक्या प्राण्यांचे बळी घेतले जातात, मात्र हे रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्राण्यांशी एकरुप होण्याचे काम स्टीव्ह इरविन यांनी केले, अर्धे जग स्टीव्ह यांच्यामुळे प्राण्यांच्या प्रेमात पडले. कायद्यांमुळे सध्या प्राणी व मनुष्य यांच्यात एकप्रकारचा दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्राण्यांच्या संदर्भातील धोरणांचा पुनर्विचार व्हायला हवा असे मत विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. अनुवादक सोनिया यांनी पुस्तकाच्या अनुवादाची प्रक्रिया आपल्या मनोगतातून व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी जमेनिस यांनी केले तर सचिन काळोखे यांनी आभारप्रदर्शन केले.