संपादकीय

वाचकहो, मराठीतील सुप्रसिद्ध वचन आहे ‘वाचाल तर वाचाल’. खरोखरी केवळ वाचनाने आपण वाचतो म्हणजे नेमके काय होते, असा प्रश्न अनेकांच्या मनात कायमच येत असतो.  आपल्या आत्मोन्नतीसाठी, आपले मन कायम प्रपुâल्लित ठेवण्यासाठी ते कायम कशाततरी गुंतवून ठेवावे लागते. यासाठी वाचनासारखा सुंदर, सोपा मार्ग दुसरा कोणताही नाही. कारण हे एकट्याने करता येते, खर्च कमी होतो; यासाठी कुठलीही मोठी साधने, उपकरणे लागत नाहीत;  मोठ्या जागेची आवश्यकता नसते. कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने वाचन करता येते. बसल्या जागेवरून अनेक ठिकाणांची सफर घडवण्याची ताकद फक्त स्वप्नात किंवा पुस्तकांत असते. माणसाला कल्पनेपेक्षा काहीतरी मोठे करायचे आव्हान आणि प्रेरणा पुस्तक देत असते.  पण यासाठी लागणारा अत्यावश्यक घटक म्हणजे वाचनासाठी लागणारी तुमच्या मनाची  तयारी!

कुठलातरी हेतू ठेवून केलेले वाचन असो वा केवळ छंद म्हणून केलेले, त्याचा लाभ नक्कीच  आहे. आपले मन हे टीपकागदासारखे असते, त्यामुळे त्याला योग्य ते खाद्य वाचनाच्या रूपात दिले तर त्याचा उपयोग नक्कीच होतो. आपण वाचलेले आपल्याला लगेच उपयोगात आणता येते असे नसले, तरी आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर त्याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो, याचे कारण आपल्या मेंदूत कुठेतरी त्याची नोंद झालेली असते.  

वाचन ही आपल्या मनाला प्रयत्नपूर्वक लावण्याची सवय आहे. यामध्ये आपण कित्येक तासांपर्यंत  एकाच जागी बसू शकतो. याचे दोन मुख्य परिणाम होतात. एकतर तुम्ही जे वाचत असता त्याचा आणि तुमच्या भवतालच्या जगाचा संबंध आपोआप तपासून पाहता. ही प्रक्रिया जाणिवेच्या पातळीवरची असते, ज्यामुळे आपला शब्दसंग्रह वाढतो, एकाग्रता वाढते आणि परिस्थितीचे आकलन करण्याची आपली क्षमता वाढते. दुसरे असे की वाचनामुळे तुम्ही दुसऱ्याला समजून घ्यायला शिवू शकता, त्यामुळे भावनिकदृष्ट्याही तुम्ही अधिक सक्षम होता! यामुळे तुम्ही स्वत: तर आनंदी होताच, पण आपल्याबरोबर इतरांनाही आनंदी करू शकता! वाचनामुळे आपल्याला आपला जुना काळ समजावून घेता येतो. उदाहरण द्यायचे तर ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादी धार्मिक ग्रंथांचे देता येईल. कर्मकांडात गुंतलेल्या समाजाला आपले खरे कर्तव्य काय आहे हे समजावून सांगणारी ज्ञानेश्वरी आजही उपयुक्त आहे. दासबोधात तर दैनंदिन आयुष्यात माणसाने वागावे कसे इथपासून राजकारण कसे करावे इथपर्यंत अनेक प्रकारांचे मौलिक मार्गदर्शन मिळते. ‘वाचन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने आपली प्रगती होत राहते आणि त्याच बरोबरीने आपले आयुष्यमानही वाढते’, असे जीवशास्त्राच्या संशोधक आणि प्रमाणित जीवन प्रशिक्षक सुजाता केळकर शेट्टी यांनी आपल्या ‘ 99 Not out! Your Guide to a Long and Healthy Life (Published by Penguin Random House India) या पुस्तकात  म्हटले आहे. यासाठी त्यांनी काही उदाहरणेही दिली आहेत.

जसे आपण म्हणतो की कमी कष्टात जास्त पैसे, तसे वाचनाच्या श्रमाच्या तुलनेत त्याचे लाभ जास्तच आहेत. तुम्हाला वाचनाची सवय नसेल तर, पुस्तक विकत घेणे शक्य नसेल; तर एखाद्या ग्रंथालयाचे सदस्यत्व घेणे, हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सुरुवात करताना तुम्ही तुमच्या आवडीच्या लेखकांची पुस्तके वाचू शकता, किंवा तुमचा एखादा छंद असेल तर त्याविषयीची उपलब्ध पुस्तके वाचू शकता. यासाठी हल्ली अनेक माध्यमांतून येणाऱ्या त्या पुस्तकांवरच्या प्रतिक्रिया वाचूनही निवड करता येते. किंवा विविध पुरस्कार, पारितोषिके मिळालेली पुस्तके वाचू शकता. आणि हे सर्व करण्यासाठी आज तुमच्या सोबतीला ऑनलाईन बुक स्टोर आहेत, वेगवेगळी रीडिंग अ‍ॅप्स हाताशी आहेत, अभिवाचनाचे वेगवेगळे प्रयोग, चर्चा, गप्पा, नवनवीन पुस्तकांवरचे सारांश लेखन, नाटक असे कितीतरी पर्याय आज उपलब्ध आहेत. आपली  इच्छाशक्ती  जर वाचनाच्या दिशेने लावली, तर आपण हे सहज साधू शकतो.

आजच्या जगात जिथे माणूस माणसाला मदत करायला कचरतो, तिथे पुस्तकेच माणसाचा आधार बनतात. आपल्या संस्कृतीत ‘ग्रंथ हेच गुरू’ असे उगाच म्हटले जात नाही. फक्त त्या सर्मिपत भावनेने आपण त्याकडे पाहायला शिकले पाहिजे.

‘गेम ऑफ थ्रोन्स’ या प्रसिद्ध पुस्तकाचा लेखक जॉर्ज आर. आर. मार्टीन म्हणतो, “ज्याला वाचनाची सवय आहे, तो मरणापूर्वी हजार आयुष्ये जगतो; पण जो वाचत नाही तो फक्त एकच आयुष्य जगतो.” आता दुर्लभ अशा मनुष्यजन्माला येऊन एक आयुष्य जगायचे की हजार, याचा निर्णय जाणकार वाचकांनी घ्यायचा आहे.

आरती घारे, कार्यकारी संपादक