संपादकीय

नमस्कार, इंग्रजी कालगणनेनुसार नवीन वर्ष सुरू झाले. कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर छान झाली तर शेवटही गोड होतो, असे आपण व्यवहारात कायमच म्हणत असतो. यंदा नवीन वर्षाची सुरुवात ९३व्या `अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ने होत आहे, ही मराठी रसिकांसाठी खरोखरीच अतिशय आनंदाची  घटना आहे.

साहित्य संमेलनाचा इतिहास पाहिला असता असे दिसून येते की, पुस्तकांच्या प्रसाराला चालना मिळावी आणि त्यावर एकत्र येऊन विचारविनिमय करावा, या हेतूने न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरवले. न्या. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पहिले ग्रंथकार संमेलन हिराबागेत भरले. दुसरे १८८५ मध्ये बुधवार पेठेतील सार्वजनिक सभेच्या जोशी सभागृहामध्ये भरले. यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी तिसरे संमेलन १९०५ साली मे महिन्यात सातारा येथे भरले. साताऱ्याच्या पाठोपाठ चौथे संमेलन पुणे येथे २६-२७ मे १९०६ या दोन दिवशी सदाशिव पेठेत विद्वान कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नागनाथ पाराजवळच्या मळेकर वाड्यात भरले होते. (`राजहंस प्रकाशना’चे सध्याचे कार्यालय याच वास्तूत कार्यरत आहे.) ही संमेलने दरवर्षी होत नव्हती. या संमेलनांना एखाद्या स्थायी संस्थेचे स्वरूप देण्याचा पहिला प्रयत्न या संमेलनात झाला.

२७ मे रोजी समारोपाच्या दिवशी `महाराष्ट्र साहित्य परिषदे’ची स्थापना झाली. या संमेलनाला लो. टिळकही उपस्थित होते. यानंतर परिषदेतर्फे संमेलने भरवली जाऊ लागली. १९६१मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांच्या पुढाकाराने `मराठी साहित्य महामंडळा’ची स्थापना झाली. १९६५ पासून महामंडळातर्फे साहित्य संमेलने भरवली जाऊ लागली. आज आपण याच रोपट्याचे विस्तारलेले स्वरूप पाहतो. पूर्वी केवळ मराठी राज्यापुरते सीमित असणाऱ्या या संमेलनाचा व्याप हळूहळू वाढत गेला. संमेलन राज्याबाहेरही भरवले जाऊ लागले. जेथे मराठी भाषक समाज जास्त प्रमाणात आहे अशा बृहन्महाराष्ट्रातील इंदोर, बडोदा, ग्वाल्हेर या शहरांबरोबरच गोवा, भोपाळ, रायपूर (छत्तीसगड), हैद्राबाद या ठिकाणीही संमेलने झाली. ही मराठीप्रेमींसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. २०१५ साली पंजाबमधील घुमानला भरलेले ८८वे संमेलन यशस्वी झाल्याचे आपल्याला ज्ञात आहेच.

मराठीच्या प्रसारासाठी सुरू असणारे हे संमेलन म्हणजे मराठी साहित्यप्रेमी जनतेसाठी एक आनंदाचा उत्सव असतो. या सोहळ्यात सर्व स्तरांतील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो. हे संमेलन ज्या भागात होते, तेथील वातावरण काही प्रमाणात का होईना साहित्याच्या वाऱ्याने ढवळून निघते. त्या परिसराचा साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, भौगोलिक इतिहास सादर करण्याची संधी तेथील लोकांना मिळते. ग्रामीण भागात तर मंडळी याला `उरूस’ किंवा `जत्रा’ म्हणतात. अध्यक्षीय भाषण महत्त्वपूर्ण असते. येणाऱ्या काळात भाषेच्या संदर्भात घेतल्या जाणाNया निर्णयांचा तसेच आजूबाजूच्या परिस्थितीचा वेध त्यामध्ये घेतला जातो.

एकाच ठिकाणी अनेक प्रकाशकांची वेगवेगळी पुस्तक दालने असतात. काही छोटी तर काही मोठी. पण वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके एकाच ठिकाणी पाहायला मिळणे आणि खरेदीसाठी उपलब्ध असणे, हे याचे प्रमुख आकर्षण म्हणता येईल. विशेषत: ग्रामीण भागातील पुस्तकप्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बाब म्हणता येईल.

याचबरोबर आणखी एक मोठी उलाढालही या निमित्ताने होत असते आणि आपल्यासारख्या विपुल मनुष्यबळ असणाऱ्या देशात यामुळे मोठा फरक पडतो. संमेलनासाठी मांडव उभारणारे, तेथील खानपानाची व्यवस्था बघणारे, विविध प्रकाशनांची दालने उभारणारे, आसन व्यवस्था सांभाळणारे, प्रकाश व ध्वनिव्यवस्था सांभाळणारे, संमेलनाच्या ठिकाणी पुस्तके आणि इतर साहित्य घेऊन जाण्याची वाहतूक व्यवस्था करणारे अशा कितीतरी लोकांना यामुळे रोजगार मिळतो. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातून संमेलन जर ग्रामीण भागात होत असेल, तर तेथे या निमित्ताने काही सोईसुविधा नव्याने उभ्या केल्या जातात. म्हणजेच केवळ साहित्यापुरते मर्यादित स्वरूप न राहता या संमेलनाला एक विधायक रूप प्राप्त होते.

संमेलनाचे अध्यक्षपद आजपर्यंत समाजातील अनेक मान्यवर लेखक, विद्वान, कवी, नाटककार इत्यादींनी भूषवले आहे. पहिले अध्यक्ष म. गो. रानडे हे तर न्यायमूर्ती होते. ६व्या संमेलनाचे अध्यक्ष भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य हे संस्कृत भाषेतील विद्वान होते. १७ व्या संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानकोशकार श्रीधर केतकर यांचाही इंग्रजी भाषेचा मोठा व्यासंग होता. या व्यक्तींचे इंग्रजीवर प्रभुत्व होते, पण मातृभाषा म्हणून मराठीही तितकीच उत्कृष्ट होती. परकीय भाषांतील ज्ञान मराठीत आणण्यासाठी त्यांनी झोकून देऊन काम केले. कारण मातृभाषा समृद्ध करण्यासाठी आणि जास्तीत जास्त ज्ञान मातृभाषेत आणण्यासाठी त्यांच्यात ती तळमळ होती. आज असे झोकून देऊन काम करणारे किती आहेत? आज मराठी मातृभाषा असणाऱ्या आणि इंग्रजी माध्यमांतून शिकणाऱ्यामुलामुलींच्या मराठीची दुरवस्था का?

आज आपण बघतो की, निरनिराळ्या वादंगांमुळेच संमेलन गाजते. हे सर्व बाजूला ठेवून केवळ आणि केवळ मराठी भाषेसाठी म्हणून या संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला काही सबळ धोरण मांडता येईल का, त्याद्वारे काही उपक्रम राबवता येतील का याचा विचार व्हायला हवा. तरच साहित्य संमेलन केवळ `जत्रा’ किंवा `उरूस’ या स्वरूपात न राहता साहित्यासाठी कार्य करणारे खरेखुरे व्यासपीठ होईल.

समाजमाध्यमांच्या अतिरेकाने वाचनसंस्कृती हरपत चालली आहे, अशी आजची स्थिती. संमेलनामुळे समाजमनात थोडी तरी चहलपहल सुरू होते. ज्याप्रमाणे आपण मोबाईलची बॅटरी काही वेळाने चार्ज करत असतो, त्याप्रमाणे अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपले मन परत रिचार्ज होते. आपण या वेगाने धावणाऱ्या आणि त्याच्यामागे आपल्याला पळवणाऱ्या जगात परत उत्साहाने कामाला लागतो, चांगल्या प्रकारे ताजेतवाने होतो.

कुठलीही भाषा परकीय भाषेतील शब्दांना सामावून घेत अखंड प्रवाही राहत असते; पण तिच्यावर परकीय भाषेचे अतिआक्रमण झाले तर तिचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते, म्हणून ते थोपवायला हवेच. आज आपल्या मराठीची हीच अवस्था झाली आहे. आई-बाबा यांसारख्या मराठीतील साध्या शब्दांची जागाही आता मम्मी-पपा हे शब्द घेऊ लागलेत. दैनिके, मराठी वाहिन्यांवरची बातमीपत्रे आणि दैनंदिन मालिका यांमधील मराठी भाषा वाचून आणि ऐकून आपण नक्की कोणत्या दिशेने प्रवास करतोय हा प्रश्न पडतो. जो समाज भाषेपासून दुरावतो, तो आपल्या संस्कृतीपासून दुरावतो व पुढे जाऊन नष्ट होतो, असे भूतकाळातील उदाहरणांवरून दिसते. म्हणूनच आपल्याला आपला समाज आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या मातृभाषेचे म्हणजेच मराठीचे रक्षण केले पाहिजे. संस्कारक्षम वयात जर चांगली भाषा मुलांच्या कानांवर पडली, तर खूप काही साधले जाईल; फक्त आपले प्रयत्न प्रामाणिक हवेत.

नवीन वर्षाच्या निमित्ताने आम्ही वाचकांना असे आवाहन करतो की, आपण रोजच्या वापरातील इंग्रजी शब्दांना काही जुने, काही त्या शब्दांचा अर्थ ध्वनित करणारे पर्यायी नवीन मराठी शब्द सुचवले तर आम्ही आमच्या सदरातून ते प्रसिद्ध करू, जेणेकरून मराठी शब्दसंग्रह वाढायला मदत होईल व खऱ्या अर्थाने मायमराठी शब्दलेण्यांनी समृद्ध होईल. उदा. मिस्टर या शब्दासाठी श्रीयुत, हिलस्टेशनासाठी गिरीनगर, ई-मेलसाठी वीज टपाल. याप्रकारचे शब्द तुमच्याकडून अपेक्षित आहेत आणि ते व्यवहारातही कसे उपयोगात आणता येतील, याच्या युक्त्याही तुम्ही सुचवल्या तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते शब्द पोहोचवण्याचा प्रयत्न करू.

आरती घारे, कार्यकारी संपादक