राजहंस प्रकाशन आणि बळवंत वाचनालय यांच्या वतीने औरंगाबाद येथे नुकतेच राजहंस गप्पा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध लेखिका वैशाली करमरकर यांचे आंतरराष्ट्रीय दहशतवाद याविषयीचे व्याख्यान झाले तर दुसऱ्या दिवशी हमरस्ता नाकारताना या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका सरिता आवाड यांची मुलाखत घेण्यात आली. प्रा. जयदेव डोळे आणि मंगल खिवंसरा यांनी ही मुलाखत घेतली. औरंगाबादकरांनी दोन्ही दिवशीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मूळ जर्मन पुस्तक असलेल्या Wer den wind sat या पुस्तकाचा अनुवाद वावटळ पेराल तर वादळच उगवेल या नावाने करमरकर यांनी केला आहे. जगभरातील एकूण गुन्हेगारी, राजकारण, उद्योग यांचा एकूण पट या पुस्तकाच्या निमित्ताने मराठी वाचकांसमोर उभा राहण्यास मदत झाली आहे. या सर्व विषयावर करमरकर यांनी औरंगाबादकरांशी मनमोकळा संवाद साधला.

तर दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात लेखिका सरिता आवाड यांच्या मुलाखतीचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. आपला जीवनप्रवास उलगडताना त्यांनी आपल्याला आलेले अनेक कडू-गोड अनुभवल सांगितले. माणसाचे उजवे किंवा डावे विचार यापेक्षा त्याच्यातील माणूसपणाचा उमाळा लक्षात घ्यायला हवा. तसेच विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांवरही विचार व्हायला हवा अशी समाजिकदृष्ट्या महत्त्वाची वक्तव्ये आवाड यांनी यावेळी केली.