एखाद्याची आपल्या कामावरची निष्ठा, सगळयांप्रती असणारा निखळ स्नेह कसा असतो, व्यावसायिकतेच्या पलीकडे जात एखादा प्रकाशक लोकांना मैत्रीच्या धाग्यात कसं गुंफू शकतो आणि केवळ त्या स्नेहापोटी या ५ तासांच्या कार्यक्रमासाठी लोक कसे येऊ शकतात, याचं हे अत्यंत विरळं उदाहरण!
२४ नोज्ञहेंबर २०१८ ची संध्याकाळ. हवेत गुलाबी म्हणता येईल अशी थंडी. पुण्यातील डीपी रस्त्यावर घरकुल लॉनमध्ये वर्दळ जाणवू लागली होती. ‘माणूस’कार श्रीगमा स्मृती-निधी अर्पण सोहळयानिमित्त ‘राजहंसी’ दिगमा अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठी साहित्य, सामाजिक आणि कला क्षेत्रांतले अनेक तारे तिथे जमले होते.
मराठी साहित्यविश्वात ‘माणूस’ साप्ताहिक आणि ‘राजहंस प्रकाशन’ माहीत नाही, अशी व्यक्ती औषधालासुध्दा सापडणार नाही. या दोघांनी; त्यांच्या संपादक, प्रकाशकांनी अनेकांना लिहितं केलं. लेखकांच्या तसेच वाचकांच्याही काही पिढया घडवल्या असं म्हटलं, तर ते वावगं ठरू नये.
या अनोख्या कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर होते उत्सवमूर्ती दिलीप माजगावकर, त्यांच्या सुविद्य पत्नी रेखाताई, लेखिका मंगला आठलेकर, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या नियोजित संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ. कार्यक्रमाचं खुसखुशीत सूत्रसंचालन केलं प्रसिध्द पत्रकार, लेखक अंबरीश मिश्र यांनी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिलीप माजगावकर यांचा जीवनपट उलगडणारी एक छोटीशी फिल्म दाखवली गेली.
समाजासाठी वेगवेगळया क्षेत्रांत काम करणाऱ्या ७ संस्थांना ‘दिगमा’ म्हणजेच दिलीप माजगाकरांनी ५० लाख रुपयांच्या देणग्या दिल्या. आपल्या दिवंगत बंधूंच्या; ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांच्या; राष्ट्रवाद, ग्रामकिास आणि राष्ट्र उभारणी या तीन प्रिय सूत्रांचा विचार करून या संस्था निवडण्यात आल्या. या संस्था पुढीलप्रमाणे :
१) भारत गायन समाज – शास्त्रीय संगीतात पायाभूत काम करणारी संस्था.
२) पुनरुत्थान समरसता गुरुकुलम – तळागाळातील घटकांच्या उन्नतीसाठी काम करणारी संस्था.
३) रा. चिं. ढेरे सांस्कृतिक संशोधन केंद्र – वनसाधनेचा वारसा जपणारी संस्था.
४) डांग सेवा मंडळ – महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील आदिवासींसाठी काम करणारी संस्था. आदिवासींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणारी संस्था.
५) वंचित किास – सामाजिक प्रश्न विधायक पध्दतीनं हाताळणारी संस्था.
६) अंधश्रध्दा निर्मूलन समिती – समाजातील वेगवेगळया अंधश्रध्दा मोडून काढण्यासाठी झटणारी संस्था.
७) वनस्थळी – ग्रामकिास आणि बालक शिक्षणात भरीव योगदान देणारी संस्था.
या वेळी बोलताना मंगला आठलेकर म्हणाल्या, ”मतभिन्नता असली तरी शत्रुत्व ठेवायचं नाही हा माजगावकर यांचा गुण आहे, त्यामुळे माजगावकर आपलेच आहेत, असं प्रत्येकाला वाटतं. सगळयाच विचारांचं स्वागत करताना ते कोणत्याही राजकीय पक्षाला, विचारधारेला बांधील राहिलेले नाहीत. लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य देणारे हे प्रकाशक आहेत. त्यांची माणसं जपण्याची हातोटी, सकारात्मकता, समोरच्याला नवा विचार करायला भाग पाडणं हे सगळं शिकण्याजोगं आहे. ‘माणूस’च्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरांचं जतन त्यांनी केलं. माजगावकर म्हणजे एक दक्ष प्रकाशक, उत्तम वाणी आणि लेखणी असणारा माणूस.”
डॉ. बोरसे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात दोन्ही बंधूंचा आणि त्यांच्या कामाचा समर्पक आढावा घेतला. ते म्हणाले, ”राजहंसी नाण्याच्या श्रीगमा आणि दिगमा या दोन बाजू आहेत. ‘श्रीगमा म्हणजे माणूस’ हे समीकरण लोकांच्या मनात कायमस्वरूपी वसलं आहे. त्यांचा विस्तारलेला परीघ म्हणजेच ‘राजहंस’. श्रीभाऊ हा दिगमांच्या मनाचा हळवा कोपरा आहे. ‘समाजासह आपली उन्नती साधा’ हे श्रीगमा यांचं म्हणणं शिरोधार्य धरून ‘राजहंस’ची वाटचाल सुरू आहे. शास्त्रकाटयाची कसोटी आणि रमणीयता यांचा हा सुरेख संगम.”
डॉ. अरुणा ढेरे यांनी पुरस्काराथाअच्या वतीनं मनोगत मांडलं. त्या म्हणाल्या, ”समाजानं अशा कामांची फक्त दखल न घेता त्या कामाशी स्वत:ला जोडणं महत्त्वाचं असतं. श्रीगमांच्या स्मृतीला पुढे नेत दिलेला हा निधी अर्थ विस्तारणारा, अर्थ शब्द दोन्ही अर्थांनी साक्षात करणारा असा आहे. लोकप्रियता आणि दर्जा, ललित आणि वैचारिक यांचा समतोल साधत राजहंसची वाटचाल सुरू आहे. एकेकाळी लोकप्रिय साहित्याकडे बघण्याची अनेकांची तुच्छतेची दृष्टी बदलण्याचं आणि प्रगल्भ वाङ्मयीन जाणिवा त्यांच्यात निर्माण करण्याचं श्रेय ज्या लोकांना जातं, त्यातील एक माजगावकर आहेत.”
तब्येत ठीक नसल्यानं प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकलेल्या ज्येष्ठ नाटयकर्मी विजया मेहता यांनी दृकश्राव्य माध्यमातून आपल्या शुभेच्छा दिल्या. ”आमचे अत्यंत जिज्ञहाळयाचे संबंध निर्माण झाले. माझ्या पहिल्या पुस्तकाचं ‘झिम्मा’चं प्रकाशन राजहंसनं अतिशय प्रेमानं, गोंजारून केलं. नाटयकलेच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरावीत, या हेतूनं ‘झिम्मा’ आणि ‘बाई’ या पुस्तकांवर काम केलं गेलं.” या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गिरीश कार्नाड यांनी पत्राद्वारे शुभेच्छा पाठवल्या होत्या. त्या वाचून दाखवण्यात आल्या. तर महेश एलकुंचवारांनी आवर्जून पाठवलेली शाल दिगमांना पांघरण्यात आली.
प्रमुख पाहुणे असणाऱ्या माधव गाडगीळांनी अगदी वेगळाच मुद्दा मांडला. त्यांच्या पर्यावरणाच्या कामाच्या निमित्तानं फिरताना त्यांना अनेक लोप पावत चाललेल्या भाषांची माहिती मिळाली. सध्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात असलेल्या साहित्य विश्वानं याची दखल घ्यावी. राजहंससारख्या प्रथितयश प्रकाशन संस्थांनी त्यावर काम करावं, असं आग्रही प्रतिपादन गाडगीळांनी केलं. ते म्हणाले, ”राजहंसनी आजवर अनेक नव्या लेखकांना, नव्या विषयांना प्रोत्साहन दिलं आहे. नवनवं लेखन लोकांसमोर आणलं आहे. नव्या संक्रमणाचा विचार प्रकाशकांनी करायची वेळ आता आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गोंड आदिवासींच्या भाषेत काही करता येईल का, हे त्यांनी पाहावं.”
कार्यक्रमाच्या अखेरीला उत्सवमूर्ती दिलीप माजगावकर यांनी आपलं भावपूर्ण मनोगत व्यक्त केलं. सहसा दिसून न येणारं त्यांचं एक वेगळंच हळवं रूप उपस्थितांना अनुभवायला मिळालं. मोजक्या शब्दांत त्यांनी आपला प्रवास उलगडून दाखवला. अत्यंत प्रांजळपणे त्यांनी आपल्या व्यावसायिक चुका नमूद केल्या. त्या वयात केलेल्या प्रयोगांमुळे आर्थिक नुकसान झालं. त्या वेळी संस्था आर्थिकदृष्टया १० वर्षांनी मागं फेकली गेली, तरी श्रीगमा चिडले नाहीत! उलट भावानं आपल्यावर विश्वास टाकला. प्रयोग करताना मागं ओढलं नाही. याचं ॠण दिगमांनी मान्य केलं. श्रीगमांच्या ध्यासाची कहाणी सांगताना आपणही ती त्रिसूत्री लक्षात ठेवली असल्याचं दिगमांनी नमूद केलं. त्याच निकषांवर निधी देण्यासाठी संस्था निवडल्या, असं सांगत पुढे ते म्हणाले, ”ज्यांचा प्रभाव माझ्यावर पडला, त्यांचं कृतज्ञतापूज्र्ञाक स्मरण करतो. पहिलं नाव आहे श्रीपु अर्थात श्री. पु. भागवत. आजूबाजूला धर्माचा व्यवसाय होत असताना व्यवसाय हाच आपला धर्म बनवणारे श्रीपु मोठे वाटतात. दुसरे हरिभाऊ मोटे; उपजत रत्नपारखी कसा असतो, तर हरिभाऊंसारखा. दागिन्याच्या तोलामोलाचं एकेक पुस्तक त्यांनी केलं. रा. ज. देशमुख यांनी एकाच वेळी पुल, खांडेकर, रणजीत देसाई असे लोकप्रिय लेखक आणि दुसरीकडे शकुंतला परांजपे, इरावती कर्वे, भालचंद्र नेमाडे अशा वेगळया वाटेवरच्यांचीही पुस्तकं प्रकाशित केली. वाचकांपर्यंत पुस्तकं पोचवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले.”
२०१९ ते २०२९ अशी ११ वर्षं वैचारिक ग्रंथास रु. ४०००/- रोख रकमेचा ”माणूस’कार श्रीगमा पुरस्कार’ दिला जाईल, असं या वेळी जाहीर करण्यात आलं. याची निवड करण्याचं काम ‘रा. चिं. ढेरे प्रतिष्ठान’कडे सोपवण्यात आलं आहे.
जानेवारीत होणाऱ्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या आधीचे हे मिनी साहित्य संमेलनच म्हणायला हवं. प्रतिभा रानडे, द. दि. पुंडे सर, शेषराव मोरे, वीणा गवाणकर, विश्वास पाटील, मंगला गोडबोले, मेघना पेठे ते आशुतोष जावडेकर अशा तीन पिढयांचे लेखक तिथे होते.
वेगवेगळया प्रकाशकांची, संपादकांची, वितरकांची पूर्णवेळ उपस्थिती आश्चर्यचकित करणारी होती. लेखन विश्वाच्या पलीकडे नाटय-चित्रपट कलाकार, सामाजिक काम करणाऱ्या संस्थांमधील व्यक्ती, पत्रकार, चित्रकार, तंत्रज्ञ अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरही आवर्जून आले होते. सतीश आळेकर, माधव वझे, सई परांजपे, सोनाली कुलकर्णी अशी कलाकार मंडळी; गिरीश प्रभुणे, डॉ. देसाई अशी सामाजिक क्षेत्रातलीही अनेक मंडळी होती.
एखाद्याची आपल्या कामावरची निष्ठा, सगळयांप्रती असणारा निखळ स्नेह कसा असतो, व्यावसायिकतेच्या पलीकडे जात एखादा प्रकाशक लोकांना मैत्रीच्या धाग्यात कसं गुंफू शकतो आणि केवळ त्या स्नेहापोटी या ५ तासांच्या कार्यक्रमासाठी परगावाहूनच नज्ञहे, तर परराज्यातूनही लोक कसे येऊ शकतात, याचं हे अत्यंत विरळं उदाहरण!
सुरेख भाषणांनी, सुग्रास भोजनानं आणि राजहंस परिवाराच्या स्नेहानं तृप्त होऊन सारे आपापल्या जागी परतले. अतिशय सुरेख आणि खूप समृध्द करणारा अनुभव देऊन ही संध्याकाळ संपली.

कार्यक्रमाला आलेल्या अनेक मान्यवरांपैकी काही मोजक्या प्रतिक्रिया…

शां. ब. मुजुमदार – असं म्हणतात, जेज्ञहा तुम्ही १० कोटी कमावता, तेज्ञहा ते तुमचे असतात. जेज्ञहा तुम्ही १०० कोटी कमावता, तेज्ञहा त्यातल्या काही हिश्शावर समाजाचा हक्क असतो. अत्यंत प्रामाणिकपणे काम करत, कष्टातून वर येऊन माजगावकरांनी हे यश मिळवलं आहे. त्यानंतर समाजाचं ॠण फेडण्यासाठी त्यांनी हा निधी-अर्पण सोहळा करण्याचं ठरवलं, ही फार उदात्त आणि चांगली गोष्ट आहे.

जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर – अतिशय सुरेख कार्यक्रम. सगळया वक्तयांनी बोलायला दिलेली वेळ पाळली हे आवडलं. साहित्याच्या स्नेहापोटी अनेक जण इथे आले आहेत. छान वाटलं.

सई परांजपे – खूप छान कार्यक्रम झाला. सगळे किती खुशीत आहेत. राजहंसच्या प्रथेला साजेसा दणकेबाज कार्यक्रम झाला.

गिरीश प्रभुणे – आनंद झाला. छान कार्यक्रम.

माधव वझे – माणूसची परंपरा दिलीप माजगावकर पुढे जपत आहेत, हे पाहून फार बरं वाटतं आहे.

प्रतिभा रानडे – मला श्रीभाऊंनी उभं केलं. त्यांनी मला लेखिका म्हणून पाठबळ देत पुढे आणलं. आज त्यांच्या नावानं हा निधी वेगवेगळया संस्थांना दिला जात आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे. आपल्या कामानं मोठे असणारे श्रीभाऊ आता या निधीच्या रूपानं अनेकांच्या स्मरणात राहतील. दिगमांनी स्वत:च्या लग्नातही विद्यार्थी सहायक समितीला निधी दिला होता. हे सेवेचं बाळकडूच आहे म्हणा ना.

डॉ. सदानंद मोरे – माजगाकरांनी या निमित्तानं सगळे साहित्यिक एकत्र आणले आहेत. त्यांचे आभारच मानायला हवेत.

सतीश आळेकर – जियो दिगमा. आनंद वाटतो आहे हे पाहून. छान कार्यक्रम.

पुष्पा भावे – माणूसआणि ‘राजहंस’ यांनी आम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी अनेक नवे लेखक शोधले.

डॉ. सतीश देसाई – दिगमा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्नेहापोटी सारे इथे एकत्र आले आहेत.

द. दि. पुंडे सर – अत्यंत अनोखा कार्यक्रम असंच वर्णन करतो.

अनंत देशमुख – हे मिनी साहित्य संमेलनच म्हणायला हवं. तेही फक्त साहित्यिकांचे नज्ञहे, तर सज्र्ञा कला क्षेत्रांतील लोकांचं.

राजेंद्र खेर – उत्तम कार्यक्रम. दिगमांना भावूक झालेलं पाहण्याची क्ज्ञाचितच येणारी वेळ आज होती. बंधूंच्या आठवणीनं त्यांनी भावूक होणं साहजिकही होतं. त्यांनी निधी देण्यासाठी निवडलेल्या संस्था उत्तम आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी – मला जे आमंत्रणाचं पत्र आलं, त्यात लेखकांचा मेळावा आहे. तू आमची लेखिका असल्यानं तुला हे आग्रहाचं आमंत्रण आहे, असं लिहिलं होतं. हे वाचून मला फारच छान वाटलं. अभिनेत्रीच्या ग्लॅमरपेक्षा वेगळा असा लेखिका म्हणून मिळणारा हा सन्मान मला फार आनंद देऊन गेला आहे. आज या कार्यक्रमासाठी मी खास औरंगाबादवरून आले आहे. माझं पुस्तक प्रकाशित झाल्यावर माजगाकरांचं मला पत्र आलं होतं. त्यात त्यांनी टिपलेले माझ्या लेखनाचे बारकावे मला आश्चर्यचकित करून गेले होते. तुमच्या जगण्याकडे आणि लेखनाकडे इतक्या बारकाईनं बघणारा प्रकाशक विरळा असतो.

प्रा. मिलिंद जोशी – हे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनपूज्र्ञा संमेलन’ आहे, असं म्हणायला हरकत नाही. हल्ली त्या साहित्य संमेलनातही एवढया संख्येनं साहित्यिक येत नाहीत. ही मांदियाळी इथे बघून बरं वाटतंय.

डॉ. रेखा इनामदार – माजगावकर दांपत्यानं मला प्रेमानं बोलावलं. मी आले. दोघांचंही कौतुक वाटतं आहे. छान औचित्य साधून हा कृतज्ञता निधी दिला गेला. याबद्दल खूप छान वाटतं आहे.

सुजाता शेणई – आज इथे कितीतरी प्रकाशक आले आहेत. आपले व्यावसायिक संबंध बाजूला ठेवून दिलीपजींवर असणाऱ्या प्रेमानं आणि त्यांच्यावरच्या आदरानं सगळे इथे आले आहेत. हल्ली हे अगदी विरळा दिसणारं दृश्य आहे. साहित्य क्षेत्रासाठी हे प्रेरक आणि पोषक वातावरण आहे.

डॉ. आशुतोष जावडेकर- खूप सुंदर कार्यक्रम. हल्ली असे लेखकाकडून अभ्यास करवून घेणारे प्रकाशक अभावानंच दिसतात. आमच्या आधीची पिढी तर त्यांनी घडवलीच; आमची आणि आता पुढे येणारी एक पिढीही ते घडवत आहेत.

वैदेही देशपांडे – या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक दिग्गजांची भेट झाली. सारस्वतांची मांदियाळी जमली आहे.

मोनिका गजेन्द्रगडकर – हे एक मिनी साहित्य संमेलनच आहे.

मेघना पेठे – मी माजगाकरांच्या स्नेहासाठी इथं आले. छान झाला कार्यक्रम.