‘कासवाचे बेट – गालापोगस बेटांची सफर’ या राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या स्व. यशवंतराव चव्हाण ग्रंथ पुरस्कार योजनेत, पर्यावरण विभागासाठीचा डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार नुकताच मिळाला. यानिमित्ताने रानवाटा निसर्ग-संवर्धन संस्थेतर्फे लेखक डॉ. संदिप श्रोत्री यांचा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. छ. शिवाजीराजे भोसले होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, डॉ. श्रोत्री हे ख्यातनाम शल्यचिकित्सक आहेतच. पण त्यापेक्षाही त्यांच्यातला माणूस आणि माणुसकी सदैव जागी असल्यानेच ते अत्यंत संवेदनशीलपणे प्रवाही भाषेत लिहू शकतात. त्यांचा अभ्यास आणि व्यासंगही खूप मोठा आहे. इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, मानवी जीवन, लोकजीवनाची त्यांना विलक्षण ओढ असल्याचे आपल्याला दिसून येते.

डॉ. संदीप श्रोत्री यांना पालकांनी लहानपणीच निसर्ग आणि गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीच्या लावलेल्या वेडामुळे त्यांना हिमालयापासून ते अ‍ॅमेझान खोरे, केनिया, न्यूझीलंड, द. आफ्रिका या देशांचे डोळस पर्यटनाचे वेड लागले. या प्रवासात त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, डोळसपणे निसर्ग, प्राणीजीवन, लोकजीवनाचा, प्राणीशास्त्राचा अभ्यास करुन लिहीलेली प्रवासवर्णने मराठी साहित्याला नवी दिशा देणारी ठरली आहेत. यापुढेही त्यांनी अशीच जगभर भ्रमंती करुन मराठी साहित्य समृद्ध करावे, अशी अपेक्षा पुरंदरे यांनी व्यक्त केली.

गालापोगस बेटाच्या सफरीत डॉ. श्रोत्री यांच्याबरोबर सहप्रवासी असलेल्या डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी, डॉ. श्रोत्री यांच्याबरोबर पर्यटन करताना मिळालेल्या चतुरस्त्र अनुभवांची माहिती दिली. डार्विनच्या उत्क्रांती वादाचे सचित्र आणि अभ्यासपूर्ण दर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून घडविल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. रानवाटा संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. सीमंतिनी नूलकर यांनी डॉ. श्रोत्री यांच्या योगदानामुळेच रानवाटा संस्थेचे अनेक उपक्रम यशस्वी झाल्याचे सांगत श्रोत्री यांचे कौतुक केले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी आपल्या भाषणात, डॉ. श्रोत्री यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये उलगडून सांगिताना त्यांच्या साहित्याला, साहित्य अकादमी पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांची लेखनशैली परंपरागत प्रवासवर्णनाची चाकोरी मोडून, संबंधित स्थळांच्या भौगोलिक स्थानासह, त्यांचे सौदर्य, इतिहास, भूगोल, वनस्पतीशास्त्रासह विविधतेवर अनोखी माहिती शैलीदार शब्दात देणारी असल्यानेच त्यांचे साहित्य विविधांगी आणि मराठी साहित्याचे लेणे ठरल्याचे सांगितले.