लेखकाचा पत्ता: 
२९-१, तळमजला, हुंडीवाला अपार्टमेंट, कोपरी, ठाणे(पूर्व), मुंबई - ४०००१२
लेखकाची इतर माहिती: 
या सुमारे 40-45 वर्षे साम्यवादी चळवळीत कार्यरत आहेत. भाऊ फाटक आणि एस. के. लिमये यांच्यामुळे त्या मार्क्स-लेनिनवादी विचारांकडे वळल्या आणि पुढे लाल निशाण पक्षाच्या सदस्या झाल्या. याच क्रमात त्यांचा आणि कुमार केतकर या दोघांचा कॉम्रेड डांगे व त्यांच्या कुटुंबीयांशी जवळचा संबंध आला. साहजिकच कॉ. डांगे यांचाही प्रभाव त्यांच्यावर होता - जरी लौकिक अर्थाने लाल निशाण पक्ष आणि कॉ. डांगे यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यात वैचारिक व धोरणात्मक मतभेद होते. या काळात कम्युनिस्ट पक्षात व एकूण साम्यवादी चळवळीत अनेक वेळा फूट पडली आणि ब-याच वेळा त्याचे पर्यवसान व्यक्तिगत व पक्षांतर्गत कटुतेत आणि कलहातही झाले. शारदा साठे या सर्व साम्यवादी-समाजवादी आवर्तनांतून गेल्या आहेत. म्हणूनच मोहित सेन यांच्यासारख्या ज्येष्ठ, व्यासंगी आणि ध्येयनिष्ठ कम्युनिस्टाच्या आयुष्यात आलेल्या गुंतागुंतीच्या प्रसंगांची उत्तम समज शारदा साठे यांना आहे. याच काळात पूर्व युरोप व सोविएत युनियनमधील समाजसत्तावादी राजवटी कोसळल्या. सोविएत युनियनचे विघटन झाले. चीनमध्येही सांस्कृतिक क्रांती व इतर प्रचंड उलथापालथी झाल्या. माओ ते डेंग हा वैचारिक-राजकीय प्रवास मोहित सेन यांनी अगदी जवळून पाहिला होता. 1949 साली चीनमध्ये क्रांती झाल्यानंतर तीन वर्षे सेन अभ्यासासाठी चीनमध्ये होते. हा सर्व काळ व अनुभव लोकांसमोर येणे जरुरीचे आहे. शारदा साठे स्वत: दोन वेळा चीन व रशियाला गेल्या आहेत, त्याचप्रमाणे युरोप-अमेरिकेतही. मात्र त्यांचा हा जगप्रवास झाला तो स्त्रियांच्या चळवळीच्या निमित्ताने. गेली 30 वर्षे त्या स्त्री मुक्ती संघटनेत काम करीत असल्या, तरीही कम्युनिस्ट चळवळीतील घडामोडी शारदा साठे यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. 'प्रेरक ललकारी' या स्त्री-चळवळीला वाहिलेल्या मासिकाच्या त्या गेली 20 वर्षांहून अधिक काळ संपादक आहेत. 'मुलगी झाली हो' हे ज्योती म्हापसेकर यांचे नाटक घेऊन त्या महाराष्ट्राच्या गावागावात प्रबोधनासाठी फिरल्या आहेत. त्यांचा स्त्रियांच्या चळवळीतील अनुभव लक्षात घेऊनच त्यांची महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगावर नेमणूक झाली होती. यूनोच्या परिषदांमध्येही (मुख्यत: बीजिंग आणि न्यूयॉर्क) त्यांचा सहभाग होता. 'क्षितिजावरील शलाका' आणि 'ललकार' ही त्यांची दोन पुस्तके प्रसिध्द झाली आहेत. याशिवाय त्यांचे वृत्तपत्रीय स्फुट-लेखन व व्याख्यान दौरे चालूच असतात. या सर्व संदर्भात त्यांचा डॉ. भ. ग. बापट या ज्येष्ठ विचारवंतांशी संबंध आला. डॉ. बापट यांनी या पुस्तकाचे पान आणि पान बारकाईने वाचून बहुमोल सूचना केल्या. पुस्तकाची मुद्रिते शारदा साठेंच्या भगिनी नंदिनी बोपर्डीकर यांनीही पाहिली होती. कॉ. डांगे यांच्या कन्या रोझा व जावई बानी देशपांडे यांच्यामुळे पुस्तकाच्या शेवटच्या पानावरील कॉ. डांगे व सेन यांचे छायाचित्र त्यांच्या व्यक्तिगत संग्रहातून उपलब्ध झाले. मोहित सेन यांचे पुतणे प्रबीरचंद्र सेन यांच्या सहकार्यामुळेच मुखपृष्ठावरील छायाचित्र व इतर संदर्भ मिळू शकले.