केशवराव शिरवाडकर हे तात्यांचे धाकटे बंधू, त्यामुळे ग्रंथाला वैयक्तिक जिव्हाळ्याचा ओलावा लाभला आहे आणि अधिकृतताही आली आहे. परंतु केशवराव हे उत्तम समीक्षकही आहेत. त्यामुळे या ग्रंथातील विवेचनात आवश्यक तेवढी अलिप्तता, तटस्थताही आली आहे. आत्मीयता आणि अलिप्तता यांच्या संमीलनाचा हा दुर्मीळ योग आहे.

केशवरावांनी आपल्या पुस्तकामध्ये कुसुमाग्रजांच्या जीवनप्रवासाचा बालपणापासून मागोवा घेतला आहे. सामाजिक जाणीव, एकाकीपणा, माणूसवेड, मिस्कीलपणा, कलंदर वृत्ती, संकोची स्वभाव, दूरस्थता, प्रेम, सहिष्णुता अशा विविध आणि पुष्कळ वेळा विरोधीही प्रवृत्तींचा सुंदर गोफ म्हणजे तात्यासाहेबांचे जीवन. त्याचे सुरेख चित्रण आपल्याला ’तो प्रवास सुंदर होता’ मध्ये मिळते. या ग्रंथामध्ये कुसुमाग्रजांचे चरित्रकथन आणि साहित्य-परामर्श एकमेकांत इतके मिसळून गेले आहेत की, त्यातून एक इंद्रधनूचा सुंदर गोफ विणला गेला आहे.

हा ग्रंथ वाचताना कुसुमाग्रजांचे जीवन आणि साहित्य एकमेळाने उभे राहते आणि एका उदास आनंदाने चित्तवृत्ती भारून जातात.
-सु. रा. चुनेकर

पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार 2001
पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: 
आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी यांच्यातर्फे लक्षणीय गद्य साहित्य पुरस्कार 2001
पृष्ठसंख्या: 
215
किंमत: 
रु. 175
प्रकाशन अवस्था: 
प्रकाशित